काय हा रस्ता तुझ्या शहरातला

काय हा रस्ता तुझ्या शहरातला
वाटतो प्रत्येक परका आपला

चांगले ठरवाल जेथे घालणे
पाय तेथे नेमका मी घातला

न्यायचा कोठे न जाणे शेवटी
केवढा अनुभव अताशा साचला

मी विचाराधीन व्हावे एकदा
बोलतो कोणीतरी माझ्यातला

मी भटांचे काव्य नाही वाचले
मी भटांचा लेख केवळ वाचला

लागते सोसायला इतके म्हणे
लागली ती प्रेमही शिकवायला

काय हे भलतेच डोहाळे हिचे
नांदते 'येथेच' आई व्हायला

तालुक्यांना जाउनी मी सांगतो
हा पहा माणूस हो शहरातला

'बेफिकिर' होण्यात इतके दु:ख की
भावना ओलावती सार्‍या तुला

गझल: 

प्रतिसाद

न्यायचा कोठे न जाणे शेवटी
केवढा अनुभव अताशा साचला

उत्तम शेर!

न्यायचा कोठे न जाणे शेवटी
केवढा अनुभव अताशा साचला

छान!

मी भटांचे काव्य नाही वाचले
मी भटांचा लेख केवळ वाचला

हाही छान आहे! मार्मिक!

अप्रतिम
काय हा रस्ता तुझ्या शहरातला
वाटतो प्रत्येक परका आपला

न्यायचा कोठे न जाणे शेवटी
केवढा अनुभव अताशा साचला

तालुक्यांना जाउनी मी सांगतो
हा पहा माणूस हो शहरातला
हे तीनही शेर खास!

मात्र,
मी भटांचे काव्य नाही वाचले
मी भटांचा लेख केवळ वाचला .... म्हणजे काय? आणि समजा वाचला... पुढे?

जोशीबुवांनी उल्लेख केलेले तीनही शेर चांगले.
भटांचा शेर संदिग्ध.

अजयजी,
असं काय करता!
मी भटांचे..... हा शेर मार्मिक आहे..
खरी गझल न वाचताच नुसती बाराखडी वाचून ट ला फ लावून गझल करणा-यांवर..
आणि पर्यायाने प्रत्येक ठिकाणी दिसून येणा-या अशा उथळपणावर.
.
.
.
.
.
.
.
.
.
(असे मला वाटते)

सर्वांचे आभार!

भटांबाबतच्या शेराचा अर्थ सांगण्या आधी थोडेसे:

मराठी गझल व सुरेश भट हे जवळपास समान अर्थी शब्द असल्यासारखे प्रचलीत आहेत. त्यामुळे यापुढे निदान काही दशके किंवा त्यांच्याइतकाच सर्वत्र सुप्रसिद्ध असलेला गझलकार दुसरा कुणी होत नाही तोपर्यंत हे दोन शब्द तसेच राहणार असे वाटते. यामुळे भटसाहेबांवर शेर रचण्याची इच्छा गझलकारांना होणे साहजिक आहे.

या शेराचा खालील पाचपैकी कोणताही अर्थ होऊ शकतो.

१. भटांचे काव्य वाचण्यापेक्षा लेख जास्ती चांगला आहे.
२. भटांचा लेख वाचल्यावर कुणीही नवोदीत कवी गझलकार होण्याचे शिक्षण प्राप्त करू शकतो. त्यासाठी काव्य वाचण्याची जरूर नाही.
३. भटांचा लेख वाचून गझल शिकणेच बरे! कारण त्यांचे काव्य वाचून मनावर प्रभाव पडू शकतो. त्यांच्यासारखे काव्य आपण रचायला गेल्यास धड ती उंचीही गाठता येणार नाही व आपल्याकडून हास्यास्पद गझला होतील.
४. ऋत्विकने सांगीतलेला अर्थ - लोक नुसती बाराखडी शिकून गझला पाडतात. (हे विधान कुणी करावे याबाबत माझ्या मनात हल्ली रास्त शंका निर्माण होत आहेत. हल्ली म्हणजे गेल्या चार सहा महिन्यात! कारण जे 'आम्ही गझला पाडत नाही' असे पटवायला येतात त्यांच्या स्वतःच्या गझलांमधे काहीही दम नसतो. त्यानी बहुधा 'होतकरू कवी ते अभ्यासक' हा प्रवास करून संपवलेला असतो. किंवा, काहींना 'गझलकार' म्हणून एखादे विशिष्ट स्थान कुणीतरी प्रदान केले की त्यांच्या गझला इतक्या दुर्मीळ होतात जणू दिलीपकुमारचा आगामी चित्रपट!अन तो चित्रपट आल्यावर कोसळतो.यापेक्षा बाराखडी वाचून गझला पाडण्याने निदान काहीतरी सुधारणा सातत्याने तरी होत राहते. इथे कुठे गझलेची परीक्षा द्यायचीय, करा पंधरा चुका अन शिका, या मताचा मी तरी आहे.)
५. भटांचा लेख सणसणीत व कायम ताजा ताजा असून त्यांचे काव्य मात्र समकालीन वाटत नाही. (अर्थात, याचे कारण माझ्या व भटसाहेब आज असते तर त्यांच्या वयातील साडे तीन दशके अंतर हेच आहे. आज माझ्या काळात गझल खूपच जास्त बदलायला हवी आहे असे मला वाटते. आजचे सगळे प्रश्नच वेगळे आहेत. याचे उदाहरण म्हणून भटसाहेबांचा एक मतला खाली देत आहे.)

फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते
वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते

प्रेयसी वयात येत असताना किंवा प्रेमास (प्रेम व्यक्त करण्यास ) अनुकुल काळ असताना मीच भानावर नव्हतो किंवा माझ्यासमोर काही वेगळेच प्रश्न आ वासून उभे होते. हा एकच अर्थ जर गृहीत धरला तर आजच्या काळात तो तितकासा लागू होताना दिसणार नाही. आज मुले व मुली फार लवकर सज्ञानही होतात व त्यांना 'शारिरीक आकर्षण' या माध्यमातून व इतर अनेक आजूबाजूच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करणे अत्यंत सुलभही झालेले आहे व ते ते करतातही. त्या गोष्टीवरचा संस्कृतीचा पुर्वीचा पगडा हळूहळू नष्ट होत आहे.

मी या पाचव्या अर्थाने तो शेर रचलेला आहे. चर्चा चालू राहिल्यास माझा फायदा होईल.

धन्यवाद!

बेफिकीरशी सहमत.

चर्चा चालू राहिल्यास माझा फायदा होईल.
याचे सुद्धा अनेक अर्थ..........?? :)

प्रेयसी वयात येत असताना किंवा प्रेमास (प्रेम व्यक्त करण्यास ) अनुकुल काळ असताना मीच भानावर नव्हतो किंवा माझ्यासमोर काही वेगळेच प्रश्न आ वासून उभे होते.
हा तुम्ही लिहिलेला अर्त जरी खरा मानला तरी तो आजच्या काळातही तसच आहे. म्हणून,
भटांचा लेख सणसणीत व कायम ताजा ताजा असून त्यांचे काव्य मात्र समकालीन वाटत नाही.
हे पटत नाही.

मी भटांचे काव्य नाही वाचले
मी भटांचा लेख केवळ वाचला

हा उपहासात्मक शेर आहे, असेच मलाही वाटले.
गझलकाराचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून असे म्हणतो, की या शेराचा अर्थ ऋत्विकने जसा सांगीतला, तोच समर्पक वाटतो.
फक्त लेख वाचून गझल करणे (पाडणे!) हे विषय समजून न घेता गाईडमधली उत्तरे पाठ करून पास होण्यासारखे आहे, असे माझे मत आहे.

'बाराखडी' हे खेळाचे नियम समजावून देणारी पुस्तिका आहे. पुढचा खेळ आपला आपण खेळायचा असतो. (हेही माझेच मत आहे.)

भटसाहेबांचे पुस्तक (लेख + काव्य) हे आपल्याला गझलेचे टेक्स्ट बूक वाटत असावे असे आपल्या प्रतिसादावरून वाटते. त्यांचा एक मतला आठवला.

चंद्र आता मावळाया लागला
प्राण माझाही ढळाया लागला

या गझलेतील काफिये नंतर त्यांच्या शिष्योत्तमांनी आपापल्या गझलेत वापरलेले स्पष्ट दिसतात. त्याबद्दल कुणीच काही म्हणू शकत नाही. पण 'ढळणे, वळणे' या क्रियापदांची इतर रुपे, जसे 'वळला, ढळली' वगैरेही न घेता 'ढळाया लागला, वळाया लागला' अशीच घेण्यावरून तेही एल्गार हे 'गझल' या विषयावरचे टेक्स्ट बूक असावे याच आपल्यासारख्या दृष्टीकोनाने बघतात की काय असे वाटते.

कल्पना करा, जर भटसाहेबांनी फक्त गझलाच पुस्तकात दिल्या असत्या तर तुम्ही अन मी आज इथे बोलतही नसतो. तसेही, मी वर दिलेल्या प्रतिसादानंतर आपल्याला आपला दुसरा प्रतिसाद का द्यावासा वाटला ते अजून माझ्या लक्षात येत नाही. पण अर्थातच, आपण तो देऊ शकताच व प्रतिसाद देण्याबद्दल आभार!

कल्पना करा, जर भटसाहेबांनी फक्त गझलाच पुस्तकात दिल्या असत्या तर तुम्ही अन मी आज इथे बोलतही नसतो.

माफ करा, मला असे वाटत नाही.
'गझलेची बाराखडी' हे पुस्तक (किंवा तत्सम मार्गदर्शनपर इतर पुस्तके, असल्यास) मी या साईटवर आल्यानंतरच वाचले, तेही अनेक दिवसानंतर.

तसेही, मी वर दिलेल्या प्रतिसादानंतर आपल्याला आपला दुसरा प्रतिसाद का द्यावासा वाटला ते अजून माझ्या लक्षात येत नाही.

प्रतिसादाच्या शेवटी 'चर्चा चालू रहावी' असे आपण म्हटले आहे.
'वर प्रतिसाद दिलेल्यांनी चर्चेत सहभाग घेऊ नये' असा उल्लेख केलेला नसल्याने मी दुसरा प्रतिसाद दिला. क्षमस्व.
(हवे असल्यास दोन्ही रद्द करतो.)

--ऋत्विकचे म्हणणे समर्पक वाटते-- इथपर्यंतचे आपले म्हणणे समजू शकतो.
पण
फक्त लेख वाचून गझल करणे (पाडणे!) हे विषय समजून न घेता गाईडमधली उत्तरे पाठ करून पास होण्यासारखे आहे, असे माझे मत आहे.

यातून आपला 'मी फक्त लेख वाचून गझल करतो' असा बहुधा गैरसमज झालेला दिसतो. मी माझ्या शेरात 'पाचवा' अर्थ आहे असे वर लिहिलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण जी क्लासटीचरची भूमिका घेतलेली आहेत त्याची फारशी जरूर नाही.

चर्चा चांगलीच रंगली आहे.
अवांतर....
हा संवाद पहा...
(पडदा उघडतो)
बेफिकीर : ज्ञानेश, तिळगुळ घ्या, गोड बोला
ज्ञानेश : बेफिकीर, तिळगुळ घ्या, गोड बोला
(पडदा)
पडद्यामागून ...
अजय : (एकटाच) मी माझे म्हणणे वाटल्यास मागे घेतो.पण, उगाच गैरसमज नको.
आsss आsss
मी गडे प्रेमात थोडे बोललो...
अन् तुझा का वेळ वाया चालला ?
हा हा हा हा (स्वतःच हसतो)