नकोशी
Posted by क्रान्ति on Sunday, 9 August 2009
का असे होते कधी की मी मला होते नकोशी?
का जिवाच्या पार सलते गूढ अतृप्ती, असोशी?
मोकळे आभाळ, स्वच्छंदी भरारी पाखरांची,
कापलेले पंख माझे, कैद मी माझ्याच कोषी
तो तुला नेईल मुक्कामी तुझा होऊन साथी,
वाट चुकलेल्या प्रवाशा, का असा अस्वस्थ होशी?
कोण तू? का व्यर्थ ताठा? काय तू देशी कुणाला?
देतसे जो चोच, तो चाराहि देई, तोच पोशी
ऐन बहरातून माझी वाट ओलांडून गेला,
हा वसंताचा गुन्हा की झोपलेले दैव दोषी?
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
मंगळ, 11/08/2009 - 17:35
Permalink
प्रथम विश्वस्तांचे अभिनंदन!
संकेतस्थळ आता आधिकच सुंदर, सहज अॅक्सेस करण्यासारखे (विविध घटक ) असलेले व आकर्षक झाले आहे.
क्रांति,
ही गझल आवडली. प्रवासी व चोच हे शेर छान आहेत. काय तू देशी कुणाला हा विषय छान मांडलात आपण! मतला फार सुरेख आहे. ( मी प्रवाहात का नाही या आपल्या गझलेची आठवण झाली)
वसंत वगैरे विषय खूपवेळा आलेले व कंटाळवाणे वाटतात ( मला)!
शुभेच्छा!