जबरदस्तीचा कवी मी, गझल माझी जुळवलेली

प्रकृतीची साथ आहे जीवनाला हासताना
पण हसे होणार आहे श्वास माझा संपताना

बाप, आई, मित्र, भाऊ, बायको, हा देह, कविता
यातले नसणार कोणी जन्म इथला सोडताना

त्रस्त केले माणसांना मी हयातीभर स्वतःच्या
तीच ती रडतील बहुधा प्रेत माझे जाळताना

फुंकरीने कण उडावा एवढे अस्तित्व माझे
गर्व सूर्याहून मोठा माणसांशी वागताना

वाढत्या साऱ्या अपेक्षा, वाढती माझी तयारी
देव मी विसरून गेलो दौलती सांभाळताना

पाच खोल्या बांधल्या अन घेतली गाडी तरीही
वाटतो आराम कोठे पाठ थोडी टेकताना?

जन्मले कोणीच नाही नाव लावायास माझे
साजरा झाला असावा वंश माझा खुंटताना

जेवढे कर्तव्य पाळावे इथे, थोडेच आहे
माणसांनी काढल्या होत्या चुका नावाजताना

कायदे येथे निसर्गाच्या विरोधी चालणारे
फाटते व्यक्तीत्व दोघांच्याप्रमाणे ताणताना

काल आलो, आज गेलो, कोण होतो काय जाणे
एक हा टवका उडाला देव दुनिया कोरताना

जबरदस्तीचा कवी मी, गज़ल माझी जुळवलेली
माणसे हसतील बहुधा बेफिकीरी वाचताना

गझल: