बघ तुझे माझे बिनसले शेवटी

फार ते चिकटून बसले शेवटी
सर्व काटे मी उपसले शेवटी

मी तरी सांगायचो.... माझीच हो
बघ तुझे माझे बिनसले शेवटी

साधले नाही चुका काढायला
प्रेमही ठरवून रुसले शेवटी

ओळखी रस्त्यातल्या रस्त्यामधे
पण मनापासून हसले शेवटी

जे स्वतःलाही कधी टाळायचे
ते मलासुद्धा तरसले शेवटी

केवढी विरहामधे क्षमता तरी...
केवढे श्रावण बरसले शेवटी

गोड आरंभात नाते वाटते
मागुनी होतेच असले शेवटी

राहिली अर्धी कथा माझी तुझी
सांग ना मग कोण फसले शेवटी?

भूक भागवतील गझला आपल्या
धन जरी अगदीच नसले शेवटी

'बेफिकिर' जगलो प्रतिष्ठेने तसा
काय कसले, काय कसले शेवटी.....

गझल: 

प्रतिसाद

फार ते चिकटून बसले शेवटी
सर्व काटे मी उपसले शेवटी
वा! हा शेर आवडला.

मस्त.
१,३,४ जास्त आवडलेत.

गझल आवडली.
'तरसले' काही कळले नाही.

१,४,७ आवडले.
२,५,६ समजले नाहीत.

खुप आवडले. रस्त्यामधे, श्रावण आवडले.

सर्वांचे आभार!

अजय - २, ५, व ६ चा अभिप्रेत अर्थ:

मी तरी सांगायचो.... माझीच हो
बघ तुझे माझे बिनसले शेवटी - तू माझे न ऐकल्यामुळे, म्हणजे माझी न झाल्यामुळे मी रागावलो आहे व त्यामुळे आपले बिनसले आहे. तू माझे ऐकले असतेस तर आपले असे बिनसलेच नसते.

जे स्वतःलाही कधी टाळायचे
ते मलासुद्धा तरसले शेवटी

गर्विष्ठ माणसे स्वतःतील 'कधी काळी असलेल्या साध्यासुध्या स्वतःलाही' टाळतात, त्याचे म्हणणे ऐकत नाहीत, आपल्याच ताठ्यात वागतात. माझ्याशी त्यांनी नीट वागायचा तर प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र शेवटी अशी माणसे (काही घटनाचक्रांमुळे, काळामुळे) मलाही तरसली. (तरसली हिंदी पद्धतीने घेतले होते. )

केवढी विरहामधे क्षमता तरी...
केवढे श्रावण बरसले शेवटी

जेवढा विरह दीर्घ तेवढे प्रेम जास्त बरसते असे म्हणायचे आहे. मात्र शेर रचून झाल्यानंतर आणखीन एक अर्थ जाणवला. विरहात एवढी क्षमता असूनही शेवटी श्रावण बरसलेच!

पुन्हा सर्वांचे आभार!