ती नदी गेली कुठे...

ती नदी गेली कुठे...

ती नदी गेली कुठे... झाडी कुठे
ती हवा गेली कुठे...पाणी कुठे

पाहिली नव्हती अशी घाई कधी
पाहिली नव्हती अशी गर्दी कुठे

जाणतो मी या उन्हाची कारणे
जाणतो मी चालली प्रुथ्वी कुठे

राहिली माया कुठे शब्दावरी
हरवली माझ्यातली आई कुठे

मळत नाही अ॑ग कोणाचे अता
राहिली गावामधे माती कुठे...

-वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

माझ्यातली आई व गावामधे माती हे दोन शेर आवडले.

छान गझल. मतल्यातील मिसरे स्वतंत्र वाटले. तसेच दुसर्‍याही शेराबाबत वाटले. 'मळत नाही अंग कोणाचे अता' या रचनेत फार मजा आली. पृथ्वी व उन्हाचा शेर नीटसा समजला नाही. रदीफ 'कुठे' असलेल्या गझला मुळातच एक तीव्रता आणतात असे काही गझला वाचून वाटते.

धन्यवाद!

शेवटचा शेर खास.
पहिल्या दोन शेरांबद्दल विचार करावा.

जाणतो मी या उन्हाची कारणे
जाणतो मी चालली प्रुथ्वी कुठे

राहिली माया कुठे शब्दावरी
हरवली माझ्यातली आई कुठे

छान वाटले हे शेर.

शेवटचे तीन शेर आवडले!

ती नदी गेली कुठे... झाडी कुठे

झाडी कुठे? हा प्रश्न अंगावर शहारा आणतो. जंगलेच्या जंगले मी नाहिशी होताना पाहिली आहेत.
तिरोडकर म्हणतात त्याप्रमाणे "नदीला नाला म्हंटले" मगच मिठी नदीने मुंबईला मीठी मारली.
छोट्या नद्यांचे ओढे किंवा नाले होत नंतर त्या नष्ट्च होताना दिसतात.
अप्रतिम मतला.

उत्तम गझल. शेवटचे दोन शेर तर फार फार आवडले. अभिनंदन!

प्रतिसादाबद्दल सर्वा॑चे आभार....

वैभव,
नेहमीचा दर्जा आणि तुझा स्पर्श. और क्या चाहिये!
जयन्ता५२

आईचा शेर आवडला