कोणी

काळजाला पिसू नये कोणी
कुशल इतके पुसू नये कोणी

जीव घ्यावा खुशाल प्रेमाने
बोचकारू, डसू नये कोणी

कुंतलांशी असे न खेळावे
मग स्वत:शी हसू नये कोणी

ओठ नाजुक बरे, न दुमडावे
वर अबोला कसू नये कोणी

दे जरा मोकळीक अर्थाला
शब्द इतके कसू नये कोणी !

कोण समजूत घालणार अता?
(एवढेही रुसू नये कोणी)

सूर्य पाण्यामधे पहावा पण
काजव्यांना फसू नये कोणी

ओळखीचे असून गाव कसे
ओळखीचे दिसू नये कोणी?

मी नसावे तुझ्यासवे जेव्हा
मी असावे, असू नये कोणी

गझल: 

प्रतिसाद

प्रिय चित्तर॑जन
गझल आवडली. माझी  एक जुनी गझल (स्वप्नमेणा स॑ग्रहातली) आठ्वली.

आसवा॑ना हसू नये कोणी
काय झाले पुसू नये कोणी

ते निघाले असेन स्वप्न तुझे
एवढेही  रुसू नये कोणी
मस्त. फार दिवसा॑नी तिची याद दिल्याब्द्दल आभार.
 

चित्तरन्जजी
काय भन्नाट गझल आहे. मान गये यार.

हे माहीत असते तर नक्कीच इथे उल्लेख केला असता. Great minds think alike म्हणायला हरकत नाही. एक मिसरा तर जसाच्या तसा आला आहे, टकराया है.

आसवा॑ना हसू नये कोणी
काय झाले पुसू नये कोणी

ते निघाले असेन स्वप्न तुझे
एवढेही  रुसू नये कोणी
मस्त.

वरील शेर की माझी गझलः):):) दोन्ही शेर सुंदर आहेत. इतर शेरही द्यावेत. अभिप्रायाबद्दल धन्यवाद.


चित्तरंजन, मस्त गझल! झकास कल्पना!
लागिर गझल इथे होते
कट्ट्यावर बसू नये कोणी

रविवारचा कट्टा लई पावर्बाज दिसतोय...

गझल झकासच आहे.....वेगवेगळे विषय असलेली.  सहज, सोपी, साधीसुधी....उत्तम गझल...
काळजाला पिसू नये कोणी
कुशल इतके पुसू नये कोणी

जीव घ्यावा खुशाल प्रेमाने
बोचकारू, डसू नये कोणी

कोण समजूत घालणार अता?
(एवढेही रुसू नये कोणी)
ओळखीचे अजून गाव तरी
ओळखीचे दिसू नये कोणी?

खूपच छान...

सहज सुंदर रचना ! खूप खूप आवडली !
जीव घ्यावा... नितांत सुंदर !
मक्ता... मस्तच !

अहाहा! अप्रतिम ग़ज़ल. शृंगार, हृदयद्रावकता, व्यवहार सगळेच आवडले.

नवीन कल्पना मस्त आहे.

त्यादिवशी अपूर्ण राहिलेली गझल देत आहे.

आसवा॑ना हसू नये कोणी
काय झाले पुसू नये कोणी

आणले मी न दुख बाजारी
सा॑त्वनाला असू नये कोणी

हासुनी बोलती जरी सारे
हासण्याला फसू नये कोणी

झेल आकाश तू खुले माझे
हे असे आकसू नये कोणी

हारतानाच डाव जि॑कावा
हारण्याला पिसू नये कोणी

ते निघाले असेल स्वप्न तुझे
एवढेही रुसू नये कोणी

ही गझल स्वप्नमेणा या माझ्या स॑ग्रहात आहे.

ओके. बाकी न॑तर बोलतोच.



कोण समजूत घालणार अता?
(एवढेही रुसू नये कोणी)
.........................या गझलेत सहले-मुम्तिना आहे. म्हणजे साध्या शब्दात दडलेला संपन्न आशय. बाकी निफाडकरांची आणि या गझलेची जमीन सारखी असणे , हा निव्वळ योगायोग  वाटतो , कारण दोन्ही गझला भिन्न आहेत.गझलेत असे योगायोग नेहमीच घडतात ,याचे कारण गझलेच्या
रूपगामी असण्यामध्ये दडले आहे.
सिराजची एक गझल आहे ,
                इश्कने खू किया है दिल जिसका
                 पारा ए लाल हुआ अश्क उसका
            बेकसी मुझसे आशना है  सिराज 
          नई तो आलम  कौन है  किसका   !
तर  मीर ची गझल आहे ,
                     शाम  से  कुछ  बुझा सा रहता  है
                     दिल हुआ  है  चराग  मुफलिस का !
   दोन्ही गझलांची जमीन एक असली , तरी या दोन स्वतंत्र गझला आहेत , नाही का ?

             

काय अप्रतिम गझल आहे! शेवटचा शेर खासच. आणि 'काजव्यांना फसू नये कोणी' ही ओळ तर कायम स्मरणात राहील अशी!!
(नटसम्राट चा शेवटचा प्रसंग आठवला. बेलवलकर म्हणतात - 'असे असते नाटक राजा, असे असते नाटक'. अशी असते गझल! नाहीतर आमच्यासारख्यांचे काळ्यावर पांढरे करणे...)
-- पुलस्ति.

आवडली

माझे आकलन बेताचे असल्याने प्रतिसादाला वेळ लागला, गझल बढिया आहे...