हे जीवना तुझी टपरी चालते मला

वेळेस ही नशा दुखरी चालते मला
हे जीवना तुझी टपरी चालते मला

ही सूट माहिती नव्हती, आज जाणली
केव्हातरी छटा हसरी चालते मला

वाकून वाट आठवते, एवढे पुरे
माझ्या-तुझ्यात खोल दरी चालते मला

रजकापुढे नमून म्हणे 'चाचणी करू'
'बोरास चालते शबरी', चालते मला

गजलेत हारणे जमले, एवढे पुरे
काही असो नसो पदरी, चालते मला

शुद्धीत यायलाच नको वाटते मला
शुद्धीत भेटलात तरी चालते मला

संपर्क राहण्यापुरते ठेव बोलणे
खोटी असून 'मीच खरी' चालते मला

माझ्या घरात सर्व ऋतू कोंडलेत मी
रोजी नवीन घोळ घरी, चालते मला

ही वाट नेमकी कुठली? पोचते कुठे?
भेटेल वा नसेल हरी, चालते मला

नाहीतरी जगात अमर कोण जाहले?
झालास 'बेफिकीर' जरी, चालते मला

गझल: