क्षणांची मीलने

क्षणांची मीलने देतात 'कालातीत' संतुष्टी
मला जाणायची नाही तुझी माया, तुझी सृष्टी

नवे काहीच नाही का तुझ्या विश्वामधे देवा?
तिथे आधीच असते मन जिथे पोचेल ही दृष्टी

दिसेना पंच डोळ्यांना, कसोटी चालली आहे
पुन्हा मागायची खेळी, पुन्हा सोडायची यष्टी

म्हणाले जानवे 'पेला जरा थोडा भरा माझा'
तशी जाणीव झाली की असावी आज संकष्टी

रजेचा अर्ज कृष्णाचा युगे स्वीकारती आता
अता द्यूतात लावो पांडवांना द्रौपदी द्रष्टी

जिथे जातो तिथे गर्वात जातो एवढ्यासाठी
मलाही चांगदेवासारखी लाभेल पासष्टी

युती केली, दिला दैवास बाहेरून पाठिंबा
पटो वा ना पटो काही, तरीही द्यायची पुष्टी

मिळाला वृक्ष वेलीला नवा भरदार पानांचा
जुने, निष्पर्ण, एकाकी बिचारे झाड ते कष्टी

जनूके आपलीसुद्धा हवे ते भोग देणारी
कशाला घ्यायची आता कुणाची चुंबने उष्टी?

प्रहारांनी फुका बदलायचो रेषा कपाळाच्या
निघाले आत सव्वालाख जेव्हा खोलली मुष्टी

मनाला एवढे समजायलाही सत्तरी येते
'सुरू होते नवी तृष्णा, जुनी होते जशी तुष्टी'

तुझ्या त्या श्रावणासाठी किती रेंगाळलो होतो
हिवाळा लागला तेव्हा मिळाली 'बेफिकिर' वृष्टी

(सूट - काही शेरांमधील अलामत)

(अन्यत्र प्रकाशित)

गझल: 

प्रतिसाद

'ष्टी' असं यमक घेतल्यावर मला वाटलं आता काही शेर बळेच घुसणार,
पण तसं अजिबात न होता उलट उत्तम ओघवती गझल झालीये!

जनूके आपलीसुद्धा हवे ते भोग देणारी
कशाला घ्यायची आता कुणाची चुंबने उष्टी?


मनाला एवढे समजायलाही सत्तरी येते
'सुरू होते नवी तृष्णा, जुनी होते जशी तुष्टी'

तुझ्या त्या श्रावणासाठी किती रेंगाळलो होतो
हिवाळा लागला तेव्हा मिळाली 'बेफिकिर' वृष्टी

हे विशेष आवडले!

म्हणाले जानवे 'पेला जरा थोडा भरा माझा'
तशी जाणीव झाली की असावी आज संकष्टी

संकष्टीला जानव्यासाठी कसला पेला भरतात ते कळले नाही
मला वाटलं जानवं म्हणतंय 'पेला जरा थोडा भार माझा'

ऋत्विक

धन्यवाद!

१. ष्टी - हे यमक आहे. 'अंत्ययमक' नाही.

२. जानव्यासाठी पेला - 'मद्याचा'! संकष्टी असल्याने जानवे म्हणाले 'आज जरा कमी घाला'! मी स्वतः घरात जानवे असूनही घालत नाही. उगाच, पेले भरायचे अन मग 'जरा कमी भरा म्हणायचे' :-))

मनापासून आभार!