शब्दांमधुनी जगण्याशी
शब्दांमधुनी जगण्याशी मी भांडत जाता
कोंडा उरतो जगण्याला या कांडत जाता
थोर जनांचे जीवन तुम्हा कधी न कळले
फोटोंमधुनी नुस्ती तत्त्वे टांगत जाता
पंख गळोनी धरतीवर मी पडेन तेव्हा
फक्त थांब तू, जन हे सगळे पांगत जाता
पूर होउनी कशा माती वाहुन न्यावी?
झिरपत जावे थेंब थेंब अन् सांडत जाता
चाकोरीत कुणाच्याही ते बसले नाही
जगणे म्हणजे अमुक तमुक का सांगत जाता
व्याख्या कुठली कवितेची हो, कशास करता
कविता दिसते बाळ कोवळे रांगत जाता
- प्रणव
गझल:
प्रतिसाद
कैलास
शनि, 20/03/2010 - 09:18
Permalink
मतल्यामधील काफिया आपण
मतल्यामधील काफिया आपण नंतरच्या शेर मधे बदलला आहे....शेर क्र.४ वगळता.
तेवढी सूट वगळता.....सुंदर गझल.
डॉ.कैलास
अजय अनंत जोशी
रवि, 21/03/2010 - 08:23
Permalink
चांगली गझल. तंत्राकडे निश्चित
चांगली गझल.
तंत्राकडे निश्चित पहा. गझलेत र्हस्व-दीर्घपेक्षा रदीफ-काफिया महत्वाचा आहे. तो चुकला तर ती तंत्रशुद्ध गझल म्हणता येणार नाही.
[ही गझल तंत्राच्या दृष्टीने येग्य नाही असे वाटते.]
मतल्यातील काफियात बदल केल्यास जमू शकेल कदाचित.
थोर जनांचे जीवन तुम्हा कधी न कळले
फोटोंमधुनी नुस्ती तत्त्वे टांगत जाता
हा शेर फार छान. मात्र, 'तुम्हा' हे लगा आहे. तेथे गागा हवे होते. त्यासाठी 'तुंम्हा' असे करायला हवे किंवा 'तुम्हास' असे करायला हवे. 'नुस्ती'ऐवजी नुसती हेही चालले असते.
पूर होउनी कशा(स) माती वाहुन न्यावी?
झिरपत जावे थेंब थेंब अन् सांडत जाता
येथे 'स' राहिला असे वाटते. तसेच 'अन्' चे प्रयोजन कळाले नाही.
असो. आशयाच्या दृष्टीने चांगली गझल. तंत्र मात्र अवश्य पहा.
ऋत्विक फाटक
रवि, 21/03/2010 - 08:50
Permalink
आशय चांगला आहे... मला वाटतं
आशय चांगला आहे...
मला वाटतं 'वृत्त न कळणे', 'योग्य शब्द न सुचणे' या चुकांच्या मानाने काफियात गडबड होणे ही खूपच लहान आणि सुधारण्याजोगी चूक आहे.
थोर जनांचे जीवन तुम्हा कधी न कळले
फोटोंमधुनी नुस्ती तत्त्वे टांगत जाता
छान आहे हा! 'तुम्हा' योग्य आहे असे मला वाटते. 'तुम्हा' चे दोन उच्चार होऊ शकतात.
'तुंम्हा' मात्र विनोदी आहे!
व्याख्या कुठली कवितेची हो, कशास करता
कविता दिसते बाळ कोवळे रांगत जाता
वा:! छान!
या कवितेच्या दोन गझला होतील... एक रांगत-पांगत-टांगत घेऊन आणि दुसरी भांडत-कांडत-सांडत घेऊन.
अजय अनंत जोशी
रवि, 21/03/2010 - 09:06
Permalink
ऋत्विक, तुम्हा चे दोन उच्चार
ऋत्विक,
तुम्हा चे दोन उच्चार कसे ते सांगा... [म्हणजे लिहून दाखवा.]
ऋत्विक फाटक
रवि, 21/03/2010 - 11:49
Permalink
अजयजी, तुमचा 'तुंम्हा' योग्यच
अजयजी, तुमचा 'तुंम्हा' योग्यच आहे,
पण नुसते तुम्हा लिहूनही पुढील जोडाक्षरामुळे 'तु' वरील भार लक्षात येतो, त्यासाठी अनुस्वार आणि पुन्हा म्हा घ्यायची गरज नाही असे वाटते.
तुम्हा, आम्हा, पुन्हा इ. चे तसेच आहे.
----- चु.भु.द्या.घ्या.
प्रणव.प्रि.प्र
रवि, 21/03/2010 - 13:28
Permalink
मला वाटलेलं तेच झाले! मुळात
मला वाटलेलं तेच झाले!
मुळात वृत्तात बसण्यासाठी इथे तुम्हा वर तीन अनुस्वार द्यायची गरज मला वाटत नाही आणि परत म्हाचा तु वर जोर आल्याने तो आपोआपच गुरू होतो.
दुसरं म्हणजे म्हणजे गझल सुचताना मी मांडत-भांडत वगैरे शब्द लिहून मग ती लिहायला बसलो नसल्याने सगळीकडे डत डत की काय जे असतो ते यमक यायलाच पाहिजे असं मला वाटत नाही. कारण मला जे म्हणायचे आहे ते तंत्रापेक्षाही जास्त महत्त्वाचं वाटतं. तीच खरी अभिव्यक्ती आहे. आणि बहुसंख्य मराठी गझलकार आणि समीक्षक यांतच अडकलेत असं वाटतं मला. माझं असंही म्हणणं नाही ही गझल ग्रेट किंवा बाप आहे. परंतु आशयासाठी तंत्रामध्ये थोडी लवचिकता असायला हवी कारण तोच महत्त्वाचा आहे. माझी रचनातंत्र तर फक्त बोट दाखवते आहे त्या आशयाच्या दिशेला....
मी कोणी कवी गझलकार किंवा समीक्षक नाही. त्यामुळे मला फक्त व्यक्त होणं इतकंच मला ठाऊक!
कायबद्दल संपादक चित्तरंजन भटांचं काय म्हणणं आहे जाणून घ्यायला आवडेल.
(ता.क. मला हा वाद वाढवायचा नाही. अन्यथा विषयाला वेगळेच फाटे फुटतात आणि गझल राहते मागेच जे तथातकथित मराठी गझलगायकांनी (ज्यांनी गझल लिहिली नाही तरी ते गझलवर बोलतात, अहो कार्यशाळाही घेतात म्हणे!) आणि त्यांच्या समीक्षकांनी आजवर केलं आहे.फक्त संपादकांचं मत वैयक्तिकदृष्ट्या हवं आहे अर्थात त्यांची इच्छा असेल तरच...)
बेफिकीर
सोम, 22/03/2010 - 18:35
Permalink
आपल्याला चित्तरंजन यांचेच मत
आपल्याला चित्तरंजन यांचेच मत हवे आहे हे आपण म्हंटलेच आहेत. मात्र प्रकाशित साहित्यावर कुणी बोलावे हे साहित्यकार ठरवू शकत नाही. (इच्छा जरूर व्यक्त करू शकतो.) यामुळे 'उगाचच मधे बोलण्याचा' दोष स्वीकारूनही मी लिहितो की १, ३, ४ व ५ या सर्व शेरांचा आशय अतिशय आवडला.
आपल्या मतांमधे विरोधाभास जाणवला त्यामुळे त्यावर काहीच लिहावेसे वाटत नाही.
आशयासाठी अभिनंदन!
बेफिकीर!
चित्तरंजन भट
सोम, 22/03/2010 - 18:36
Permalink
कोंडा उरतो जगण्याला या कांडत
कोंडा उरतो जगण्याला या कांडत जाता
ही ओळ फार सुरेख आहे. मतलाही एकंदर छान.
थोर जनांचे जीवन तुम्हा कधी न कळले
फोटोंमधुनी नुस्ती तत्त्वे टांगत जाता
छान.पुन्हा खालची ओळ विशेष.
पूर होउनी कशा माती वाहुन न्यावी?
झिरपत जावे थेंब थेंब अन् सांडत जाता
छान. अन् पादपूर्तीसाठी वाटते.
व्याख्या कुठली कवितेची हो, कशास करता
कविता दिसते बाळ कोवळे रांगत जाता
वा..
मतल्यातली अलामत शेवटपर्यंत सांभाळली पाहिजे. भांडतऐवजी दुसरा शब्द योजून बघा बरे.
तुमचे ह्या संकेतस्थळावर स्वागत आहे.
अजय अनंत जोशी
सोम, 22/03/2010 - 20:41
Permalink
कारण मला जे म्हणायचे आहे ते
कारण मला जे म्हणायचे आहे ते तंत्रापेक्षाही जास्त महत्त्वाचं वाटतं. तीच खरी अभिव्यक्ती आहे. आणि बहुसंख्य मराठी गझलकार आणि समीक्षक यांतच अडकलेत असं वाटतं मला.
हे अगदी खरे आहे..... आणि गझलेचे मुख्य तंत्र न पाळता गझल(गाणे) करणारेही खूप आहेत.
प्रणव.प्रि.प्र
मंगळ, 23/03/2010 - 00:46
Permalink
सगळ्यांनी आपापली मतं
सगळ्यांनी आपापली मतं नोंदवल्याबद्दल आभारी आहे. चर्चा होणं महत्त्वाचं. असो. धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्यांचे.
अजय अनंत जोशी
मंगळ, 23/03/2010 - 20:45
Permalink
काफिया चुकल्यावरही ही गझल
काफिया चुकल्यावरही ही गझल अजूनतरी तंत्रशुद्ध आहे असे वाटते. विचाराधीन नाही. विश्वस्तांचे म्हणणे आहे तरी काय नेमके ?
आता इथे "गा ल गा ल" वाल्यांचा सुळसुळाट झाल्यास नवल नाही.
अजय अनंत जोशी
गुरु, 25/03/2010 - 08:49
Permalink
ऋत्विक, मला वाटतं 'वृत्त न
ऋत्विक,
मला वाटतं 'वृत्त न कळणे', 'योग्य शब्द न सुचणे' या चुकांच्या मानाने काफियात गडबड होणे ही खूपच लहान आणि सुधारण्याजोगी चूक आहे.
हे आपले म्हणणे हास्यास्पद आहे.
****
"त्याचप्रमाणे आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की, गझलेत यमक उर्फ काफिया बदलत नाही, त्याचे शब्द बदलतात. यमकाच्या शब्दात असलेली "अलामत" उर्फ "स्वरचिन्ह" हेच त्या यमकाचे स्थायी गमक असते." = बाराखडी
****
" 'यमकाला कमी लेखू नका, ती कवितेची देवता आहे'. असे एके ठिकाणी म्हटले आहे. यमक हा कवितेचा प्राण आहे. गझल हा काव्यप्रकार यमकप्रधान आहे. एकाच कवितेत इतकी यमके असण्याचे दुसरे उदाहरण कोणत्याच काव्यप्रकारात नाही. काफिया म्हणजे यमक. हे गझलेचे शक्तिस्थळ आहे. गझल तंत्रातील काफियाचा विचार गझल लिहिणार्या कवीने अत्यंत दक्षतापूर्वक करणे म्हणूनच निकडीचे आहे. काफियांचा विचार गझलतंत्रात महत्वाचा विचार आहे.... " डॉ. श्रीकृष्ण राऊत
प्रणव,
मतल्यात घेतलेला काफिया पुढे नाही हे नक्की. त्यामुळे तंत्रदोष आहेच. परंतु, समजा "अत जाता" असेच घ्यायला गेलो तर तंत्रदोष उरत नाही हेही खरे आहे.
त्यामुळे संशयाचा फायदा तुम्हाला मिळू शकतो...:)
ऋत्विक फाटक
गुरु, 25/03/2010 - 20:22
Permalink
अजयजी, जिला वृत्त-छंदच कळत
अजयजी,
जिला वृत्त-छंदच कळत नाही किंवा जिच्याकडे प्रतिभाच नाही अशी व्यक्ती साधी कविताही रचू शकणार नाही.
त्यामानाने यमके जुळवणे ही सरावाने जमण्यासारखी गोष्ट आहे असे मला वाटते.
******
'काफिया बदलत नाही' वगैरे माहिती देण्यामागचे प्रयोजन काही कळले नाही.
******
यमकाला कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बाकी, डॉ.राऊत यांचा वरील उतारा चांगला आहे.