मौक्तिकांत शिंपला शोधू

मौक्तिकांत शिंपला शोधू
नायकातही खला शोधू

कैक साल वाकलो नाही
वंद्य पावले, चला, शोधू

का जगास बोल लावावे ?
दोष का न आपला शोधू ?

खोल डोहसे तिचे डोळे
त्यात हरवल्या मला शोधू

सोडुनी जुनी भ्रमरवृत्ती
घट्ट प्रेमशृंखला शोधू

पैज अमृतातही जिंके
अशा शब्द‍आंचला शोधू

इंद्र हो‍उनी उभा याचक
धाव, कवच-कुंडला शोधू

अनसुया, प्रियंवदा नसता
'भृंग', चल शकुंतला शोधू

गझल: 

प्रतिसाद

खोल डोहसे तिचे डोळे
त्यात हरवल्या मला शोधू
- वा!वा!
मतला, बोल मस्त. गझल आवडली.

का जगास बोल लावावे ?
दोष का न आपला शोधू ?
वाव्वा! सुंदर, सहज, उत्तम लहजा. अशी सहजता आल्यास सोने पे सुहागा!
कैक साल वाकलो नाही
वंद्य पावले, चला, शोधू
हाही आवडला. गझल आवडली.

कैक साल वाकलो नाही
वंद्य पावले, चला, शोधू

मस्तच ओळी !!

का जगास बोल लावावे ?
दोष का न आपला शोधू ?
आवडले.

मिलिन्द,
मौक्तिकांत शिंपला शोधू
नायकातही खला शोधू

कैक साल वाकलो नाही
वंद्य पावले, चला, शोधू

हे शेर अतिशय आवडले. भृंग हे मला वाटतं तुमचं तखल्लुस आहे, त्याचा इथला वापर अप्रतिम!
- कुमार

भृंग हे मला वाटतं तुमचं तखल्लुस आहे, त्याचा इथला वापर अप्रतिम!

- आभार. मला वाटलं होतं की हे शाकुंतलीय allusion (अचूक मराठी प्रतिशब्द ?) वाया गेलं.तुम्ही ते उचलून धरलतं, त्यावर टिप्पणी केलीत, बरं वाटलं. "याचसाठी केला होता अट्टाहास..."