...फर्मास गप्पा !

...............................
...फर्मास गप्पा !
...............................

नेहमी जो उत्तरांनी टाळलेला !
प्रश्न आहे एक मी रेंगाळलेला !

खूप दिवसांनी मने बहरून आली...
...आणि हा एकांतही गंधाळलेला !

वावरे तो सावली होऊन माझी...
जीव कोणाचा तरी घोटाळलेला !

तू समुद्राच्या नको मारूस बाता...
फेस हा त्याचाच तू लाटाळलेला !

तू कशाला आणशी डोळ्यांत पाणी..?.
जीव हा माझाच ना मी जाळलेला ?

बाब ही आहे इमानाची अखेरी...
भुंकतो जोरात कुत्रा पाळलेला !

या शिळोप्याच्या किती फर्मास गप्पा...
आणि हाती हा चहा वाफाळलेला !

- प्रदीप कुलकर्णी

गझल: 

प्रतिसाद

सावली , प्रश्न, चहाचा असे तिन्ही शेर विशेष आवडले.
गझल छानच आहे.
सोनाली

नेहमीचा 'बाज' सारे शेर घेती
शेर कुत्र्याचा जरा 'नाठाळलेला'

-सविनय
'बेफिकीर'!

सुंदर!
अनेक दिवसांनी अशी बांधेसूद पण ओघवती गझल वाचली.

आपुली तारीफ मी कैशी करावी?
आपुल्या 'काव्यावरी' मी भाळलेला!

दिलखुलास प्रतिसाद देणाऱया सगळ्या सुहृदांचे मनापासून आभार.
लोभ आहेच; असाच राहू द्यावा.
sureshbhat.com च्या सगळ्या सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

गझल छानच आहे नेहमीप्रमाणेच.
आरती

'लाटाळलेला'
शब्दप्रयोग आवडला प्रदीपजी!!