ते जीवच वेडे होते

ते जीवच वेडे होते, झुंजून रणी मरणारे
झोतात पुढे आले ते, मागे झेंडे धरणारे

त्यांच्या न्यायाचा डंका, उंदरास मांजर साक्षी!
कैदेतुन निसटुन जाती, अक्षम्य गुन्हे करणारे

आपलेच आपण गाती पोवाडे मर्दुमकीचे,
म्हणती गजराज स्वतःला, मुंगीला घाबरणारे

वादंग जरी वरवरचे, आतून सारख्या खोडी,
ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे!

त्यांनीच विषारी जाती पैदा केल्या सापांच्या,
अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच साप धरणारे!"

कित्येक पिढ्यांच्या नावे जमवून ठेवली माया,
निश्चिंत, सुखी झाले ते; मरतील, मरो मरणारे!

गझल: 

प्रतिसाद

सुंदर, ओघवती रचना !
गझल फार आवडली.

सामाजिक रचना! मतल्याचा आशय आवडला. खूपच प्रवाही शब्दरचना आहे. आवडली.

एक मत मनात आले. मतल्यात जर अक्षरगण वृत्त नक्की होत असेल तर पुढे त्याचे मात्रावृत्त होऊ नये असे. पण इतके क्लिष्ट वागण्यात काही मतलबही नाही. आपण मतल्यात 'साशंक' वृत्त घेतले आहेत, ते पुढे तसेच जाणवले नाही म्हणून मनात आले. या ओळी आवडल्या:

ते देखावे बघणारे, हे देखावे करणारे!

त्यांनीच विषारी जाती पैदा केल्या सापांच्या,

झोतात पुढे आले ते, मागे झेंडे धरणारे

सुंदर गझल. मतला, गजराज आणि देखावे हे शेर विशेष आवडले.

त्यांनीच विषारी जाती पैदा केल्या सापांच्या,
अन् पाठ थोपटुन घेती, "आम्हीच साप धरणारे!"

वा. फार चांगल्या ओळी.

कित्येक पिढ्यांच्या नावे जमवून ठेवली माया,
निश्चिंत, सुखी झाले ते; मरतील, मरो मरणारे!

वा. खालची ओळ तर मस्तच. मरतील मरो मरणारे मस्त आले आहे.

एकंदरच अगदी प्रभावी गझल आहे.

ते जीवच वेडे होते, झुंजून रणी मरणारे
झोतात पुढे आले ते, मागे झेंडे धरणारे
या ओळी छान आणि मार्मिकही आहेत.

कित्येक पिढ्यांच्या नावे जमवून ठेवली माया,

आपल्या या मिसर्‍यावरून कवीवर्य श्री. म. भा. चव्हाण यांचा एक मतला आठवला.

स्वातंत्र्यसैनिकांनो खुर्च्या धरून ठेवा
आपापल्या मुलांच्या सोयी करून ठेवा

( अवांतर - हा त्यांचा मतला मला एका चहावाल्याने ऐकवला. भटसाहेब म्हणायचे ते खरे आहे. गझल आम माणसाचीच असते व आम माणसालाच आवडते व आम माणसालाच आवडायला पाहिजे.)