चला 'बेफिकिर', जायची वेळ गेली

तुला ते विचारायची वेळ गेली
अता हक्क वाटायची वेळ गेली

तुला कारणे एवढी लाभली की
'तुझी कारणे' व्हायची वेळ गेली

कसा वेळ गेला तुझा आणि त्याचा?
कसे 'भान ठेवायची' वेळ गेली?

अता पाहणे वाट 'त्या' वेळची ... बस
अता वेळही जायची वेळ गेली

तुझी चूक की चूक माझी असावी?
तुला देव मानायची वेळ गेली

खरे बोलणे केवढे धाडसाचे
'खरे फक्त' सांगायची वेळ गेली

फुगा बेडकांनो, फुटा बेडकांनो
अता गोष्ट ऐकायची वेळ गेली

असा काय रस्त्यात फिरतोस वेड्या
चला 'बेफिकिर', जायची वेळ गेली

-सविनय
'बेफिकीर'!

गझल: