उगाच काहीतरी
चिडून बोलायचे उगाच काहीतरी
मनात ठेवायचे उगाच काहीतरी
नको तपासू मला, नको परीक्षा तुझी
निकाल लागायचे उगाच काहीतरी
उनाड कोणीतरी ढगात रेखाटते
बघून टाकायचे उगाच काहीतरी
तुझे जुने खेळणे जपून खेळायचे...
फिरून मोडायचे उगाच काहीतरी!
नवीन खाणाखुणा, नवीन नियमावली
कयास लावायचे उगाच काहीतरी
घरास परवानगी जमीन नाकारते
हवेत बांधायचे उगाच काहीतरी
तुफान ओठातले उरात कोंडायचे...
कशास बोलायचे उगाच काहीतरी?
उदास गर्दी नको, वरात रडती नको
अखेर जाळायचे उगाच काहीतरी!
आपला नम्र,
अलखनिरंजन
गझल:
प्रतिसाद
अलखनिरंजन
मंगळ, 15/09/2009 - 18:15
Permalink
याच गझलेत अजून ३ शेर (बसमधे!)
याच गझलेत अजून ३ शेर (बसमधे!) सुचले. ते इथे देतो.
गोड मानून घ्यावेत!
मनावरी घ्यायचे उगाच काहीतरी
जगामधे व्हायचे उगाच काहीतरी
घरामधे एकट्या उठून बोलायचे
बसून ऐकायचे उगाच काहीतरी...
जगास तारायला उपाय साधासुधा
कुणी कुणा द्यायचे उगाच काहीतरी!
नम्र,
अलखनिरंजन
बेफिकीर
मंगळ, 15/09/2009 - 18:27
Permalink
रजेवरी ज्ञानबाळ राहिले
रजेवरी ज्ञानबाळ राहिले मुंबइस
कयास बांधायचे उगाच काहीतरी
असेच रे बिनलयीत शेर गुंफायचे
लयीस पाळायचे? ...... उगाच काहीतरी..!
असाच आशय सुरेखसा जपावास तू
रदीफ सांधायचे?... उगाच.. काहीतरी...!
कशास हा 'बेफिकीर' बोलतो एवढा?
हसून ऐकायचे... उगाच काहीतरी
-सविनय
बेफिकीर!