लिहायचे ते लिहून टाकू
लिहायचे ते लिहून टाकू इथे कुणाची फिकीर आहे?
कुणी न येथे हुजूर माझा न मी कुणाचा वजीर आहे
हवी कशाला पुढील जन्मातली तुझी गोड गोड वचने
क्षणावरी शंभरी उधळण्या मुळात कोणास धीर आहे?
जुनाट सीत्कार मीलनाचे कुशीत कंटाळतात तेव्हा
मनामनांना पटून जाते 'पुढ्यात आता शरीर आहे'
'विरू नये डौल' या भयाने मुलास माता जवळ करेना
मनात येथे 'पगारवाढी', स्तनात नाकाम क्षीर आहे
अनेकवेळा सुधारण्याचा विचार आला, फसून गेला
कुणीतरी आपल्यात आहे स्वभाव ज्याचा फुटीर आहे
क्षणाक्षणांना विचार साऱ्या, गुपीत माझ्या यशस्वितेचे
'जगायलाही अधीर आहे, मरायलाही अधीर आहे'
उन्हात सुनसान एक रस्ता, घरे न झाडे, तहान केवळ
तिथे निरुद्देश चालणारे अनाथ जीवन फकीर आहे
समुद्र त्याच्या विशालतेला जिथे तिथे गाजवून गेला
तहानला की पुन्हा विचारेल 'सांग कोठे विहीर आहे'
समान अर्थी असूनही शब्द, हौस भारीच या जगाला
अनर्थ म्हणजे 'पदोपदी' अन सुदैव म्हणजे 'उशीर' आहे
'तुझ्याविना का जगू' वगैरे, असा कधी प्रश्न येत नाही
तसा गळा काढण्यास येथे अमीर आहे नि मीर आहे
उतारवयही कबूल करते, 'घड्याळ घालायचे कशाला? '
(अजून थोडे, अजून थोडे, समोर आलाच तीर आहे)
हजारदा एक एक नाते जपायला टाकले रफूला
नव्या नव्या अस्तरांमुळे ही त्वचा मनाची फुगीर आहे
तृतीयपंथी जगात दावा उगाच मर्दानगी कशाला?
हरेक चोळी बधीर येथे, हरेक 'लुगड्यात वीर' आहे
मनात येते तुका बनावे, मनात येते कबीर व्हावे
मधेच ती आठवून जाते मुळात मी 'बेफिकीर' आहे
(इतरत्र प्रकाशित)
प्रतिसाद
ऋत्विक फाटक
शुक्र, 13/11/2009 - 14:17
Permalink
जुनाट सीत्कार मीलनाचे कुशीत
जुनाट सीत्कार मीलनाचे कुशीत कंटाळतात तेव्हा
मनामनांना पटून जाते 'पुढ्यात आता शरीर आहे'
वा: 'मनामनांना पटून जाते' सुंदर!
अनेकवेळा सुधारण्याचा विचार आला, फसून गेला
कुणीतरी आपल्यात आहे स्वभाव ज्याचा फुटीर आहे
उन्हात सुनसान एक रस्ता, घरे न झाडे, तहान केवळ
तिथे निरुद्देश चालणारे अनाथ जीवन फकीर आहे
उतारवयही कबूल करते, 'घड्याळ घालायचे कशाला? '
(अजून थोडे, अजून थोडे, समोर आलाच तीर आहे)
केवळ अप्रतिम! किती सुरेख जुळलीये दुसरी ओळ!
मनात येते तुका बनावे, मनात येते कबीर व्हावे
मधेच ती आठवून जाते मुळात मी 'बेफिकीर' आहे
छान! इथेही छान जमलाय शेवट!
बेफिकीर
शुक्र, 13/11/2009 - 14:25
Permalink
धन्यवाद ऋत्विक! मनापासून
धन्यवाद ऋत्विक!
मनापासून आभार!
अजय अनंत जोशी
शनि, 14/11/2009 - 12:29
Permalink
लिहायचे ते लिहून टाकू इथे
लिहायचे ते लिहून टाकू इथे कुणाची फिकीर आहे?
कुणी न येथे हुजूर माझा न मी कुणाचा वजीर आहे
अनेकवेळा सुधारण्याचा विचार आला, फसून गेला
कुणीतरी आपल्यात आहे स्वभाव ज्याचा फुटीर आहे
क्षणाक्षणांना विचार साऱ्या, गुपीत माझ्या यशस्वितेचे
'जगायलाही अधीर आहे, मरायलाही अधीर आहे'
'तुझ्याविना का जगू' वगैरे, असा कधी प्रश्न येत नाही
तसा गळा काढण्यास येथे अमीर आहे नि मीर आहे
वरील शेर सुंदर. पहिला शेर विशेष. बाकी दोन छान.
मनात येते तुका बनावे, मनात येते कबीर व्हावे
मधेच ती आठवून जाते मुळात मी 'बेफिकीर' आहे
ती म्हणजे कोण?
बेफिकीर
शनि, 14/11/2009 - 18:50
Permalink
महाकवी ग्रेस म्हणतात की
महाकवी ग्रेस म्हणतात की त्यांना त्यांची कविता कळत नाही.
आम्ही आपले साधेसुधे कवी! आम्हाला कळते आमची कविता!
आमच्या गझलेत 'ती' कोण असणार? 'ती' म्हणजे बायको!
आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार!
अजय अनंत जोशी
शनि, 14/11/2009 - 22:38
Permalink
आमच्या गझलेत 'ती' कोण असणार?
आमच्या गझलेत 'ती' कोण असणार? 'ती' म्हणजे बायको!
तुमच्या गझलेत 'ती' कोण असणार हे तुम्ही जाणता. पण, तटस्थ माणूस कसा काय जाणणार?
तुमचेच पूर्वीचे लेखन पहा.
माझ्या मते 'ती' टाळूनही शेर जमला असता. कारण, 'बेफिकीर' हे नाव. त्याचप्रमाणे मनात येते ऐवजी कधी वाटते असे घेतले तर....
कधी वाटते तुका बनावे, कधी वाटते कबीर व्हावे
मधेच हे आठवून जाते, ''मुळात मी 'बेफिकीर' आहे''
बाकी, निर्णय तुमचाच.
धन्यवाद.
बेफिकीर
रवि, 15/11/2009 - 08:24
Permalink
हे पण चांगले किंवा खरे तर
हे पण चांगले किंवा खरे तर जास्त चांगले आहे बर का अजय!
कधी वाटते तुका बनावे, कधी वाटते कबीर व्हावे
मधेच हे आठवून जाते, ''मुळात मी 'बेफिकीर' आहे''
(वृत्तापासून किंचित फारकत आहे म्हणा!)
गूड वन!
आभार!
अच्युत
रवि, 15/11/2009 - 15:17
Permalink
>>जुनाट सीत्कार मीलनाचे कुशीत
>>जुनाट सीत्कार मीलनाचे कुशीत कंटाळतात तेव्हा
मनामनांना पटून जाते 'पुढ्यात आता शरीर आहे'
वा वा, सुंदर
मधुघट
मंगळ, 17/11/2009 - 19:13
Permalink
खरोखर सुंदर गझल आहे.! खूप
खरोखर सुंदर गझल आहे.! खूप आवडली!
चित्तरंजन भट
बुध, 18/11/2009 - 11:52
Permalink
एकंदर गझल छान. काही सुट्या
एकंदर गझल छान. काही सुट्या ओळी फार चांगल्या आहेत व तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ओळी सुचतात. खूप लिहिणे गुन्हा नाही. पण लिहायचे ते लिहून 'टाकू' नये. शहाणपणाचे लक्षण नाही, असे बुजुर्ग म्हणून गेले आहेत.
बेफिकीर
गुरु, 19/11/2009 - 19:15
Permalink
खरे आहे चित्तरंजन, मान्यही
खरे आहे चित्तरंजन,
मान्यही आहे.
तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ओळी सुचतात
एवढे मात्र खरच प्रामाणिकपणे समजले नाही. कृपया कळावे. 'मला माझ्या स्वतःच्या ओळी सुचतात म्हणजे काय' इतके समजले नाही.
प्रतिसादाबद्दल आपले व सर्वांचे धन्यवाद!
या निमित्ताने सांगायला हवे की प्रत्येक शेरातील 'ती' म्हणजे बायको नाही. :-))
-'बेफिकीर'!
अर्चना लाळे
शुक्र, 20/11/2009 - 07:24
Permalink
हजारदा एक एक नाते जपायला
हजारदा एक एक नाते जपायला टाकले रफूला
नव्या नव्या अस्तरांमुळे ही त्वचा मनाची फुगीर आहे
अहो अधी रफू कसे करतात ते शिका. रफू करताना एकावर दुसरे अस्तर येत नाही.
'विरू नये डौल' या भयाने मुलास माता जवळ करेना
मनात येथे 'पगारवाढी', स्तनात नाकाम क्षीर आहे
तृतीयपंथी जगात दावा उगाच मर्दानगी कशाला?
हरेक चोळी बधीर येथे, हरेक 'लुगड्यात वीर' आहे
हे तर अतिशय घाण आहे.
ही गझल आअहे की घाणेरडे काव्य?
ऋत्विक फाटक
शुक्र, 20/11/2009 - 13:09
Permalink
@ अर्चना लिहायचे ते लिहून
@ अर्चना
लिहायचे ते लिहून टाकू इथे कुणाची फिकीर आहे?
कुणी न येथे हुजूर माझा न मी कुणाचा वजीर आहे
या ओळीच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहेत!
आणि हो......ही गझलच आहे,
कवी आह्निके उरकल्यासारख्या कविता करत नाही, एखाद्या भावनेच्या भरात त्याला ओळी सुचतात.
तो एक कलाकार असतो.
तुमच्या तक्रारी जर प्रमाण धरल्या तर सगळ्या उत्तमोत्तम शिल्पांना चड्ड्या घालाव्या लागतील.
तांदूळ निवडल्यासारख्या कविता वाचण्याची ही अतिशय 'घाणेरडी' सवय आहे.
कलेचा आस्वाद घ्यायला हवा.
आपल्या शालेय अभ्यासक्रमात 'कलास्वाद' हा विषय असायला हवा या माझ्या मताला तुमच्या प्रतिक्रियेमुळे पुराव्यासकट पाठिंबा मिळाला......त्याबद्दल धन्यवाद!
बेफिकीर
शनि, 21/11/2009 - 00:16
Permalink
अर्चनाजी, आपला रसभंग झाला
अर्चनाजी,
आपला रसभंग झाला याबद्दल दिलगीर आहे. यापुढे काळजी घेईन.
खरे तर मला 'रफू' ऐवजी 'ठिगळ' हा शब्द वापरायचा होता. पण त्यातही अस्तर येऊ शकले नसतेच व कंटाळाही आला होता व 'अस्तर' हवे तर होते. :-)))
ऋत्विक,
पुन्हा मनापासून आभार!
आपल्या लिखाणामुळे बळ आले.
ज्ञानेश.
शनि, 21/11/2009 - 00:30
Permalink
ऋत्विक फाटक याच्याशी सहमत
ऋत्विक फाटक याच्याशी सहमत आहे.
अर्चनाताई- फुले, चंद्र, अश्रू यांच्यापलीकडे जातात काही कविता. आपण मन मोकळे ठेवले पाहिजे!
प्रसाद लिमये
शनि, 21/11/2009 - 20:35
Permalink
लिहायचे ते लिहून टाकू इथे
लिहायचे ते लिहून टाकू इथे कुणाची फिकीर आहे?
कुणी न येथे हुजूर माझा न मी कुणाचा वजीर आहे
मस्त... मतला छान :)
बाकी शेर आवडले पण मतला जास्त आवडला
"उशीर" वाला शेर कळला नाही
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रवि, 22/11/2009 - 10:44
Permalink
जुनाट सीत्कार मीलनाचे सीत्कार
जुनाट सीत्कार मीलनाचे
सीत्कार म्हणजे काय ?
गझल बरी वाटली..
-दिलीप बिरुटे
अवांतर : संकेतस्थळावर अक्षरांना रंग देता येत नाहीत का ?
बेफिकीर
रवि, 22/11/2009 - 13:24
Permalink
सीत्कार म्हणजे काय? - आता काय
सीत्कार म्हणजे काय? - आता काय सांगायचे राव तुम्हाला?
गझल बरी वाटली - अगदी शतशः आभार!
अवांतर - आपण कोणत्या विषयाचे प्राध्यापक व डॉक्टर आहात? म्हणजे मग सीत्कार म्हणजे काय हे त्या विषयाला अनुसरून सांगता येईल.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रवि, 22/11/2009 - 19:10
Permalink
'सीत्कार' शब्द ज्या अर्थी
'सीत्कार' शब्द ज्या अर्थी तुम्ही लिहिलाय त्या अर्थी त्याचा अर्थ तुम्हाला माहित आहे.
आता काय सांगायचे राव तुम्हाला? असे म्हणून तो शब्द लेखनात फार सर्रास वापरल्या जातो असे दाखवत आहात. तेव्हा सांगायचा असेल तर सरळ त्या शब्दाचा अर्थ सांगायचा.
बाकीच्या पंचायती कशाला करायच्या, नै का ?
-दिलीप बिरुटे
बेफिकीर
रवि, 22/11/2009 - 22:49
Permalink
सीत्कार म्हणजे मीलनाच्या
सीत्कार म्हणजे मीलनाच्या क्षणांना स्त्रीच्या मुखातून येणारे मधुर आवाज!
आता इतकी फोड जाहीररीत्या करणे मला बरे वाटते नव्हते. येथे काही स्त्री वाचक तसेच काही वयाने लहान वाचकही येत असतात. (अर्थात, काव्यात असे शब्द घ्यायला काही हरकत नाही असे मला वाटते.)
पण तरीही आपण विचारलेत. फोड करावी लागू नये म्हणून मी पंचायती केल्या की आपला विषय काय, म्हणजे त्या विषयाला अनुसरून सांगता येईल.
'सीत्कार म्हणजे काय' हा प्रश्न मात्र नक्कीच 'पंचायती करणे' यात मोडत नाही कारण कवीने लिहिलेल्या गोष्टीचा अर्थ विचारण्याचा रसिकाला हक्क आहे.
मागे मी किर्लोस्कर बेअरिंगमधे कामाला असताना कामानिमित्त बजाज ऑटोच्या फाउंड्रीमधे जावे लागले. तेथील सुपरव्हायजरने सांगीतले की थंड लोखंडावर आघात केले तर 'टाण टाण' असा आवाज येतो, तेच तापलेल्या लोखंडावर आघात केले तर हवा तो आकार ही देता येतो व आवाजही बरा येतो.
-बेफिकीर!
डी. एम. ई, बी. ई. प्रॉड, सी आय आर टी!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रवि, 22/11/2009 - 23:28
Permalink
>>सीत्कार म्हणजे मीलनाच्या
>>सीत्कार म्हणजे मीलनाच्या क्षणांना स्त्रीच्या मुखातून येणारे मधुर आवाज!
शब्दाचा अर्थ सांगितल्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार मानतो.
>>'सीत्कार म्हणजे काय' हा प्रश्न मात्र नक्कीच 'पंचायती करणे' यात मोडत नाही
अगदी बरोबर. आपण कोणत्या विषयाचे प्राध्यापक व डॉक्टर आहात? म्हणजे मग सीत्कार म्हणजे काय हे त्या विषयाला अनुसरून सांगता येईल. हे पंचायती करण्यात मोडते असे वाटते.
सीत्काराच्या अर्थासाठी, अभारतीय शब्दकोश,मराठी शब्दरत्नाकर, असे बरेच शब्दकोश घेऊन बसलो होतो.पण अर्थ काही सापडत नव्हता. आपल्या गझला वाचायच्या असल्या की यापुढे मराठी विश्वकोषाचे खंड स्वतःजवळ बाळगीन.
>>>आता इतकी फोड जाहीररीत्या करणे मला बरे वाटते नव्हते. येथे काही स्त्री वाचक तसेच काही वयाने लहान वाचकही येत असतात.
हा हा हा लैच विनोदी दिसता राव तुम्ही...तुमच्या खालील ओळी वाचल्यावर आपले भान लक्षात आलेच होते.
'विरू नये डौल' या भयाने मुलास माता जवळ करेना
मनात येथे 'पगारवाढी', स्तनात नाकाम क्षीर आहे
तृतीयपंथी जगात दावा उगाच मर्दानगी कशाला?
हरेक चोळी बधीर येथे, हरेक 'लुगड्यात वीर' आहे
वाचक, त्याचे वय, स्त्री, लहानमुले, आवडते विषय, आणि सभ्य-असभ्यतेचा केवळ तसे विचार करणार्या गझलकाराला भेटून आनंद झाला.
शिवाजी जवरे नावाच्या कवीची आज आठवण झाली तो म्हणतो.
''जरा आम्हा कळू दे ना-तुझ्या झोंब्या तुझ्या वेणा,
अमुच्या टाळक्यावरचा ढिला हा ताण कमी कर बाबा.
लिहाया स्पष्ट अन साधे तुला केले कुणी वांधे ?
कळे लोका, असे लिहिण्या तुक्याचे ध्यान कर बाबा.
तुझ्या दुर्बोध काव्याने मराया लागले गाणे,
तुझी ही लेखणी आता जरा तू म्यान कर बाबा.''
असो, लेखणी म्यान करा असे म्हणनार नाही. पुढील गझलेसाठी शुभेच्छा...!!!
-दिलीप बिरुटे
[खवट]
बेफिकीर
सोम, 23/11/2009 - 19:27
Permalink
असो, लेखणी म्यान करा असे
असो, लेखणी म्यान करा असे म्हणनार नाही
--- आपल्या म्हणण्या / न म्हणण्यावर माझे 'लेखणी म्यान करणे' सुदैवाने अवलंबून नाही यासाठी मी विश्वस्तांचे आभार मानतो.
एकटी
बुध, 25/11/2009 - 20:36
Permalink
अनेकवेळा सुधारण्याचा विचार
अनेकवेळा सुधारण्याचा विचार आला, फसून गेला
कुणीतरी आपल्यात आहे स्वभाव ज्याचा फुटीर आहे..... वाह
उतारवयही कबूल करते, 'घड्याळ घालायचे कशाला? '
(अजून थोडे, अजून थोडे, समोर आलाच तीर आहे)......क्या बात है!!!!!!!!!
मिल्या
मंगळ, 08/12/2009 - 23:43
Permalink
व्वा भूषणराव मस्त आहे गझल..
व्वा भूषणराव मस्त आहे गझल.. बहुतेक सगळे शेर आवडले..
विशेषतः मतला, फुटीर, तीर तर झक्कास...
श्रीवत्स
बुध, 03/02/2010 - 02:09
Permalink
हजारदा एक एक नाते जपायला
हजारदा एक एक नाते जपायला टाकले रफूला
नव्या नव्या अस्तरांमुळे ही त्वचा मनाची फुगीर आहे
वा ! क्लास !