खलाशी

नको वागूस सरिते नाविकाशी वेगळी
नदी काढेलसुद्धा हा खलाशी वेगळी

सुखाचे घास दैवा पारखूनी देत जा
अधाशी वेगळी हृदये, उपाशी वेगळी

नवी करशील का तू केशरचना आपली?
नकाराचीच पण... शैली जराशी वेगळी

पुन्हा आरंभले होते सुधारित वागणे
पुन्हा शिंकायला आलीच माशी वेगळी

कधी थांबायचे काळा कधी खुरडायचे?
गती घेतोस तू प्रत्येक ताशी वेगळी

मनाला गुंतवो केसात वा कापो गळा
कुठे या जन्मठेपेहून फाशी वेगळी?

तटस्थासारखे मी पाहतो होईल ते
असावी एक तेरावीच राशी वेगळी

कसे आतून आल्यासारखे ते वाटते
मला पाहून ती हसते जराशी वेगळी

गझल: 

प्रतिसाद

नको वागूस सरिते नाविकाशी वेगळी
नदी काढेलसुद्धा हा खलाशी वेगळी

इथे नाविक = खलाशी असे समजायचे का?

कधी थांबायचे काळा कधी खुरडायचे?
गती घेतोस तू प्रत्येक ताशी वेगळी

क्या बात है !!

डॉ.कैलास गायकवाड

छान! छान गझल!!
हसते जराशी वेगळी ... मस्त!

इतके दिवस कुठे होती ही गझल? असो.

छान रचना आहे. मला आवडली.
शेवटचे ३ शेर लाजवाब!

मनाला गुंतवो केसात वा कापो गळा
कुठे या जन्मठेपेहून फाशी वेगळी?

तटस्थासारखे मी पाहतो होईल ते
असावी एक तेरावीच राशी वेगळी

कसे आतून आल्यासारखे ते वाटते
मला पाहून ती हसते जराशी वेगळी

खालील शेर कळला नाही,

नवी करशील का तू केशरचना आपली?
नकाराचीच पण... शैली जराशी वेगळी

मला या दोन ओळींमधील अर्थ स्पष्ट झाला नाही त्यामुळे हा शेर अनावश्यक वाटला.
जरा अर्थ स्पष्ट कराल का?

-----------------------------------------नचिकेत भिंगार्डे

इतके दिवस कुठे होती ही गझल? असो

अजय अनंत जोशी,
तांत्रिक अडचणींमु़ळे ही रचना ३ र्‍या पानावर गेली होती......

डॉ.कैलास

खुप छान. सगळे आवडले.

सुखाचे घास दैवा पारखूनी देत जा
अधाशी वेगळी हृदये, उपाशी वेगळी
केवळ अप्रतिम!

पुन्हा आरंभले होते सुधारित वागणे
पुन्हा शिंकायला आलीच माशी वेगळी

वा:! सगळेच शेर सुंदर आहेत..वरील दोन तर खासच झालेत!