...लाभले

गोड शब्दांचीच रोपे लावणारे लाभले
कौतुकाने काळजाला टोचणारे लाभले

शालजोडीतून करिती वार ते माझ्यावरी
लक्तरेही वाचलेली ओढणारे लाभले

नेसलेले सोडताना नाचले बेभान ते
षंढ होउन तो तमाशा पाह्णारे लाभले

झोपडीला जाळताना हात नाही कापले
गंध राखेचे कपाळी फासणारे लाभले

ऐनवेळी वास्तवाला टाळणारे भेटले
कर्तव्याला भावनेशी गुंफणारे लाभले.

गझल: 

प्रतिसाद

नेसलेले सोडताना नाचले बेभान ते
षंढ होउन तो तमाशा पाहणारे लाभले

वाह .. जबरदस्त शेर आहे !!!

धन्यवाद
सुरेश भट संकेतस्थळाव्रर असा प्रतिसाद म्हणजे

हे ख्ररे धन आज मजला भ्ररभरुन ते लाभले.

छान आहे गझल.
'लक्तरेही वाचलेली' ऐवजी 'वाचलेली लक्तरेही ओढणारे लाभले' असा बदल केल्यास जास्त चांगले वाटेल.

शुभेच्छा.

चांगली रचना! अभिनंदन! मला तीन गोष्टी लिहाव्याश्या वाटल्या. कृपया गैरसमज नसावा.

- शेवटच्या मिसर्‍यात 'कर्तव्याला' यात एक मात्रा जास्त होत असावी.

- प्रत्येक पहिल्या ओळीचा प्रभावी समारोप दुसर्‍या ओळीत होत आहे किंवा नाही याबाबत मला शंका वाटली.

- आशय जरा जास्त संदर्भासहित यायला हवा होता असे वाटले.

धन्यवाद!

धन्यवाद,
आकाशजी, खूप मोठ्ठी दाद.
ज्ञानेशजी, आपण सुचवलेला बदल निश्चितच चांगला आहे. ऐकायला आणि वाचायलाही सहज वाटते. धन्यवाद.
बेफिकीरजी, अभिनंदनाबद्द्ल व सूचनांबद्द्ल धन्यवाद.

बेफिकीरजी,
' कर्तव्याला ' मध्ये क वर आघात होऊन तो दीर्घ झाला, र्त ची एक मात्रा झाली. तुम्हाला असे तर सुचवायचे नाही ना की, पुढ्च्या 'व्या' मुळे र्त दीर्घ होइल. मी जरा गोंधळलो आहे. मार्गदर्शन केल्यास आभारी राहीन. धन्यवाद.

माझ्यामते 'कर्तव्य' या शब्दात 'त' चा उच्चार करताना त्यावर 'व्य' चा भार पडतो. चु.भु.द्या.घ्या

नियमानुसार जोडाक्षराच्या आधीचे अक्षर 'लघु' असले तरी 'गुरु' वाचले जाते. त्यामुळे 'र्त' गुरु घ्यावा लागत आहे आणि मात्रा वाढत आहे.

बेफिकीर, मधुघटजी
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.