भक्तीविभोर....!!

भक्तीविभोर....!!

चंद्रास ग्रासतांना अंधार घोर झाला
संधी चिकार येता तारा मुजोर झाला

आमंत्रणे मिळाली त्या सर्व मूषकांना
पंक्तीस साह्य व्हावे बोक्यास पोर झाला

दूधादह्यास आता कान्हा नशीब नाही
हंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला

टाळूवरील लोणी खायास गुंतला जो
सत्कार पात्र तोची मशहूर थोर झाला

प्रेमात वारसांच्या स्वहिता भुलून गेला
नात्यास भार होता स्वजनात चोर झाला

यावे तसेच जावे ना 'अभय'दान कोणा
मृत्यू समीप येता भक्तीविभोर झाला

गंगाधर मुटे

गझल: 

प्रतिसाद

क्या बात है !!
मस्त झलिये गझल गंगाधरपंत.....
मतला जरा कळला नाही.

डॉ.कैलास

छान.
हंडी कवेत ज्यांच्या बाहूत जोर झाला ....तसेच,
नात्यास भार होता स्वजनात चोर झाला
या ओळी आवडल्या.

कैलास म्हणतात त्याप्रमाणे मतला जरा अवघड आहे.
मी काढलेला अर्थ : तारा म्हणजे सूर्य. हे चांद्रग्रहणाच्या वेळचे वर्णन वाटते आहे. अशी वेळ खूपवेळा आल्याने सूर्य मुजोर झाला.
मतल्यामध्ये 'चिकार'ऐवजी अनंत किंवा कितीक वापरले तर..? कारण चिकार की चिक्कार हा वादाचा मुद्दा होवू शकतो कदाचित....
अर्थात, निर्णय गझलकाराचाच.

कैलासजी,अजयजी
आभारी आहे.

"चंद्रास ग्रासतांना अंधार घोर झाला
संधी चिकार येता तारा मुजोर झाला"

"चंद्र झाकोळला असता काळाकुट्ट अंधार झाला आणि अंधारामुळे चांदणीला आपला प्रकाश पाडण्यास विपुल संधी उपलब्ध झाली पण त्या संधीचा चांदणीने गैरफ़ायदा घेतला" असा अर्थ. पण तो व्यक्त करण्यात मला किती यश मिळाले हे नक्की नाही सांगता येत. तारा म्हणजे चांदणी या अर्थाने घेतलाय.

अजयजी. चिकार आणि चिक्कार हे दोन्ही शब्द वापरात आहे.
ता.क. - चुकून अजयजी ऐवजी अनंतजी झाले होते, दिलगीर आहे. अजयजी माफी असावी.

दूधादह्यास आता कान्हा नशीब नाही
ऐवजी ही ओळ
आता दह्यादुधाला कान्हा नशीब नाही
अशी वाचावी.

बोक्यास पोर झाला हा छान शेर आहे.

बेफिकीरजी
आभारी आहे.

खुप छान. म्रुत्यु आवडले.

टाळूवरील लोणी खायास गुंतला जो
सत्कार पात्र तोची मशहूर थोर झाला

ग्रे8.