तुझ्या येण्यामुळे

तुझ्या येण्यामुळे घडावे सारखे
तुझ्यावरतीच मी मरावे सारखे

तुझा नव्हतो तशी फकीरी घेतली
अताशा वाटते सजावे सारखे

कुणाचे नावही नकोसे वाटते
तरी हृदयांत का उरावे सारखे ?

तुला भेटून मी किती आनंदलो
असेही वाटले निघावे सारखे

'मिळावी भाकरी' कुणी आक्रोशतो
मरण जगण्यातुनी दिसावे सारखे

चघळतो भाकरी,नसे पाणी तरी..
असे जीवन किती गिळावे सारखे

दिला उद्योग तू मलाही रोजचा
'अता येशील तू..' म्हणावे सारखे

कधी काट्यावरी सुखाने झोपलो
अताशा फूलही रुतावे सारखे

जरी भेटायला किती आसूसलो
तरीही भेटणे नसावे सारखे

गझल: 

प्रतिसाद

दिला उद्योग तू मलाही रोजचा
'अता येशील तू..' म्हणावे सारखे

वा:! क्या बात है!

कुणाचे नावही नकोसे वाटते
तरी र्‍हदयांत उरावे सारखे

दुस-या ओळीत एक गुरु कमी आहे असे वाटते.
'तरी हृदयांतरी' असं आहे का?

खूप खूप धन्यवाद ऋत्विक.

कधी काट्यावरी सुखाने झोपलो
अताशा फूलही रुतावे सारखे.
खुप आवडले.

धन्यवाद गंगाधर.
सध्या वेगवेगळ्या वृत्तात ओळी येताहेत. वृत्तात म्हणजे लग क्रमात. असाच प्रयत्न पुढे आहे.

खुप आवडली. भाकरी, काटा आवडले.

अरे वा!
एक तू अन् एक मी असेच चालले आहे की...:)
धन्यवाद प्रताप.