ती ध्वनिफीत

एका ध्वनिफीतीबाबत आपल्याला सांगायचे होते.
१९९६ साली 'क्षितिज' या नावाची ध्वनिफीत प्रकाशित करण्यात आली. समीर दाते व दीपाली सोमैय्या यांचे आवाज होते. रवी दाते यांचे संगीत होते. शांता शेळके यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या ध्वनिफितीत डॉ.श्रीराम लागू यांचे प्रास्ताविक निवेदन होते. हिमांशू कुलकर्णी यांच्या रचनांची ही ध्वनिफीत गझल संग्रह म्हणून बाजारात आली होती.
उत्सुकतेपोटी मी ती विकत घेतली आणि ऐकली तेव्हा लक्षात आले की, या ध्वनिफितीत गझला नाहीत. आहेत त्या गझलसदृश वृत्तबध्द रचना. रदीफ-काफिया-अलामत..कोणताही नियम पाळलेला नव्हता.
संगीत, आवाज आणि त्या द्विपदीतील अर्थ या दृष्टीने त्या रचना गुणगुणण्यासारख्या होत्या.
श्री.दाते यांनी यापूर्वी 'अंतरंग' ही भटांच्या गझलांची दर्जेदार ध्वनिफीत केली होती. सुरेश वाडकर गायक होते.
मला प्रश्न पडला- रचना गुणगुणण्यासारख्या असल्या तरीही दाते यांच्यासारख्या जाणकारांकडून ही अशी ध्वनिफीत केली जावी?
त्यावेळी एका गझलकारांकडे जायचा योग आला. त्यांना या फितीबाबत विचारल्यावर ते म्हणाले, ही ध्वनिफीत माझ्याकडेही आहे. त्यात गझला खासच नाहीत. पण आपण आता याबाबत काय करणार?

ध्वनिफितीतील काही मासलेवाईक 'मतले' व 'शेर' असे:
१.तोडून पाश सारे मी आज दूर आलो
मी सावलीहि माझी विसरून दूर आलो

येवो खुशाल आता तूफान सागरात
सोडून मी किनारा केव्हाच दूर आलो

२. क्षितिजावरी थांबेन मी, तू हाक मजला दे जरा
वा-यातुनी, लाटांतुनी.. तू हाक मजला दे जरा

३.फुलल्या कळ्या कळेच्या, अश्रू खजील झाले
वणव्यात वेदनांच्या हासू जळून गेले

काळाच्या उदरात ती ध्वनिफीत आता कुठल्याकुठे गायब झाली आहे.

गझलचर्चा: 

प्रतिसाद

चांगली माहिती केदार!

मला वाटते व्यावसायिक कारणांमुळे दाते यांनी ती ध्वनिफीत केलेली असणार.

रसिक व श्रोते यांना गझल आहे की नाही याच्यात फारशी दिलचस्पी नसणार. गुणगुणता आले व जरा अर्थ चांगला असला की पुरते. अग्गोबाई, ढग्गोबाई पण चालते.

(संध्याकाळी आठ वाजताचा प्रतिसाद)

-बेफिकीर!

आता अशी ध्वनीफित बाजारात आली, तर कदाचित अशी चूक होणार नाही.
झाली तरी लगेच निदर्शनास आणली जाईल, असे वाटते.

अवांतर- 'अग्गोबाई' बालगीत आहे. मुलांना आवडण्यासारखे आहे. मुलांना आवडते.

ज्ञानेश,
चूक होणारच नाही, असे नाही. गझल म्हणून लोक काहीही खपवतील, खपवतात.
अनेकदा, गझल म्हणून गायनाच्या कार्यक्रमात साधे गीत गायले जाते. स्पर्धेसाठी स्पर्धक गझल म्हणून काहीही पाठ करतात. लेखक संदर्भ देताना बरेचदा भलत्याच गीताचा गझल म्हणून उल्लेख करतात. एखाद्या चित्रपटातील गाण्यात चंद्र, रात, विरह असे उल्लेख असले आणि 'मखमली आवाजाच्या' एखाद्या गायकाने ते गीत गायलेले असले तर ते सर्रास गझल म्हणून खपवले जाते.
माधुरी दीक्षितचा 'मृत्युदंड' नावाचा चित्रपट आला होता. त्यात साधे गीत होते. चित्रपटाच्या समीक्षेत मी त्याचा उल्लेख 'गझल' असा वाचला होता.

केदार,
तुमच्या आताच्या प्रतिसादाच्याबाबतीत मी पूर्णपणे आपल्याशी सहमत आहे. आपण मृत्युदंडबाबत बोललात. पण, मलमली तारुण्य अजूनही गझल म्हणूनच सादर केली जाते. झीवरील सारेगमप मध्ये एकदा परिक्षकांकडूनही 'अगं, ही गझल आहे गझल...' असे म्हटल्याचे मला आठवत आहे.
एकदा का एखादा कवी गझलकार म्हणून उदयाला आला आणि प्रसिद्ध झाला की तो जे लिहील ती गझल असे समीकरण होवून गेले आहे. मुळात, गझल लिहिणे हा प्रतिष्ठेचा विषय झाल्याने तुम्ही म्हणालात तसे होत असेल. त्याचप्रमाणे, कित्येक चांगल्या गझलांना अतिशय पोचट चाली लावून खपविल्या जातात. गझलकारांनीही याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. केवळ सीडीज् काढण्यापेक्षा त्यातील सर्व गोष्टींवर लक्ष द्यावे.