माझ्या कुशीत...

..........................................
माझ्या कुशीत ...!
..........................................

माझ्यासवे निवांत बोलणार आज मी !
माझा नवाच अर्थ शोधणार आज मी !

वेडा, खुळा असेन, मी असेन बावळा...
तुमच्या सभेत खास शोभणार आज मी !

आलास तावडीत आज तू बरा मना ...
आता तुला तसा न सोडणार आज मी !

काढू पुन्हा तुझा कशास मी खुजेपणा ?
माझीच रेष उंच ओढणार आज मी !

डोळ्यांत दाटतात कोरडीच आसवे...
कुठले कळे न दुःख सोसणार आज मी !

थोडी तरी हवीच हालचाल भोवती...
या सावलीत प्राण ओतणार आज मी !

घेऊन सोबतीस तोच एकटेपणा...
माझ्या कुशीत गाढ झोपणार आज मी !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

थोडी तरी हवीच हालचाल भोवती...
या सावलीत प्राण ओतणार आज मी ! - सुंदर!

प्रदीप ,
सगळी गझल मस्त आहे. सावलीत प्राण आणि माझीच रेष हे दोन्ही शेर फार आवडले.
सोनाली

खुप छान आवडली.
माझ्या कुशीत मीच झोपणार आवडले.

काढू पुन्हा तुझा कशास मी खुजेपणा ?
माझीच रेष उंच ओढणार आज मी

थोडी तरी हवीच हालचाल भोवती...
या सावलीत प्राण ओतणार आज मी

क्या बात है !

डॉ.कैलास गायकवाड

डोळ्यांत दाटतात कोरडीच आसवे...
कुठले कळे न दुःख सोसणार आज मी !

सही! सगळ्याच द्विपदी आवडल्या.

क्या बात है !
मतला, कोरडी आसवे, सावली हे शेर विशेष भावले !


डोळ्यांत दाटतात कोरडीच आसवे...
कुठले कळे न दुःख सोसणार आज मी
!
वा!

थोडी तरी हवीच हालचाल भोवती...
या सावलीत प्राण ओतणार आज मी
!
वाव्वा, प्रदीपराव! फार फार आवडला हा शेर आणि एकंदर गझलही.

प्रतिसाद देणाऱया सगळ्यांचे मनापासून आभार. लोभ आहेच; असाच राहू द्यावा.

व्वा ! उत्तम गझल !

थोडी तरी हवीच हालचाल भोवती...
या सावलीत प्राण ओतणार आज मी !

घेऊन सोबतीस तोच एकटेपणा...
माझ्या कुशीत छान झोपणार आज मी !
मस्त.
सर्वच शेर आवडलेत.

आलास तावडीत आज तू बरा मना ...
आता तुला तसा न सोडणार आज मी !

काढू पुन्हा तुझा कशास मी खुजेपणा ?
माझीच रेष उंच ओढणार आज मी !

थोडी तरी हवीच हालचाल भोवती...
या सावलीत प्राण ओतणार आज मी !

घेऊन सोबतीस तोच एकटेपणा...
माझ्या कुशीत छान झोपणार आज मी !

प्रदीप - सुरेख गझल, "माझ्या कुशीत छान झोपणार आज मी" तर फार आवडला