तुकारामांनंतरचा शब्दपूजक कवी : सुरेश भट

एखाद्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य केलेल्या व्यक्ती-विभूतीबद्दल चमत्कारिक वदंता निर्माण करण्याची एक अत्यंत वाईट अशी सामूहिक खोड आपल्या समाजाला लागली आहे.
विशेषतः कवितेच्या क्षेत्रात तर ती फारच विकृत झाली आहे. कवी काय तर म्हणे 'गॉड गिफ्टेड' म्हणजे जन्मतःच तो कवी असतो वगैरे. कवित्व हे जिवंत हृदयाचे व शब्दांच्या अर्थच्छटांच्या जाणकारीतून उमटणारे पडसाद असतात. हृदय जिवंत असेल तोच  माणूस समकालीन समाजाची दुःखे, वेदना आणि समस्या यांच्याशी समरस होईल. तसेच या समरसतेतून जे गहिवर-हंबर उमटतील, जो आक्रोश, जी हळहळ प्रकट होईल; त्यांचे आविष्कार योग्य शब्दांविना शक्य नसतात. म्हणून कविता ही जशी लुच्ची नसावी तशी कच्चीही नसावी. समकालीन दुःखाशी-वेदनेशी  आपण स्वतःला जुळवून घेतले तरी वाचन संस्कारातून आपली शब्दसंपदा कमावलेली हवी आणि समकालीन भाषेतूनही नेमके शब्दयोजन करण्याचे कसबी धाडसही हवे. तुकारामांनंतर सुरेश भट हा पहिला कवी आहे की, ज्याने कवी म्हणजे आकाशातून टपकणारी दैवी विभूती वगैरे नसून शब्दसाधना आणि समाजाविषयी कळकळ यातून त्याला कवी व्हावे लागते, हा विचार दिला;  अन्यथा कवी म्हणजे स्वयंभू अवतार, अशीच भूमिका लोकांनी व स्वतः कवींनीही समाजात प्रसृत केली होती. कवी चंद्रशेखरांची एक कविता बघा :
'काय म्हणून शिकवील मला हो तो?
आणि शिकवोनी काय कवी होतो
कदा नोहे रससिद्ध कवी जो की
स्वयंभू तो अवतरेल असे लोकी |'
उपरोक्त ओळींत चंद्रशेखरांनी कवीवर वक्रोक्तीने व्यंग केलेले नसून कवी हा स्वयंभू अवतार असल्याचा दर्प व्यक्त केला आहे. केशवसुतांनीही : 'आम्ही कोण म्हणुनी काय पुसता... ?'  अशा प्रकारे कवी म्हणजे देवाचे लाडके वगैरे मतप्रतिपादन केले आहे; पण तुकाराम?  तुकारामाने तर चक्क :
'करतो कवित्व म्हणाल हे कोणी
नव्हे माझी वाणी पदरची !'
हे ठासून पण नम्रतेने सांगितले. प्रत्येक कवीचे काही विचार अत्यंत लाडके असतात. त्या विचारांची निरनिराळ्या प्रकारे पुनरावृत्ती होत असते. उदा:
'साळुंकी मंजूळ बोलतसे गाणी
बोलविता धनी वेगळाची '
'संतांची उच्छिष्टे बोलतो उत्तरे
काय म्या गव्हारे जाणावी ही?'
अशा प्रकारे कवित्वाचा स्वयंभू टेंभा तुकारामाने मिरविला नाही. तुकारामांनंतर सुरेश भटांनीच वाङ्मयीन अहंकाराच्या फुग्याला टाचणी टोचली. आपल्या कलेला आपण जेवढे मोल देऊ तेवढी ती झळाळून येईल, हे समीकरण मांडणारा कवी म्हणजे सुरेश भट. 'मी गझलेसाठी आयुष्य जाळले,' हे छातीठोकपणे सुरेश भट सांगत होते. उभ्या आयुष्याचं मोल ज्या कवितेसाठी भटांनी दिले ती कविता त्या प्रमाणात झळाळून येणारचे. कुठल्या तरी विभागात नोकरीही करायची, बायकोला स्थानिक राजकारणातून राजकीय पक्षाद्वारे प्रतिष्ठितही करायचे. चार-दोन संस्था काढून गबरही व्हायचे, जोडधंदेही करायचे आणि संपादक-संयोजकांना हाताशी धरून लेखक-कवी-गायक-चित्रकार-वक्तेही व्हायचे, असा तो व्यावसायिक प्रकार नव्हता. शब्दसाधनेसाठी उभे आयुष्य उधळून लावण्याची भटांची कलंदरी लक्षात न घेता त्यांनी भांडणे कशी केली आणि त्यांच्या खाण्या-पिण्याची बिले किती असायची... या बाबींवरच डोळे ठेवणाऱ्या कावळे-गिधाडांना भटांच्या कवितेमागील तपस्या काय कळणार?
अमरावतीत असताना ते गड्ड्यातील एका सामान्य हॉटेलीत मिसळ व वडे खात होते, हेच सांगणारे लोक भेटतात; पण बालेकर नावाच्या त्या वेळच्या तेथील गंथपालाकडून ऐकलेले भटांचे वाचनवेड कसे होते? हे फारसे कुणी बोलत नाही. भटांना कविता काही वारशात मिळाली नव्हती किंवा जन्मतःच ती डोक्यात घालून मिळालेली नव्हती. प्रदीर्घ साधनेतून ती 'साधली' होती.
'साधुनी बचनाग खाती तोळा तोळा  
आणिका ते डोळा न पाहवे |
असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे |'
असा तो सर्व साधनेचा परिपाक होता.
दहा-दहा, बारा-बारा तास युवक सुरेश भट नुसता वाचत होतो. वाचन-श्रवण-चिंतन अशा साधनेतून भटांची कविता खणाणत आली. या जोडीला हवे असते जिवंत हृदय! आम्हीतर कुणाच्या पत्रांनाही लवकर उत्तरे देत नाही, इतके मुर्दाड झालेलो आहोत! जन्मतः जर काही मिळत असेल तर ती फक्त रुची असते! तिलाच आपल्या पारंपरिक भाषेत सहजप्रवृत्ती म्हणजे स्वधर्म म्हणतात.
'... विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणीजात...' असा जो स्वधर्म असतो त्याला सुसंगत अशी साधना केली की, जॉन फर्नांडिस, वासुदेव कामत, पु. ल. देशपांडे, भीमसेन जोशी, जयंत नारळीकर... अशी आपापल्या काळातील, आपापल्या क्षेत्रातील श्रेणीतील मंडळी पुढे येत; पण या 'स्वधर्मा'च्या नादी लागलेल्या व्यक्तीला लौकिक-भौतिक यशाची तमा बाळगता येत नाही. वंशाचा नाश झाला, चारही भावंडे लग्नाविनाच भटकली. घरदार, व्यवसाय पार बुडाला आणि गाथा निर्माण झाली. ज्ञानेश्वरी आणि गाथा यासाठी एवढे मोल मोजावे लागले. अगदी त्याच मार्गाने :
'एकदा केंव्हा तरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले'
अशी भटांनी कवितेसाठी आयुष्याची राखरांगोळी करून घेतली तेव्हा ती 'तशी' झाली ! एवढ्या भौतिक अपयशानंतर लौकिक म्हणाल तर साध्या जिल्हा साहित्य संमेलनाचेही अध्यक्षपद भटांना मिळाले नाही किंवा तशी कुणाकडून विचारणा झाली नाही. म्हणून हा कवी म्हणतो :
'अताच कोणी फकीर माझ्या घरापुढे ओरडून गेला--
शिकस्त झालास तू न बेटा तुझे इरादे महान होते!'
यश-अपयशाच्या पल्याड बघून आपल्या स्वधर्माशी अव्यभिचारी वृत्तीने जुळलेले राहावे लागते. स्वधर्म समजून आयुष्य उधळून द्यावे लागते.
ख्रिस्तोफर मोरले हा विचारवंत म्हणतो:
"There is only one success to be able to spend your life in your own way."
इथे 'own way' म्हणजे मनाला येईल तसे नव्हे तर अंतःप्रेरणेनुसार, ही अंतःप्रेरणा म्हणजे सहजप्रवृत्ती ! सहज विकृत्ती नाही !
भटांच्या सहवासाचे, परिचयाचे आणि सलगीचे भांडवल करणारे आजचे वक्ते, कवी हे सर्व सांगतच नाहीत. एकेका शब्दांसाठी भटांचे ताटकळणे आणि अडून बसणे त्यांना दिसले नाही. यांना त्यांची फक्त बिलंदरी आणि तऱ्हेवाईकपणाच दिसला! एकदा डिक्शनरीत मला 'Phraseology' हा शब्द दिसला. त्याचा अर्थ होता-- Choice or arrangement of words -- हा अर्थ वाचताच मला दोन नावे आठवली. एक तुकाराम आणि दुसरे सुरेश भट.
एक म्हणतो :
'शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन
शब्दे वाटू धन जन लोका |
सुरेश भट म्हणतात:
'अडवून जरी शब्दांनी
भरपूर खुशामत केली,
दारात वर्तमानाच्या
मी अर्थ उद्याचा नेला'
उद्याचे अर्थ वर्तमानाच्या दारात नेण्यासाठी 'भविष्याची दिठी हवी असते.
'पाहुनी घ्यावे भविष्याच्या दिठीने
बोलण्यासाठी जगाचे ओठ व्हावे'
असा तुकारामांनंतरच शब्दपूजक कवी सुरेश भट जगाचा ओठ झाला. त्यांची तपस्या, साधना, इरादे आणि भौतिक उपलब्धींविषयीची उदासीनता दुर्लक्षून केवळ किस्से-वदंता सांगणे आजच्या भट भक्तांनी बंद करावे. यातच सर्वांचे आणि कवितेचेही हित आहे.
सलगी-परिचयाचे म्हणाल तर :
'शेवटी वेदमंत्रांनी
अन्याय एवढा केला--
मशहूर ज्ञानिया झाला
गोठ्यातच जगला हेला'
ज्ञानेश्वराच्या सलगीने हेल्याला गोठा सुटला नाही.... !

शिवाजी जवरे
दीपनगर
भुसावळ

(दै. उद्याचा मराठवाडा, दि. १५ एप्रिल २००७ मधून साभार)

Taxonomy upgrade extras: 

प्रतिसाद

अत्यन्त अप्रतिम लेख!

सुंदर..
सुरेशदादा जनतेचे कवी आहेत. काव्य संमेलनात मिरविणारे अंधेरनगरीचे राजे नव्हेत.
अभिजित