असाच विस्कळीत मी
जरा कुठे सरावलो स्वत:त मी रमायला
लगेच पोचला तुझा सुगंध घमघमायला
कसे जगायचे कळून काय फ़ायदा अता
सबंध जन्म लागला शहाणपण जमायला
दिमाख फ़क्त दाखवून विरघळून संपलो
जसा विड्यास लावतात वर्ख चमचमायला
नको नको म्हणून पाय चालतो कसातरी
शिकायला हवे अता मनासही दमायला
असाच विस्कळीत मी, मनात ताठ भूमिका
कण्यात एक नम्रता, जगापुढे नमायला
मधेच धूळ चारतात या मनास माणसे
मधेच लागते हवेत नाव दुमदुमायला
मनामनास लावलीस ’बेफ़िकीर’ आग तू
युगे हजार लागणार शाप हे शमायला
गझल:
प्रतिसाद
केदार पाटणकर
सोम, 31/08/2009 - 18:03
Permalink
भूषण, शेवटच्या दोन शेरांचा
भूषण,
शेवटच्या दोन शेरांचा अर्थ स्पष्ट नाही.
नेहमीप्रमाणे शुभेच्छा आहेतच.
भूषण कटककर
सोम, 31/08/2009 - 19:05
Permalink
प्रिय केदार, १. दखल
प्रिय केदार,
१. दखल घेतल्याबद्दल, प्रतिसाद दिल्याबद्दल व मैत्रीपूर्ण स्पष्टपणाबद्दल मनापासून आभार!
२. रस निष्पन्न झाला नसल्यास मनापासून दिलगिरी!
३. मी 'बेफिकीर' हे तखल्लुस घेतले आहे. त्याचे कारण हे आहे की माझे जे वागणे आहे त्याला फक्त तेच विशेषण लागू होऊ शकते, माझ्या मताप्रमाणे! म्हणून त्या विशिष्ट शेरात मी असे म्हणू पाहत आहे की 'या जगातील तुला भेटलेल्या प्रत्येक मनात तू आग निर्माण केलीस / लावलीस, तुझे हे पाप शमायला हजार युगे जावी लागतील'. यात 'शमणे' हे सर्वसाधारणपणे 'आगीसाठी' असते याचे भान असूनही मुद्दाम असा शब्दप्रयोग करण्याची दोन कारणे:
अ - तो एक काफिया होऊ शकतो.
ब - पापाचे परिणाम माझ्या पुढील जन्मांवर होऊ शकणे हे थांबू शकते या अर्थी 'शमू शकते' असे घेतले आहे.
(अर्थातच, पुनर्जन्म वगैरे संकल्पनांचा माझ्यावर पगडा आहे असे मुळीच नाही.)
तखल्लुस - कवीने आजच्या जमान्यात उपनाम घेण्याची गरज आहे का याबाबतीत माझे मते:
१. ते कवीचे स्वातंत्र्य असावे.
२. जर घेतलेच तर, तखल्लुस द्विपदीच्या आशयात बेमालूम मिसळायला हवे.
( या विशिष्ट गझलेत ते मिसळले आहे की नाही यावर सर्वांच्याच मतांचा आदर!)
माझ्या गझलेवरील प्रतिसादांना 'गद्य' उत्तरे देण्याचे स्वातंत्र्य मी ठेवत असून त्यांच्यावर 'शेर' न रचण्याचे स्वातंत्र्यही ठेवत आहे.
शेवटी आपल्या मैत्रीसाठी एक शेर!
आहे तुझ्यात सध्या ते काय नेमके की
येतो तुझ्याकडे मी कोणी नसेल तेव्हा
धन्यवाद!
भूषण कटककर
सोम, 31/08/2009 - 19:14
Permalink
शेवटच्याच्या आधीचा शेर! प्रिय
शेवटच्याच्या आधीचा शेर!
प्रिय केदार,
मी चुकून 'शेवटच्या' एवढेच वाचले. 'शेवटच्या दोन' हे नंतर वाचले.
मधेच धूळ चारतात या मनास माणसे
मधेच लागते हवेत नाव दुमदुमायला
माझ्या वागण्यात सातत्याचा इतका दुर्दैवी अभाव आहे की मी याक्षणी कसा वागेन अन पुढच्या क्षणी कसा वागेन याबाबत मी स्वतःच काही सांगू शकत नाही. मात्र, या विशिष्ट शेरात मी दोष स्वत:कडे न घेता उद्दामपणे जगाला दोष देत आहे की लोक कधी माझ्याशी असे वागतात तर कधी तसे! खरे तर तो दोष माझाच आहे. मी प्रत्येक क्षणी माझ्या मनाला पटेल तसाच वागतो, हा तो दोष!
असो!
आणखीन एक शेर आपल्या मैत्रीसाठी देण्याचा मोह आवरत नाही म्हणूनः
मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा
धन्यवाद!
काव्यरसिक
मंगळ, 27/10/2009 - 10:52
Permalink
अप्रतिम गझल! अत्यंत सुरेख
अप्रतिम गझल!
अत्यंत सुरेख रचना!
नको नको म्हणून पाय चालतो कसातरी
शिकायला हवे अता मनासही दमायला
असाच विस्कळीत मी, मनात ताठ भूमिका
कण्यात एक नम्रता, जगापुढे नमायला
मधेच धूळ चारतात या मनास माणसे
मधेच लागते हवेत नाव दुमदुमायला
हे शेर विशेष आवडले.
व्वा! फारच छान!
शुभेच्छा!
--नचिकेत भिंगार्डे
श्रीवत्स
मंगळ, 27/10/2009 - 12:37
Permalink
क्लास ! काय जबरदस्त रचना आहे
क्लास ! काय जबरदस्त रचना आहे हो ही ! मस्तच ! अभिनंदन !
नेहा
मंगळ, 27/10/2009 - 13:44
Permalink
मस्तच आहे .यात वाद नाही
मस्तच आहे .यात वाद नाही