मोजकी उन्हे , मोजक्या सरी

मोजकी उन्हे , मोजक्या सरी , मोजकेच वारे होते
शेवटी किती मोजले तरी मोजकेच सारे होते

पाहिले तिने , गूढ हासली , मान डोलली थोडीशी
हे जुनेच होते नकार की हे नवे इशारे होते

कालही तुझ्या बरसण्यामधे आलबेल नव्हते सारे
कालही तुझ्या पावसातले दोन थेंब खारे होते

मस्तकी टिळा लावला कुणी , हात जोडले काहींनी
छान वागले भक्तगण तुझे .. छान हातवारे होते

पण तुझ्या नभी नेहमी सखे पौर्णिमाच नांदत होती
मी खिशामधे ठेवले तसे दोन चार तारे होते

घट्ट बंद कर ओठ आपले , लाव शांततेची पट्टी
ह्या जगी कुणी शब्द काढला की अरेस का रे होते

वारला म्हणे गुदमरून तो श्वास रोखलेला पक्षी
आठवांवरी, आसवांवरी रात्रभर पहारे होते

गझल: 

प्रतिसाद

सुरेख गझल.

पाहिले तिने , गूढ हासली , मान डोलली थोडीशी
हे जुनेच होते नकार की हे नवे इशारे होते

वा! क्या बात है! अतिशय सुरे़ख शेर.

कालही तुझ्या बरसण्यामधे आलबेल नव्हते सारे
कालही तुझ्या पावसातले दोन थेंब खारे होते

घट्ट बंद कर ओठ आपले , लाव शांततेची पट्टी
ह्या जगी कुणी शब्द काढला की अरेस का रे होते

हे शेर सुरेख आहेत.
[इतर शेरही एरवी चांगलेच आहेत, पण 'वैभव जोशी' यांच्या गझलेबद्दलच्या वाढलेल्या अपेक्षांमुळे ते काहीसे सामान्य वाटत आहेत. ]:)

धन्यवाद चित्त व ज्ञानेश .
ज्ञानेश ,

हा तसा चर्चेला क्लिष्ट आणि सापेक्ष विषय आहे. पण मी आपल्या लेखनाचा आदर करतो म्हणून हा प्रपंच.

वेगवेगळ्या मनःस्थितीत वेगवेगळ्या रचना जन्मास येतात हे आपण जाणताच तसेच वाचणाराही / ऐकणाराही नेहमी त्याच मनःस्थितीत असेल(च) असे नव्हे हे मी अगदी सुरुवातीच्या काळातच तत्वतः मान्य केलेले आहे. तरीही ,आधी एका संकेतस्थळावर नमूद केल्याप्रमाणे , आपण बरेचदा हाती असलेल्या एकमेव कलाकृतीकडे बघू शकत नाही , अमुक एकाचे लिखाण म्हणजे काही गोष्टी असल्याच / नसल्याच पाहिजेत हे आडाखे सोबत असतात. तसे शक्यतो (निदान माझ्याकडून) होवू नये अशी काळजी मी घेत आलेलो आहे. आपण किमान इतके करू शकतो असे मला वाटते. आपणही हे करून बघा.

( वाढलेल्या अपेक्षांबद्दल मनःपूर्वक आभारी आहे. आपली अपेक्षापूर्ती होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना)

@वैभव-
आपले म्हणणे रास्त आहे. पटले.

आडाखे वगैरे नाहीत. तुमच्या गझलांनी नेहमीच मनाला आनंद दिलेला आहे.

वैभव,

आपली ही गझल तटस्थपणे व कोणत्याही अपेक्षा न ठेवता वाचली. आवडली नाही. न आवडण्याची कारणे:

१. मुद्दे जुने आहेत. (जुने म्हणजेही मला मराठी गझल किंवा गझल या क्षेत्रात जुने अभिप्रेत आहे, आपल्या इतर जुन्या गझलांमधले असे म्हणायचे नाही. )

२. कोणतेही ट्विस्ट्स, नावीन्य न दाखवत शेर सरळ सरळ आशय सांगत जातात असे वाटले. अंदाजे बयाँ कवितेप्रमाणे वाटला. क्षमस्व!

चु.भु.द्या.घ्या.

बेफिकीर ;

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद, पुढील वेळी चांगले लिहीण्याचा मनापासून प्रयत्न करेन .

मोजकी उन्हे , मोजक्या सरी , मोजकेच वारे होते
शेवटी किती मोजले तरी मोजकेच सारे होते

पाहिले तिने , गूढ हासली , मान डोलली थोडीशी
हे जुनेच होते नकार की हे नवे इशारे होते
सुंदरच!
गझलेची लय विशेष आवडली आणि तिचा केलेला वापरही छान वाटला!

पाहिले तिने , गूढ हासली , मान डोलली थोडीशी
हे जुनेच होते नकार की हे नवे इशारे होते

बाबो!!!!!!!!
खल्लास....
मला आवडली गझल...

वारला म्हणे गुदमरून तो श्वास रोखलेला पक्षी
आठवांवरी, आसवांवरी रात्रभर पहारे होते

खास! सगळीच गझल आवडली. पण हा शेर अगदी कट्यार काळजात घुसावी, असा वाटला!

पूर्ण गझल आवडली. बरसणे-खारे थेंब वाला शेर सगळ्यात जास्त आवडला. भक्तगण, शेवटचा शेरही छान. मतला तुलनेने कमी परिणामकारक वाटला.
मुद्दे, कल्पना इ. जुनेच असले तरी ज्या पद्धतीने, सहजपणे, ओघवतेपणाने ते मांडले जातात, त्यावरही गझलेची परिणामकारकता ठरत असते. त्या कसोटीवर ही गझल अपयशी ठरते, असे मला वाटत नाही. उदा. बरसण्यामध्ये सगळॅ आलबेल नसणे-दोन थेंब खारे असणे हा शेर. यात ट्विस्ट वगैरे नसला तरीसुद्धा शेर आशयघन आहेच. सांगण्याची पद्धत रोखठोक नाही, तर सूचक, मोजक्या शब्दांत सांगितल्याची आहे. म्हणून शेरही सुंदर झाला आहे.तेव्हा बेफिकीर यांच्याशी पूर्ण असहमत.

चक्रपाणि यांच्या मुद्यांशी पूर्ण असहमत!

वैभव यांची ओळ येथे नीट लागू होते.

ह्या जगी कुणी शब्द काढला की अरेस का रे होते

फक्त येथे 'अरे' एकाने दुसर्‍याला केले आहे, दुसरा शांत आहे अन तिसराच 'कारे' करतोय! :-))

वाह वाह ...छान ग़ज़ल्...आवडली.

" वारला म्हणे गुदमरून तो श्वास रोखलेला पक्षी
आठवांवरी, आसवांवरी रात्रभर पहारे होते "

अफ़सोस ... कुछ और ज़ब्त कर लिया होता .... बहोत खुब.

" दे फडकने की इजाज़त सैयाद
शब्-ए-अव्वल है गिरफ्तारी की..." ( उमराव जान `अदा' )

` ख़लिश ' / २७-०३-२०१०.

वारला म्हणे गुदमरून तो श्वास रोखलेला पक्षी
आठवांवरी, आसवांवरी रात्रभर पहारे होते

आवडली गझल.

कालही तुझ्या बरसण्यामधे आलबेल नव्हते सारे
कालही तुझ्या पावसातले दोन थेंब खारे होते

व्वा !!

बेफिकीर यांच्या अरे-कारेशी सहमत. दुर्दैवाने त्यांना कोण अरे म्हणतंय, कोण का रे म्हणतंय हे कळलेले दिसत नाही. पूर्वेतिहास लक्षात घेता, हे अपेक्षितही आहे. माझा प्रतिसाद मुद्द्याधिष्ठित आणि सोदाहरण असताना ती असहमती व्यक्तिगत पातळीवर नेण्याचे प्रयोजन (की खोडसाळपणा) अनाकलनीय. बाकी तुमची बेफिकीरी चालू देत.

मस्तकी टिळा लावला कुणी , हात जोडले काहींनी
छान वागले भक्तगण तुझे .. छान हातवारे होते ..सणसणीत शेर
पण तुझ्या नभी नेहमी सखे पौर्णिमाच नांदत होती
मी खिशामधे ठेवले तसे दोन चार तारे होते .. मला गालिबचा.. है खबर गर्म उनके आनेकी,...आजही घरमे बोरिया न हुआ.. हा शेर आठवला
मतल्यातील दुसरा मिसरा मी चुकून मोजकेच तारे होते असा वाचला होता...किमान दोन-तीन वेळा:)..बरेचदा फक्त तारेच मोजत बसायची वेळ येते..माझ्यावर, म्हणून असेल बहुदा;)
मतल्यात तुला काय अपेक्षित आहे ह्यावर विचार करतोय, पण त्यात एक तरलतेची एक वरची पातळी आहे नक्कीच, पण ती माझ्या लक्षात येत नाहीय... अनंतातील मर्यादीतपणा?... की इंतजार कि इंतेहा...म्हणजे अजून किती काळ मोजत बसू?
(वर कुणीसे म्हटले आहे की ही गझल कवितेच्या अंगाने जाते, वगैरे.. खरे तर ह्या/असल्या विषयांवर्/गझलियत वर अधिक विस्तॄत चर्चा व्हायला हवी)
गझल आनंददायी आहे नक्कीच
-मानस६

वा गुरुजी..... एकदम सही !!
खारे थेंब, तारे........खूपच आवडले.

मस्तकी टिळा लावला कुणी , हात जोडले काहींनी
छान वागले भक्तगण तुझे .. छान हातवारे होते
हा शेर आवडला.

कालही तुझ्या बरसण्यामधे आलबेल नव्हते सारे
कालही तुझ्या पावसातले दोन थेंब खारे होते
या शेरात दोनही ओळीत एकच गोष्ट सांगायची आहे असे वाटते. कारण, "कालही तुझ्या बरसण्यामधे" यातून पाऊस किंवा अश्रू हे ओघाने समजतेच. "आलबेल नव्हते सारे" यातून बरसण्यात काहीतरी गडबड आहे हे समजते. तीच गोष्ट खाली फक्त उदाहरण देऊन स्पष्ट केली आहे की काय असे वाटले. त्यामुळे पहिल्या ओळीतील वाढलेल्या अपेक्षा दुसरी ओळ पुरी करत नाही असे वाटले. असो. शेवटी निर्णय गझलकाराचाच.

वेळात वेळ काढून अभिप्राय देणा-या सर्वांचेच मनःपूर्वक आभार

आवडली. पक्षी आवडले.