भग्न : मधुघट

विदूराच्या कुटीमध्ये सुखाने जेवला होता!
गडी होऊन नाथांच्या घरी तो राबला होता!

अता ह्या भग्न गाभार्‍यात नाही एकही मूर्ती
कुणाचा शाप येथे देवतांना भोवला होता?

तुझ्या ह्या चार शब्दांनी सखे मी मोकळा झालो!
जरासा गाळ माझ्याही तळाशी साठला होता!

सुगंधाचे हवेला हेलकावे कोठुनी मिळती?
तुझा संभार केसांचा कधी गे मोकळा होता?

न तू ओलांडला केव्हा, न मीही तोडला केव्हा..
कसा दोघांत दैवाने अडथळा टाकला होता?

अजूनी ताठ त्याचा वाटतो आहे कणा, मग तो..
कसा कोणापुढे केव्हा कशाला वाकला होता?

गझल: 

प्रतिसाद

शेवटचा शेर तिसरा शेर फार आवडले. 'मोकळा' हा काफिया जरा वेगळाच आला. मतल्यात दुसर्‍या मिसर्‍यात पहिल्याचा समारोप होतो की नाही लक्षात आले नाही. शेवटच्या शेरात फार सुंदर भावना आहे.

धन्यवाद!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद बेफिकिर...
>>>'मोकळा' हा काफिया जरा वेगळाच आला.....
'ल' ऐवजी 'ळ' अशी सूट घेतली म्हणून असं म्हणताय का? असं चालणार नाही का? रसभंग होतो की नियमभंग?

अर्थातच नियमभंग! रसभंग होण्याचा प्रश्नच नाही.

हा गालिबचा एक शेर बघा:

जराहत तोहफा अल्मास अर्मुगा दागे जिगर हदिया
मुबारक बात असद गमख्वारे जाने दर्दमंद आया

तोहफा - तोफा
बात असद - बातसद

वाट्टेल ते शब्द त्याने (उच्चाराप्रमाणे) एकत्र केलेले / बदललेले आहेत. तरी रसभंग होत नाही. कारण शेर ऐकताना रसिक उच्चाराप्रमाणे (बहुतांशीवेळा) ऐकतो. वाचताना हे असले प्रश्न येऊ शकत असतील. आता मोकळा या शब्दाला ऐकताना 'आत्तापर्यंत मी ला हा शब्द ऐकत होतो' असे भर मैफिलीत रसिक थोडेच म्हणणार आहे? 'ळा' तर 'ळा'!

गालिबचा वरील शेर बहुधा 'मतला' असावा असे वाटते. डॉ. ढवळे जास्त सांगू शकतील. जर हा शेर मतला असला तर त्यातही घोळ वाटतो. असो.