ब्लॅक होल

एक बरीच जुनी 'मुसलसिल' गझल सापडली, जेव्हा मी कॉलेजमधे शिकत होतो तेव्हाची -- 'ब्लॅक होल' या शास्त्रीय(!) विषयावर केलेली :) गझल म्हणता येणार नाही, पण तरी मांडण्याची चूक करत आहे, याबद्दल क्षमस्व!

ब्लॅक होल मधून प्रकाश पण बाहेर पडू शकत नाही, त्यात तारे लोप पावतात, त्यातून नाश आणि निर्मिती होते, या कल्पनांवर आधारितः
========================================
कुट्ट पडद्याआड कोणी थाटला संसार आहे,
का अनंताच्या तळाशी साचला अंधार आहे?

काळजाच्या कोपर्‍यांची की छबी विस्तारली, का
काळ ज्याच्या उंबर्‍याशी थांबला ते दार आहे?

का प्रकाशाच्या अघोरी कृष्णकृत्यांच्या भयाने
स्वाभिमानी तारकांनी मांडला जोहार आहे?

दूर कर्त्याच्या अभागी आंधळ्या डोळ्यातल्या का
आर्त काळ्या आसवांनी छेडला मल्हार आहे?

षड्ज-पंचम विलय-उत्पत्तीतले झंकारताना
बंद ओठी का स्वयंभू दाटला गंधार आहे?

गुंतणारे यात सारे आपुले हरवून जाती
हा तुझ्या बेबंद केसांचा खुला संभार आहे!

- क्षमस्व!
अलखनिरंजन

गझल: 

प्रतिसाद

कुट्ट पडद्याआड कोणी थाटला संसार आहे,
का अनंताच्या तळाशी साचला अंधार आहे?

कॉलेजात असताना केलेला हा प्रयत्न चांगला आहे. कृष्णविवरावर मलाही काही ओळी सुचल्या होत्या. शक्य झाल्यास पूर्ण रचना कधी देईन.

का प्रकाशाच्या अघोरी कृष्णकृत्यांच्या भयाने
स्वाभिमानी तारकांनी मांडला जोहार आहे?

वा! तशा तर सगळ्याच द्विपदी आवडल्या. वरची सगळ्यात जास्त आवडली. कृष्णविवराचं दृश्य चित्रण वाटतेय गझल.

कृष्णविवरावर मलाही काही ओळी सुचल्या होत्या. शक्य झाल्यास पूर्ण रचना कधी देईन.

चित्तदा, आपल्या या रचनेची प्रतिक्षा आहे!

का क्षमस्वाची उगा पुस्ती तुझी प्रत्येकवेळी?
वाटले ते मांडण्याचा सर्वथा अधिकार आहे

कृष्णविवरापलिकडेही शेर तिसरा अन सहावा
हाच सावध शायराचा जबर आविष्कार आहे

का महाविद्यालयापासून दबली शायरी ही?
जेवढा आहेस तू तितका जुना आजार आहे?

मी गझल म्हणणार नाही उर्वरित ओळींस यातिल
पाहिजे तर बोल हा 'बेफिकिर' वेडा ठार आहे

-सविनय
बेफिकीर!

चित्तरंजन, क्रान्ति, बेफिकीर!
आपल्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद!

चित्तरंजन, आपल्या रचनेची वाट पाहत आहे!

बेफिकीर! आपल्या गझल-प्रतिसादाने नेहमी च मजा येते, आपल्या शीघ्रकाव्याची अचंबित करणारी झलक ही पाहायला मिळते. त्यामुळे let it roll!

मस्तच ! गंधार शेर आवडला....

का प्रकाशाच्या अघोरी कृष्णकृत्यांच्या भयाने
स्वाभिमानी तारकांनी मांडला जोहार आहे?

गुंतणारे यात सारे आपुले हरवून जाती
हा तुझ्या बेबंद केसांचा खुला संभार आहे!..

हे दोन शेर फार आवडले..!!!!

का प्रकाशाच्या अघोरी कृष्णकृत्यांच्या भयाने
स्वाभिमानी तारकांनी मांडला जोहार आहे?

अफलातून! छनच आहेत सगळ्या द्विपदी!

दूर कर्त्याच्या अभागी आंधळ्या डोळ्यातल्या का
आर्त काळ्या आसवांनी छेडला मल्हार आहे?

ही सुद्धा खूप आवडली!!

श्रीवत्स, ऋत्विक, योगेश,

आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद!

आवडली!
व्वा! व्वा! १ली द्विपदी तर मस्तच!