गंधीत रात आहे

गंधीत रात आहे, हातात हात आहे
ही कल्पना मनाला फसवून जात आहे

विरहात मी इथे अन स्वप्नात ती स्वतःच्या
मीही भरात आहे, तीही भरात आहे

दुनियेत येउनी या मोफत जगा कुणीही
जे आमच्यात आहे, ते आमच्यात आहे

शोधून काढले मी माझ्या खुळ्या मनाला
थोडे तुझ्यात होते, बाकी तुझ्यात आहे

कोणी स्वतःप्रमाणे भेटायचेच नाही
'जे जे मनात आहे, ते ते मुखात आहे'

गझल: 

प्रतिसाद

मतलाच खूप आवडला..
सहज आलाय..

दुसरा आणि चवथा शेरही मस्त..

बाकी डोक्यावरून!!! :-)

बाकी डोक्यावरून!!! :-)

आनंदयात्री,

माझी चक्क तीन महिन्यांपुर्वीची (गझल) वर आणण्याबद्दल मनापासून आभार!

'डोक्यावरून'वाल्या शेरांचा अभिप्रेत अर्थः

दुनियेत येउनी या मोफत जगा कुणीही
जे आमच्यात आहे, ते आमच्यात आहे

'दुनिया' या शब्दासाठी मन किंवा हृदय गृहीत धरावेत अशी विनंती! लोक आपल्या मनात प्रवेश देण्यासाठी किती अवाजवी मूल्य मागतात. मी फुकट लोकांना मनात ठेवून घेतो. मी जसा आहे, तसा फक्त मीच आहे.

कोणी स्वतःप्रमाणे भेटायचेच नाही
'जे जे मनात आहे, ते ते मुखात आहे'

माझ्या मनात जे असते तेच मी बोलतो. 'जगाला काय ऐकायला / वाचायला आवडेल' याचा विचार करत बसत नाही. माझ्यासारखे इथे (जगात) मला कुणी भेटायचेच नाही हे नक्की!

पुन्हा धन्यवाद!

खुप छान. गंधीत रात आवडले.

okkk....
दुनियेत येउनी या मोफत जगा कुणीही
जे आमच्यात आहे, ते आमच्यात आहे
याचा अर्थ तुम्ही सांगितलात तेव्हाच कळला. हा अर्थ शेरामधून येत नसावा.. (ते तुमच्या ..गृहीत धरावे या विनंतीवरूनच कळतंय..)

कोणी स्वतःप्रमाणे भेटायचेच नाही
'जे जे मनात आहे, ते ते मुखात आहे'
यात सुटे मिसर्‍यांचे अर्थ वेगळे आहेत आणि शेर म्हणून ते एकत्र आल्यावर तुम्ही दिला म्हणून अर्थ कळला...
चुभुद्याघ्या...

गझल चांगली झालीये..
मतला तर मस्तच..दुसरा आणि चवथा शेरही मस्त.
शेवटचाही चांगला आहे.

मतला खूप आवडला..
चवथा शेरही मस्त..

पूर्ण गझलच फार सुंदर आहे ...

पाठ करून ठेवतो. झाडून सगळे शेर फाडू!!!

एक शं का आहे.
गझलेचा शेवटचा शब्द 'ना' असेल तर दुसर्‍या ओळीत 'णा' वापरू शकतो का?

नाही

गझलेचा म्हणजे तुम्हाला मतल्यातील शेवटचा शब्द असे म्हणायचे आहे ना...
गझल काफिया रदीफयुक्त अथवा गैरमुरद्दफ ( रदीफविना) जरी असली.. तरी'' ना'' चा ''णा ''करता येत नाही.

डॉ.कैलास

व्वा पहिले दोन आवडले