आयुष्यात रचेन एक कविता
पेटवणार मनातले धुमसते वैफ़ल्य केव्हातरी
आयुष्यात रचेन एक कविता जाज्वल्य केव्हातरी
एकच तास कुठे समोर असतो दिवसात तू आणि मी
याहीहून प्रदीर्घ काळ टिकवू हे शल्य केव्हातरी
घडवा रोज प्रसंग जे शिकवती श्वासास थांबायला
आवश्यक इतकेच फ़क्त असते कौशल्य केव्हातरी
पोटार्थी भरतात पोट गणिका निर्वस्त्र झाल्यावरी
कामार्थी उठतात घेत अपुले शैथिल्य केव्हातरी
टाळ्या देत खुशामतीत गढलो इतक्याचसाठी तुझ्या
अस्तित्वास तुझ्या निदान समजो साफ़ल्य केव्हातरी
जन्मांचा उपभोग घेत बसणे ही धोरणे आमची
कंटाळून म्हणेल देव 'चल घे कैवल्य' ... केव्हातरी
नक्की मी नसणार पूर्ण परका.... बदनाम झालो तरी
नजरेतून उगाच का बरसते..... वात्सल्य केव्हातरी
सर्वांगीण विचार काय करता..... प्रत्येक बाबीवरी
झटझट निर्णय घेत घेत जमते.... साकल्य केव्हातरी
आताशा विरले, बरेच विटले...... वापर किती जाहला
नात्यावर अपुल्या सुखात विलसे.... मांगल्य केव्हातरी
तू देहासच ’बेफ़िकीर’ अपुल्या सर्वस्व मानू नको
मन म्हणुनी असते, मनात उरते दौर्बल्य केव्हातरी
प्रतिसाद
चक्रपाणि
सोम, 15/03/2010 - 23:46
Permalink
देवाचा शेर आवडला. शैथिल्य
देवाचा शेर आवडला. शैथिल्य मध्ये अलामत भंग पावली, असे दिसते. चू. भू. द्या. घ्या.
अनिल रत्नाकर
मंगळ, 16/03/2010 - 00:06
Permalink
अवघड काफिया निभावण्याचे
अवघड काफिया निभावण्याचे लाजवाब कसब.
अलामतीच माहीत नाही पण
पोटार्थी भरतात पोट गणिका निर्वस्त्र झाल्यावरी
कामार्थी उठतात घेत अपुले शैथिल्य केव्हातरी
चाकोरीबाहेरचा धाडशी शेर.
बेफिकीर
मंगळ, 16/03/2010 - 00:25
Permalink
प्रिय चक्रपाणि, टीप द्यायची
प्रिय चक्रपाणि,
टीप द्यायची खरच राहिली यावेळेस! आपण नमूद केलेत ते चांगले झाले. प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद!
अनिल रत्नाकर, आपलेही धन्यवाद!
गिरीश कुलकर्णी
मंगळ, 16/03/2010 - 07:47
Permalink
अफाट... खुप आवडली
अफाट... खुप आवडली !
कैवल्य,वात्सल्य अन दौर्बल्य आवडले.
प्रताप
मंगळ, 16/03/2010 - 10:05
Permalink
खुप छान. मांगल्य आवडले.
खुप छान. मांगल्य आवडले.
ज्ञानेश.
मंगळ, 16/03/2010 - 12:50
Permalink
श्री. बेफिकीर, आपले अभिनंदन,
श्री. बेफिकीर,
आपले अभिनंदन, शार्दूलविक्रीडीतात एक चांगली रचना सादर केल्याबद्दल.
एवढ्या चांगल्या रचनेत काही किरकोळ फ्लॉज राहून गेले आहेत, जे डोळ्यांना खुपतात. आपल्या निदर्शनास आणू इच्छितो.
मतला-
मनातले वैफल्य आधीच 'धुमसते' आहे. त्यामुळे तिथे 'पेटवणार' हा शब्द योग्य वाटत नाही. मनातल्या धुमसत्या वैफल्याचा वापर करून मी एक जाज्ज्वल्य कविता लिहिणार असा आशय अपेक्षित असल्यास 'वापरणार मनातले धुमसते वैफल्य केव्हातरी...' हा बदल कसा वाटतो?
दुसर्या शेरात 'याहीहून' ऐवजी 'यापेक्षा' शब्द चालावा. या शेराचे आपण विस्ताराने विवेचन करावे, ही विनंती.
तिसर्या शेरात 'केव्हातरी' ही रदीफ अर्थासोबत जात नाही, असे मला वाटते. कारण वरच्या ओळीत 'रोज' असे प्रसंग घडवण्याचा उपदेश आहे.
चवथा शेर (मला) आवडला नाही. शैथिल्य काफिया वापरण्यासाठी रचलेला वाटतो. क्षमस्व.
५, ६, ७, ८ हे उत्तरोत्तर रंगत गेलेले शेर आहेत ! त्यातही वात्सल्य आणि साकल्य फार आवडले.
नवव्या शेरात परत एकदा 'केव्हातरी' चे प्रयोजन लक्षात येत नाही.
दहावा शेरही छान.
एकंदर, सुरेख गझल.
ऋत्विक फाटक
मंगळ, 16/03/2010 - 15:14
Permalink
जन्मांचा उपभोग घेत बसणे ही
जन्मांचा उपभोग घेत बसणे ही धोरणे आमची
कंटाळून म्हणेल देव 'चल घे कैवल्य' ... केव्हातरी
नक्की मी नसणार पूर्ण परका.... बदनाम झालो तरी
नजरेतून उगाच का बरसते..... वात्सल्य केव्हातरी
सर्वांगीण विचार काय करता..... प्रत्येक बाबीवरी
झटझट निर्णय घेत घेत जमते.... साकल्य केव्हातरी
आताशा विरले, बरेच विटले...... वापर किती जाहला
नात्यावर अपुल्या सुखात विलसे.... मांगल्य केव्हातरी
छान!
'जन्माचा उपभोग' खूपच आवडला! वेगळा आहे आणि केव्हातरी चा योग्य प्रयोग झालाय.
शार्दूलविक्रीडितातल्या रचना (मला) खूपच ओघवत्या आणि परिणामकारी वाटतात,
पण त्या रचताना तितक्याच विचाराने कराव्या लागतात. आपण हे वृत्त चांगले हाताळले आहे!
बेफिकीर
मंगळ, 16/03/2010 - 22:16
Permalink
सर्वांचे आभार! ज्ञानेश, माझी
सर्वांचे आभार!
ज्ञानेश,
माझी मते:
मनातले वैफल्य आधीच 'धुमसते' आहे. त्यामुळे तिथे 'पेटवणार' हा शब्द योग्य वाटत नाही.
बरोबर आहे आपले. जे धुमसते आहेच ते पेटेल कसे! (पण वापरणार किंचित साधे वाटले.)
दुसर्या शेरात 'याहीहून' ऐवजी 'यापेक्षा' शब्द चालावा. या शेराचे आपण विस्ताराने विवेचन करावे, ही विनंती.
याहीहून मधील 'ही' 'एकच तास' या उल्लेखाशी संबंधीत आहे. त्यामुळे याहीहून हे योग्य आहे. शेराचा अर्थः
दिवसात फक्त एकच तास समोर असणे याचे शल्य असावे असे पहिल्या ओळीत वाटत असताना दुसर्या ओळीत 'याहीहून जास्त तास एकत्र काढू' असे म्हणायच्या ऐवजी 'याहीहून हे शल्य जास्त टिकवू' असे म्हंटले आहे. म्हणजे, तो एक तास एकत्र काढणे हेच शल्य आहे.
तिसर्या शेरात 'केव्हातरी' ही रदीफ अर्थासोबत जात नाही, असे मला वाटते.
केव्हातरी अशी वेळ येते की फक्त श्वास थांबायचे कौशल्यच कामाचे ठरते. ( मृत्यू )! त्यावेळेस श्वास थांबलेल्या अवस्थेत मला राहता यावे म्हणून आजच 'श्वास थांबावा इतकी भीती वाटावी' असे प्रसंग घडवा.
शैथिल्य काफिया वापरण्यासाठी रचलेला वाटतो. क्षमस्व.
त्यात क्षमस्व काय? संपूर्ण गझलच यमकानुसारी आहे. स्पष्ट प्रतिसादासाठी आभार! या शेरात 'आपापल्या गरजा / चोचले भागवत माणसे जगत असतात लोकांच्या गरजा अशा काही असतात की त्या एकमेकांवर अवलंबून असतात व त्यासाठी काही घटकांना आयुष्यभर अत्याचार सहन करावे लागतात' असे 'काहीसे' म्हणायचे आहे.
नवव्या शेरात परत एकदा 'केव्हातरी' चे प्रयोजन लक्षात येत नाही.
आपल्या नात्याला केव्हातरी मांगल्याची झालर होती. आता त्या नात्याचा इतका वापर झाला आहे की मांगल्य लक्षातही नाही आहे. (नाती अशुद्ध झालेली आहेत.)
धन्यवाद!
अजय अनंत जोशी
बुध, 17/03/2010 - 07:38
Permalink
साफल्य आणि वात्सल्य चांगले
साफल्य आणि वात्सल्य चांगले शेर.
तरी, एकंदर रचना बोथट वाटली. कदाचित वृत्तामुळे असेल. शेरातून काय सांगायचे आहे हे कळते आहे. पण, बहुधा रचनेमधून तीव्रतेने उमटले नाही असे वाटते.
हे वृत्त, निवडलेला कफिया आणि रदीफ प्रयोग म्हणून छान.
चित्तरंजन भट
गुरु, 18/03/2010 - 10:13
Permalink
वृत्त छान हाताळले आहे.
वृत्त छान हाताळले आहे.