बुद्ध बाटला आहे

एक आकांत चालला आहे
ज्यामधे बुद्ध बाटला आहे

काढले गायला जरा जीवन
काय आवाज लागला आहे

आज भेटून पाहुयात पुन्हा
आजचा दिवस चांगला आहे

ओळ मेंदीस रंगवे माझी
शेर हातास लागला आहे

झोपडी बंगल्याहुनी मोठी
'गोल' संपूर्ण आपला आहे

शेकले मी मनास विरहाने
गारठा फार वाढला आहे

तेल वांग्यावरी वड्याचे हे
आज संभार सोडला आहे

गझल: 

प्रतिसाद

मला भला-बुरा कुठलाच प्रतिसाद आला नाही तर खरच वाईट वाटते. :-)) अर्थात, आग्रह असू शकत नाही. पण निदान मी वरील शब्दरचनेचा अभिप्रेत अर्थ सांगू शकतो. म्हणून लिहीत आहे. कृपया मार्गदर्शन व्हावे.

एक आकांत चालला आहे
ज्यामधे बुद्ध बाटला आहे

आत्मा शातताप्रिय असतो. माझ्या देहात वसणार्‍या आत्म्यालाही शांतता हवी आहे. मात्र आजूबाजूला असणार्‍या इंद्रियांना त्यांचे स्वतःचे हजार चोचले पुरवायचे आहेत. त्या इंद्रियांचा आकात चालला आहे. तो आकांत इतका वाढला आहे की आत्माही बाटला आहे.

काढले गायला जरा जीवन
काय आवाज लागला आहे

खरे तर जन्म घ्यायचा नव्हता. पण वेळ होता व विरंगुळा म्हणून पुन्हा एकदा घेऊन पाहिला. पण सूर काही बरोबर लागला नाही.

आज भेटून पाहुयात पुन्हा
आजचा दिवस चांगला आहे

जीवनाला उद्देशून रोज सकाळी मी असे म्हणतो असे म्हणायचे आहे.

ओळ मेंदीस रंगवे माझी
शेर हातास लागला आहे

कितीही अथक प्रयत्न केले तरी मला मुळात प्रयत्नच योग्य दिशेने करता येत नाहीत. गझल रचताना शेवटी सुमार दर्जाचे शेर लिहून होतात. आज बहुधा कसाबसा एक अर्थपूर्ण शेर रचू शकलो असणार, कारण ओळ ऐकून मेंदी रंगली आहे. ( ती खुष झाली आहे.)

झोपडी बंगल्याहुनी मोठी
'गोल' संपूर्ण आपला आहे

संपत्ती मिळवण्याला अंत नाही हे समजूनही पुन्हा त्याच मार्गावर मी का जातो समजत नाही. खरे तर लोभ सोडला तर पृथ्वीवर असलेले सर्व काही आपलेच आहे असे वाटू शकेल.

शेकले मी मनास विरहाने
गारठा फार वाढला आहे

अर्थ सरळ आहे असे वाटते. अर्थातच, 'भरतीचा शेर' असे नामकरण झाल्यास इलाज नाही. वेगवेगळ्या कालावधींमधे मी वेगवेगळ्या विरहांनी त्रस्त असतो. :-))

तेल वांग्यावरी वड्याचे हे
आज संभार सोडला आहे

रोज नीटनेटकी केशरचना करण्याची व केसांवर प्रेम करण्याची तिची वृत्ती असूनही आज केसांकडे ती दुर्लक्ष करत आहे व केस मोकळे सोडून फिरते आहे. याचे कारण काय असणार? माझ्या सततच्या प्रेमयाचनेला वैतागून बहुधा हा राग केसांवर निघाला असावा व मुद्दाम स्वतःच्या रुपाकडे दुर्लक्ष करण्यात येत असावे.

माफ करा, लिहिलेला अर्थ शब्दांमधून येत असेलच असा दावा नाही.

वाचकांचे धन्यवाद!