ते पाखरू दिवाणे

ते पाखरू दिवाणे दिनरात गीत गाते
नेतील पंख तेथे घेऊन सूर जाते

ते एकटेच फिरते, ते बांधते न घरटे
ते गुंतते न कोठे, ते जोडते न नाते

दिसला कधी न त्याच्या चोचीत एक दाणा
बळ आणते कुठोनी,पोटास काय खाते?

कंजूष मेघ सारे देती न थेंब कोणा
प्राशून आसवे ते मग आसवात न्हाते

हातावरी न रेषा,त्याचे ललाट कोरे
होणार काय ह्याचे, चिंतेत ते विधाते

----------------------------------------------------
जयन्ता५२

गझल: 

प्रतिसाद

जयन्तराव,

अन्यत्र या रचनेला 'उत्तम' असा प्रतिसाद दिला आहेच. रचना खरच आवडली. मात्र गझलेतील शेरांच्या अशयाच्या स्वातंत्र्याच्या दृष्टीने काही ठिकाणी 'गझल म्हणून मात्र' किंचित तृटी जाणवल्या. जसे विशेषतः चवथा व पाचवा 'शेर'!

वा वा.. सुंदर!

सगळेच शेर आवडले.

चांगली रचना.
मतला नोंद घेण्याजोगा.

इथे पाखराला वारा कुठेही नेत नाही. पंख नेत आहेत. पंख खरे तर शरीराचा भाग असतात. शरीर जिथे जाते तिथे पंख जातात. इथे उलटाच प्रकार आहे. पंख नेते आहेत. कवीने पंखांकडे कर्तेपण का दिले असावे, हा प्रश्न चिंतनीय. मेंदू जरी अवयवांना आदेश देत असला तरी अंमलबजावणी पंख करीत असल्यामुळे पंखांकडे महत्त्व आले असावे.

भन्नाट!

काही म्हणा, पण येथे भन्नाट मतप्रदर्शने पाहायला मिळतात! :-))

-बेफिकीर!

केदार,
आपण कधी कधी 'पाय नेतील तिकडे' जातो तसेच या पाखराचे दिशाहीन फिरणे,'एमलेस वाँडरींग' आहे.या अर्थी
मेंदू जरी अवयवांना आदेश देत असला तरी
हे पाखरू नॉर्मल नाही.त्याचे स्वतःच्या नशीबावर काहीच नियंत्रण नाही. पण तरीही त्याचे सोबत 'सूर' घेऊन जाणे थांबत नाही!
जयन्ता५२

खरे असावे. हे पाखरू काही नॉर्मल नाही.

प्रतिसादांच्या माध्यमातून गझलेची काही इतर अंगे समजली.

धन्यवाद!

ते म्हणजे कोण?

'ते' एकटेच फिरते, 'ते' बांधते न घरटे
'ते' गुंतते न कोठे, 'ते' जोडते न नाते

कंजूष मेघ सारे देती न थेंब कोणा
प्राशून आसवे 'ते' मग आसवात न्हाते

हातावरी न रेषा,त्याचे ललाट कोरे
होणार काय ह्याचे, चिंतेत 'ते' विधाते

या तीनही शेर की काय त्यातील 'ते' म्हणजे नेमके कोण?

मला वाटते 'ते' म्हणजे पाखरू (शेवटच्या कडव्याव्यतिरिक्त)

सगळे म्हणताहेत गझल फार आवडली, शेर फार आवडले....
मलाही खूप आवडल्या सगळ्या ओळी, कल्पना, भाषा.....पण गझल आहे कुठे?

ह्या रचनेला गझलेऐवजी कविताच म्हणणे अधिक सयुक्तिक ठरावे. स्वतंत्ररीत्या काही ओळींचा अर्थ लागणार नाही. किंवा लागला तरी अधुरा, अपुरा लागेल.

चित्तरंजनशी सहमत.. हिला गझलेपेक्षा नज्म म्हणणे योग्य ठरावे... एका मध्यवर्ती कल्पनेभोवती काव्य गुंफले आहे... आशय नक्कीच चांगला आहे.. तांत्रिक दृष्ट्या जरी रदीफ नसलेल्या गझले सारखी असली तरी तिचे कविता असे वर्गीकरण योग्य ठरावे..
हातावरी न रेषा,त्याचे ललाट कोरे
होणार काय ह्याचे, चिंतेत ते विधाते.. हे द्विपदी आवडली
-मानस६

मान्य!
माझेहि शंका निरसन झाले आहे.मला ह्या रचनेस नज्म (गीत) म्हणणे योग्य वाटते. धन्यवाद.
ऋत्विक,
परखड प्रतिसाद आवडला.
विश्वस्त,
ही रचना गझल नसल्याने काढून टाकलीत तरी चालेल.
सर्वांना धन्यवाद!
जयन्ता५२