मोल

जे घडले ते तुजला बहुधा नंतर कळले होते
अपुल्यामधले अंतर तोवर फसवे बनले होते

दिसण्यामधली सुंदरता कुरवाळत बसलो होतो
असण्याचेही मोल जरा उशिराने पटले होते

वाद अकारण झाला आणिक खूप बोललो दोघे
तेव्हा कळले, तुझे नि माझे मौन चिघळले होते

सावध झालो तेव्हा आधी तुझी आठवण झाली
तूच मला बोलावुन अलगद दूर ढकलले होते

शब्दांच्या गावातच मी मुक्काम ठोकला होता
भेट तुझी झाली अन् त्यांचे अर्थ गवसले होते

पुस्तक मिटण्यापूर्वी मी शेवटचे पान उघडले
तुझी आठवण बनून तेथे फूल अडकले होते

चर्चा झाली बाजारी पण किंमत ठरली नाही
जेव्हा नाते अपुले तू विकण्यास काढले होते

गझल: 

प्रतिसाद

पहिले दोन वगळता बाकीचे शेर विशेष आवडले. चिघळणे, ढकलणे खास; अर्थ गवसणे छान! गझल आवडली. पु. ले. शु.

शब्दांच्या गावातच मी मुक्काम ठोकला होता
भेट तुझी झाली अन् त्यांचे अर्थ गवसले होते

पुस्तक मिटण्यापूर्वी मी शेवटचे पान उघडले
तुझी आठवण बनून तेथे फूल अडकले होते

वा! खासच गझल!

तूच मला बोलावुन अलगद दूर ढकलले होते

वाद अकारण झाला आणिक खूप बोललो दोघे

ह्यासारख्या सुट्या ओळी तर उत्तमच. फार आवडल्या. सगळेच शेर कदाचित, किंबहुना नक्कीच, आणखी उत्तम होऊ शकतील असे वाटले. तसेच, काही शेर (मला) थोडे संदिग्ध वाटले. तसे सगळेच शेर छान. एकंदर गझलही छानच झाली आहे. शुभेच्छा!

कल्पना आवडल्या.

या गझलेला रदीफ आवश्यक आहे का? नसली तरी आशय तसाच राहील असे पहिले दोन तीन शेर वाचून वाटले. (पुढचे त्या दृष्टिने वाचले नाहीत.) अर्थात, रदीफ रद्द करायची झाली तर ओळींमधे वृत्ताच्या दृष्टिने आवश्यक ते बदल करावे लागतीलही व आपल्याला करता येतीलही.

व्वा!

तुझी आठवण बनून तेथे फूल अडकले होते. ( आहे बर का? काही शेरांमधे रदीफ फारच आवश्यक आहे.)

मौन चिघळणे फार आवडले.

'तू असे असे केले होते' मधे 'स' ( केले होतेस ) असे आवश्यक असावे. ( दोन शेरांमधे तसे झालेले दिसले.)

सुंदर शेर आहेत या गझलेत!

चक्रपाणी, क्रान्ति धन्यवाद...
चित्तजी, भूषण सूचनांवर विचार करतोय... धन्यवाद..
चित्तजी, संदिग्ध वाटलेले शेर सांगाल का? त्यावर एकतर विचार करेन...

चित्तजी, संदिग्ध वाटलेले शेर सांगाल का? त्यावर एकतर विचार करेन...

उदाहरणार्थ

शब्दांच्या गावातच मी मुक्काम ठोकला होता
भेट तुझी झाली अन् त्यांचे अर्थ गवसले होते

ह्या द्विपदीतून मला अर्थ नीटसा गवसला नाही. शब्दांच्या गावात मुक्काम ठोकल्यावर कुणाकुणाशी भेट होऊ शकते? कुणाकुणाशी भेट झाल्यावर त्या शब्दांचे अर्थ गवसतात?

दिसण्यामधली सुंदरता कुरवाळत बसलो होतो
असण्याचेही मोल जरा उशिराने पटले होते

असण्याचेही मोल म्हणजे काय? सुंदर असण्याचे की? मन सुंदर असण्याचे की अस्तित्वात असण्याचे?

एकंदर गझल चांगलीच झाले आहे. म्हणूनच (नुसते छानछान म्हणण्यापेक्षा ) थोडे सविस्तरपणे मत मांडावेसे वाटले. काही ठिकाणी अर्थ ठसठशीतपणे उमटलायला हवा होता असे मला पहिल्या वाचनात वाटले एवढेच. तसेच काही शेर अधिक प्रभावीपणे दाखल होऊ शकले असते असेही वाटून गेले. उदाहरणार्थ फूल अडकणे. तिथे वाळले हवे होते का?

शंका मंजूर ( I mean शंका पटल्या)...
एवढा विचार मी केला नव्हता..
१. तुझी भेट झाली आणि शब्दांचे अर्थ गवसले होते असं म्हणायचं आहे..
२. अस्तित्वात असण्याचे मोल असं म्हणायचं आहे...

"फूल वाळणे" हेच जास्त योग्य वाटतं... वाह..
मनापासून धन्यवाद चित्तजी...