मिठीत तोच गोडवा

बराच काळ नांदले शरीर जीवना अता
जुनी रदीफ मागते नवीन काफिया अता

कधी कधी 'न बोलणेच' छान वाटते तुझे
मधेमधे स्वतःकडे हवे बघायला अता

तुझा नवीन प्रश्नही जुनाच वाटला मला
तुला उगीच वाटले 'बरा मिळेल हा अता'

म्हणायचात 'सर्व संपले तुझे, खलास तू'
तुम्हीच चाललात, हा प्रकार शोभला अता?

पुन्हा न थाप मारुनी कधीच दूर जायचो
'तुला हवेच ते', तुझा विचार जाणला अता

मिठीत तोच गोडवा, कधी तुझी, कधी तिची
तुम्हात एकदा समेट व्हायला हवा अता

नसेल वा असेल मद्य, एकसारखेच ते
करून सिद्ध जाहले, 'भरा अता, भरा अता'

गझल: 

प्रतिसाद

मिठीत तोच गोडवा, कधी तुझी, कधी तिची
तुम्हात एकदा समेट व्हायला हवा अता

नसेल वा असेल मद्य, एकसारखेच ते
करून सिद्ध जाहले, 'भरा अता, भरा अता'

भूषणजी,गझल छान आहे, सर्व शेर छान आहेत...वरील शेर ख्ररच क़ाबिल-ए-तारीफ़ आहेत.

बहोत खूब.......

आणी...

बराच काळ नांदले शरीर जीवना अता
जुनी रदीफ मागते नवीन काफिया अता

कधी कधी 'न बोलणेच' छान वाटते तुझे
मधेमधे स्वतःकडे हवे बघायला अता.......

* जुनी रदीफ मागते नवीन काफिया अता.....आफ़रीन

मतला आणी तद नंतरचा शेर ही सुंदर.
` ख़लिश '-विठ्ठल घारपुरे/८-८-२००९.

बराच काळ नांदले शरीर जीवना अता
जुनी रदीफ मागते नवीन काफिया अता

कधी कधी 'न बोलणेच' छान वाटते तुझे
मधेमधे स्वतःकडे हवे बघायला अता

ह्या पहिल्या २ द्विपदी चांगल्या झाल्या आहेत. विशेष आवडल्या. माझे आयुष्य म्हणजे गझल आहे व त्यातले दिवसरात्र म्हणजे रदीफ काफियांसारखे आहेत, अशा आशयाचा एक उर्दू शेर वाचला होता. तो काही आठवत नाही आहे. तुमचा शेर अर्थातच वेगळा आहे.

एकंदर छान आहे गझल. कवीला नावीन्याचा सोस असणे चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या गझलेला (तिच्या गझलियतेला) हा सोस अनेकदा अजिबात सोसवत नाही. अर्थात प्रयत्नांती परमेश्वर. शुभेच्छा.

प्रतिसादांमुळे उत्साह आला.

धन्यवाद!