दिसतील पंख त्याचे

आलाप मीलनाचा गा तू जमेल तेव्हा
मीही लिहीन म्हणतो काही सुचेल तेव्हा

आहे तुझ्यात 'सध्या' ते काय नेमके ... की
येतो तुझ्याकडे मी.. कोणी नसेल तेव्हा

भेटूनही तुला का अतृप्त राहतो मी?
ठरतील काय भेटी... हेही कळेल तेव्हा?

भलताच त्रास होतो या छान वागण्याचा
टिकणार कोण आहे पचनी पडेल तेव्हा?

जन्मात एकदाही खोटे न बोललो मी
हेही खरे निघावे खटला चढेल तेव्हा

मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा

काळास कासवाची असते गती तरीही
दिसतील पंख त्याचे पक्षी उडेल तेव्हा

मी ऐकणार होतो, ते बोलणार होते
जगणार कोण आहे उलटे ठरेल तेव्हा?

हल्ली सुगंध येतो विरहासही कशाने?
सांगेन, एकदाचा पेला भरेल तेव्हा

गझल: 

प्रतिसाद

मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा

वा! मतलाही खास.

मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा

विशेष. गझल छान आहे.
एकेकाळी मी लिहिलेली द्विपदी आठवली. ती अशी:

मला ठाऊक नाही का असा मी
अता स्वीकार ना आहे जसा मी

भूषणजी,
सुरेख गझल...

जन्मात एकदाही खोटे न बोललो मी
हेही खरे निघावे खटला चढेल तेव्हा

काळास कासवाची असते गती तरीही
दिसतील पंख त्याचे पक्षी उडेल तेव्हा

माशाल्लाह... बहोत खूब.....
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / १३-०८-२००९.

सर्वांचे आभार

क्रान्ति, चित्त व खलिश,

प्रतिसादांमुळे उत्साह आला.

धन्यवाद!

मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा

छान !
हा खरा शेर !

आहे तुझ्यात 'सध्या' ते काय नेमके ... की
येतो तुझ्याकडे मी.. कोणी नसेल तेव्हा

ह्यावरून पटकन हा शेर आठवला-
कौनसी बात है तुममे ऐसी
इतने अच्छे क्यो लगते हो

मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा

वा! मस्त आहे शेर!

मी ऐकणार होतो, ते बोलणार होते
जगणार कोण आहे उलटे ठरेल तेव्हा?
( निदान आता तरी तुम्ही मला 'ते' कोण असे विचारण्याचे कारण उरू नये :) )