गोल फक्त हा सजीव ठेवला असेल तर?

गुंतवू नकोस.... देह ठेवला असेल तर
मी उगाच एक डाव खेळला असेल तर?

कारणास कारणे नि त्यांस कारणे पुन्हा
मूळ शोधण्यास जीव नेमला असेल तर?

काय माहिती ... जिला नमेन त्याच मूर्तिने
माणसापुढेच हात टेकला असेल तर?

अर्थहीनतेस अर्थ द्यायला हवाच का?
मी सहज म्हणून जन्म घेतला असेल तर?

घेतलेस ते इथेच सोडलेस तू जरी
मन तपासण्यास हेर पेरला असेल तर?

भिन्न मिश्रणे जमीन, तेज, तोय, नभ, हवा
त्यात काय जर प्रसंग बेतला असेल तर?

'बेफिकीर' या जगात नम्र राहणे बरे
गोल फक्त हा सजीव ठेवला असेल तर?

गझल: 

प्रतिसाद

काय माहिती ... जिला नमेन त्याच मूर्तिने
माणसापुढेच हात टेकला असेल तर ?

हा शेर आवडला..........आणी समजला सुद्धा.....बाकी गझल छान आहे....पण मतितार्थ पहाता....जरा गूढ भासली.

डॉ.कैलास गायकवाड

मलाही हाच शेर आवडला/समजला.

गोल फक्त हा सजीव ठेवला असेल तर? - म्हणजे काय?

डॉ. कैलास,

गझल गूढ आहे हा प्रतिसाद आवडला.

डॉ. ज्ञानेश,

कैलास यांचा प्रतिसाद व तुमची शंका लक्षात घेऊन सगळ्याच 'रचनेचा' अर्थ देतो.

दोघांना धन्यवाद!

------------------------------------------------------------------------------------------------

गुंतवू नकोस.... देह ठेवला असेल तर
मी उगाच एक डाव खेळला असेल तर?

माझ्या चितेपुढे उभे राहून रडणार्‍या दोस्ता, रडून मला पुन्हा या जगात गुंतवू नकोस. मी हा आयुष्याचा डाव उगाच खेळायचा म्हणून खेळलो होतो. मी त्याबाबतीत फारसा गंभीर नव्हतो. तुझ्या रडण्यामुळे मी उगाच पुन्हा गुंतायचो.

कारणास कारणे नि त्यांस कारणे पुन्हा
मूळ शोधण्यास जीव नेमला असेल तर?

प्रत्येक गोष्टीला, सजीव अस्तित्वाला एक कारण असते. म्हणजे, मी ही रचना लिहिली कारण मी लिहू शकतो व मला सुचू शकते. हे सगळे मला होते कारण मी आहे. मी आहे कारण माझे आई वडील. ते किंवा त्यांचे आई वडील होते कारण त्यांचेही आई वडील. ही साखळी शेवटी विश्वाच्या रहस्याशीच जाऊन थांबणार. मुळात कुणाच्यातरी इच्छेने किंवा आपोआप हे विश्व निर्माण झाले त्यामुळे हे सर्व चालू आहे. ते मूळ काय, म्हणजे ती इच्छा कुणाची किंवा ते आपोआप होणे का असावे हे शोधण्यासाठी जर आपला जीव नेमला गेलेला असेल तर मी आजपर्यंत काहीच काम केले नाही म्हणावे लागेल. नुसताच या जगात मी आपला रमत बसलो.

काय माहिती ... जिला नमेन त्याच मूर्तिने
माणसापुढेच हात टेकला असेल तर?

हा शेर आपण नोंदवला आहेतच.

अर्थहीनतेस अर्थ द्यायला हवाच का?
मी सहज म्हणून जन्म घेतला असेल तर?

मतला व या शेरामधे फरक आहे. मतल्यात मेलेला माणूस 'मला पुन्हा गुंतवू नको' असे म्हणत आहे तर येथे जिवंत माणूस म्हणत आहे की 'मी येथे आहे म्हणजे अगदी सगळे मनस्ताप सहन करून माझ्या अस्तित्वाला अर्थ, उद्देश प्राप्त करून दिलाच पाहिजे का, मी आपला सहज म्हणून एक जन्म घेऊन बघितला असेल तर नुसते तटस्थ जगायला काय हरकत आहे'. येथे धावपळीच्या व पराकोटीच्या ताणाच्या जीवनात निर्माण झालेला उद्वेग आहे.

घेतलेस ते इथेच सोडलेस तू जरी
मन तपासण्यास हेर पेरला असेल तर?

गीता सार मधे म्हणतात की 'जे इथे मिळवशील ते इथेच सोडून जाशील'! ते ठीक आहे. पण एखादी गोष्ट, जसे दौलत, जमीन, वारसा वगैरे मिळवताना व मिळवल्यानंतर तसेच सोडताना जर मनात त्या गोष्टीचा आत्यंतिक लोभ किंवा मोह असेल तर ते सर्व इथेच जरी सोडलेस तरी तू पापी ठरशीलच की? मग तुझ्या मनातील पापांची नोंद घेण्यास जर एखादी व्यवस्था केली गेलेली असली तर तू काय करणार?

भिन्न मिश्रणे जमीन, तेज, तोय, नभ, हवा
त्यात काय जर प्रसंग बेतला असेल तर?

पंचमहाभूतांपासून सर्व अस्तित्व आहे (या पृथ्वीवरील व आपल्याला ज्ञात असलेले अस्तित्व)! माती, अग्नी, पाणी, आकाश व वायू यांची भिन्न भिन्न मिश्रणे म्हणजे अनंत प्रकारच्या सजीव व निर्जीव गोष्टी! मग तुझा मृत्यू म्हणजे तरी काय? त्याच पाच गोष्टींचे एक वेगळे मिश्रण नाही का? मग तसा प्रसंग बेतलाच तर प्रॉब्लेम काय आहे?

'बेफिकीर' या जगात नम्र राहणे बरे
गोल फक्त हा सजीव ठेवला असेल तर?

हे जग तुझ्याशी बेफिकीरपणे वागणार आहे. तरीही येथे आपले तू नम्रच राहिलेले बरे आहेस. कारण हा पृथ्वीनामक गोलच जर फक्त सजीवसृष्टी धारण करणारा असेल तर तू दुसरीकडे जाणार कुठे?

---------------------------------------------------------------------------------

शब्दरचनेतून तसा अर्थ निघत नसल्यास माझे अपयश!

धन्यवाद!

अर्थबोध करविल्याबद्दल धन्यवाद........मात्र गझल गूढ आहे हे निश्चित......पुनश्च वाचन करता,गझल अजून छान वाटली.

डॉ.कैलास गायकवाड

'बेफिकीर' या जगात नम्र राहणे बरे
गोल फक्त हा सजीव ठेवला असेल तर?
हे छान.

शब्दरचनेतून तसा अर्थ निघत नसल्यास माझे अपयश!

ही गझल/ तिचा आशय / आशयाची गुंतागुंत तुमच्या पूर्वीच्या विचारांशी जुळत नाही.

धन्यवाद अजय!

आपल्याला माझे पुर्वीचे विचार आठवत असल्यास कृपया तेही प्रतिसादात द्यावेत.

गुंतवू नकोस.... देह ठेवला असेल तर
मी उगाच एक डाव खेळला असेल तर?

असेल तर.. यामध्ये दोन उत्तरांची अपेक्षा वाटते. जी आपल्या स्पष्टीकरणात नाही.
माझ्या चितेपुढे उभे राहून रडणार्‍या दोस्ता, रडून मला पुन्हा या जगात गुंतवू नकोस. मी हा आयुष्याचा डाव उगाच खेळायचा म्हणून खेळलो होतो. मी त्याबाबतीत फारसा गंभीर नव्हतो. तुझ्या रडण्यामुळे मी उगाच पुन्हा गुंतायचो.
हे असेल तर ते. यामध्ये खेळलो होतो असे येणार नाही. तुम्ही, खेळला असेल तर? असे म्हटले आहेत. म्हणजे नसण्याचीही शक्यता आहे असे मला वाटते.
रचना आणि स्पष्टीकरण यात फरक असू नये असे पूर्वी तुम्ही म्हणायचात. ओळ स्वच्छ अर्थ सांगणारी हवी असे तुमचे मत. मला ते पटते. म्हणूनच ही रचना व स्पष्टीकरण यात मला फरक वाटला तो लिहिला.

म्हणजे मतला फसला म्हणायचा.

लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद!

अर्थहीनतेस अर्थ द्यायला हवाच का?
मी सहज म्हणून जन्म घेतला असेल तर?

छान !

अर्थहीनतेस अर्थ द्यायला हवाच का?
मी सहज म्हणून जन्म घेतला असेल तर?
>>> व्वा आवडला हाच शेर

काय माहिती ... जिला नमेन त्याच मूर्तिने
माणसापुढेच हात टेकला असेल तर?

अर्थहीनतेस अर्थ द्यायला हवाच का?
मी सहज म्हणून जन्म घेतला असेल तर?

हे दोन शेर आवडले!

शब्दरचनेतून तसा अर्थ निघत नसल्यास माझे अपयश!

खरंच नुसती गझल वाचून स्पष्ट अर्थबोध अजिबात झाला नाही.

आपण लता मंगेशकरचे एखादे गाणे मनात ऐकत गुणगुणत असतो...
तेव्हा इतरांना आपले गाणे बेसूर वाटते पण आपल्या मनात मूळ गाणे असल्याने आपल्याला ते जाणवत नाही.
तसं वाटतंय. तुमच्या मनातील सुंदर कल्पना या गझलेमार्फत आमच्यापर्यन्त पोहोचल्या नाहीत.

हम्म....! मजा नै आली राव.
पुढील गझलेच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे
[नम्र]

अनंत, मिलिद, ऋत्विक, बिरुटेसाहेब,

मनापासून आभार!

ऋत्विक - लता हे उदाहरण अगदी समर्पक. गझल बहुधा फसली असावी.

बिरुटेसाहेब - स्पष्ट प्रतिसादाबद्दल आभार!

थोडक्यात अर्थहीनतेस अर्थ द्यायला हवाच का?

खरे आहे चित्तरंजन,

मी आपले म्हणणे समजलो. गझल नेहमीप्रमाणे फसली असावी असे मलाही आता वाटत आहे.

मात्र अर्थहीनतेस अर्थ -

तो उर्दू लोकांनीच दिल्यासारखा वाटतो चित्तरंजन!

४० % तंत्र, ३० % तडजोड अन ३० % मूळ विचार असे गझलेचे स्वरूप दिसून येते असे वाटते.

(मीर, गालिबपासून प्रत्येक शायराच्या आयुष्यात शेरांमधील घटना नेमक्या किती प्रमाणात व कशा घडल्या असतील व शेरात कशा मांडल्या गेल्या असतील अशी शंका मला येते.)

असे वाटते की त्यामुळेच मुक्तछंद अन अक्षरछंद जास्त 'नेमके' ठरतात.

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! मला खूप बरे वाटले.