झालास 'बेफिकिर' तू काहीतरीच आता

एकंदरीत तीही कंटाळलीच आता
अन वाटते मलाही व्हावे कवीच आता

माझा न एक दमडा, ना नाइलाज माझा
नाही तिथे कशाला बोला उगीच आता?

हेही करून झाले, तेही करून झाले
मी कोण नेमका ते सांगा तुम्हीच आता

केलेस काय तू ते कळले अता तुलाही
मीही असाच आता, तूही तशीच आता

असतात अंतरेही नात्यामधे जरूरी
माझ्यातुझ्यात का पण नुसती दरीच आता?

माझे भविष्य सध्या जोपासतो इथे मी
हातात रोज येते रेषा नवीच आता

आधी तुझा मलाही आदर बराच होता
झालास 'बेफिकिर' तू काहीतरीच आता

गझल: 

प्रतिसाद

हेही करून झाले, तेही करून झाले
मी कोण नेमका ते सांगा तुम्हीच आता

केलेस काय तू ते कळले अता तुलाही
मीही असाच आता, तूही तशीच आता

माझे भविष्य सध्या जोपासतो इथे मी
हातात रोज येते रेषा नवीच आता

आधी तुझा मलाही आदर बराच होता
झालास 'बेफिकिर' तू काहीतरीच आता

हे शेर चांगले झाले आहेत. एकंदर चांगली आहे गझल.

भूषणजी,
गझल आवडली. हा शेर विशेष.
" माझे भविष्य सध्या जोपासतो इथे मी
हातात रोज येते रेषा नवीच आता "
- ` ख़लिश '-वि. घारपुरे/ २-९-२००९.

श्री. चित्तरंजन,
आपल्या प्रतिसादामुळे व प्रोत्साहनामुळे बळ आले. याहून काहीतरी जास्त बरे लिहायच्या प्रयत्नात!

श्री. खलिश,
आपल्या प्रतिसादामुळे उत्साह आला. तो भविष्याचा शेर अचानक सुचला. खरे तर सगळी गझलच अचानक सुचली. एक पंधरा वीस मिनिटांत ऑनलाईनच लिहून टाकली. निष्काळजीपणा! पण, तरीही आपल्याला आवडली यामुळे मला 'आपण विदुतवेगात लिहू शकतो' असा काहीतरी भिन्नच आनंद झाला. खरे तर, या गोष्टीला व या दुराभिमानाला फारसा अर्थ नाही याची नम्र जाणीव आहे.