मी फुलांची मूक भाषा जाणतो.....
मी फुलांची मूक भाषा जाणतो
दाह त्यांच्या आसवांचा जाणतो....१.
रोज मी जातो खुल्या पायी वनीं
कंटकांचा ही जिव्हाळा जाणतो !....२.
मी वनाच्या सर्व वाटा पाहिल्या
लूटला जाणार केव्हा जाणतो....३.
पारध्यानो ! , या शिका भाषा नव्या
पाखरांच्या सर्व भाषा जाणतो !....४.
पाखरानो ! या बसा, जाऊ नका
मी भयांच्या सर्व वाचा जाणतो....५.
ये जरा तू आज माझ्या ही घरी
हा अबोला का असावा जाणतो....६.
फार नाही आज मी रडणार रे...
मी तुझ्या ही भावनांना जाणतो....७.
प्रेम नाही फार कोणी ही करू
खेळ हा सोपा न साधा जाणतो....८.
गझल:
प्रतिसाद
विश्वस्त
गुरु, 06/08/2009 - 23:02
Permalink
रचना तपासावी
रचना तपासावी. ३ रा आणि ५ वा शेर तपासावा. अन्त्ययमकापूर्वी ३ऱ्या द्विपदीत एकारान्त आणि ५ व्या द्विपदीत ईकारान्त शब्द आला आहे. तिथे स्वरयमक आकारान्त हवे. योग्य तो बदल करावा.
खलिश
शुक्र, 07/08/2009 - 11:06
Permalink
मान्यवर, धन
मान्यवर,
धन्यवाद.
योग्य ते बदल करून गझल पुनः प्रस्तुत करत आहे.(शेर छान होते म्हणून जरा घाई झाली ख री. माफी असावी ) एक नवा शेर चांगला वाटला म्हणून वाढवला आहे.
आशा आहे की आता गझल तंत्र शुद्ध होईल.
लोभ असावा ही विनंती.
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / ७-८-२००९.
ज्ञानेश.
शुक्र, 07/08/2009 - 13:27
Permalink
छान.
मान्यवर खलिश,
रोज मी जातो खुल्या पायी वनीं
कंटकांचा ही जिव्हाळा जाणतो !
हा शेर खूप छान आहे.
अभिनंदन.
खलिश
शुक्र, 07/08/2009 - 19:15
Permalink
मान्यवर, आप
मान्यवर,
आपल्या उत्तेजना बद्दल मनः पूर्वक आभार. विश्वस्तांच्या सूचने प्रमाणे, मी सुधारणा करून गझल पु नः ठेवली आहे, कृपया,ती वाचावी.
नियाझमंद,
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / ०७-०८-२००९.
भूषण कटककर
शुक्र, 07/08/2009 - 19:52
Permalink
आस्वाद घ्यायचा प्रयत्न केला.
खलिश, आपण ही रचना व्यवस्थित दुरुस्त केलीत हे पाहून आपले अभिनंदन करावेसे वाटले. आपला वावरही छान आहे व गांभीर्य तर दिसतच आहे. विश्वस्त वेळोवेळी देत असलेल्या प्रोत्साहनाने आपण सुंदर गझल करू लागला आहात. एक रसिक म्हणून मी आशयाबाबतीत मला जे वाटले ते लिहीत आहे. कृपया राग मानू नयेत व माझे प्रमाण आहे असेही मानू नयेत. ही फक्त मैत्रीतील मते आहेत.
मी फुलांची मूक भाषा जाणतो
दाह त्यांच्या आसवांचा जाणतो....१. ( आपण शेरांना क्रमांक का देता?) मतल्याचा आशय ठीक वाटला. 'त्यांचा आसवांचा' दाह जर 'आपण' जाणता असे म्हणत असाल तर एक शंका! त्यांच्या आसवांचा दाह आपल्याला कळण्याची पार्श्वभूमी काय असू शकेल?
रोज मी जातो खुल्या पायी वनीं
कंटकांचा ही जिव्हाळा जाणतो !....कंटक या शब्दाचा काटे असा अर्थ असल्यास मला माहीत नाही. तसा असल्यास हा शेर उत्तम वाटतो. तसा असेल असा अंदाज बांधता येत आहे कारण आपण 'वनाचा' उल्लेख केलेला आहेत. पण माझ्या माहितीप्रमाणे 'कंटक' या शब्दाचा अर्थ 'वाईट' या स्वरुपाचा आहे. जर त्याचा अर्थ 'काटा' असाही होत असेल तर मला नवीन समजले याबद्दल धन्यवाद!
मी वनाच्या सर्व वाटा पाहिल्या
लूटला जाणार केव्हा जाणतो....
छान शेर! वन हा शब्द आपण 'दश्त' या शब्दावरून घेतला आहेत की काय असे हा शेर वाचून मला वाटत आहे. तसेच, 'लूटला' हाही शब्द मला 'बरबाद होना, लुट जाना' अशा वाक्प्रचाराच्या जवळचा वाटतो. आपल्या रचनांमधे व प्रतिसादांमधे आपण उर्दू रचनांच्या दृष्टीकोनातून वावरता आहात असे मला पहिल्यापासूनच वाटत होते. माझे हे मत चुकीचे असल्यास माफ करावेत. पण जर मराठीत याच आशयाचा शेर रचायचा झाला तर मराठी कवी सहसा हे शब्द, वन ही उपमा वापरेल असे मला वाटत नाही. तेव्हा, आपला शेर मराठी दृष्टिकोनातून भिडणे जरा अवघड वाटले. शेवटी स्वातंत्र्य आपलेच!
पारध्यानो ! , या शिका भाषा नव्या
पाखरांच्या सर्व भाषा जाणतो !....४.
हा शेर समजला नाही. ( काय म्हणायचे आहे ते समजले नाही.) कृपया सांगावेत.
पाखरानो ! या बसा, जाऊ नका
मी भयांच्या सर्व वाचा जाणतो....५.
हाही शेर समजला नाही.
ये जरा तू आज माझ्या ही घरी
हा अबोला का असावा जाणतो....६.
यात दोन ओळींचा संबंध लक्षात आला नाही. ही सर्व मते रसिक म्हणून आहेत.
फार नाही आज मी रडणार रे...
मी तुझ्या ही भावनांना जाणतो....७.
शेर समजला नाही.
प्रेम नाही फार कोणी ही करू
खेळ हा सोपा न साधा जाणतो....८.
या शेरात आपण जे सांगत आहात त्यात नावीन्य यायला हवे असे मला वाटले.
ही सर्व मते रसिक म्हणून देत आहे. कृपया, प्रतिसाद दिलातच तर 'मान्यवर' वगैरे उल्लेख करू नयेत. मात्र, तीन गोष्टी:
१. आपले गांभीर्य आवडले.
२. तंत्रशुद्ध गझल केल्याबद्दल अभिनंदन
३. आशय फारसा भिडला नाही.
शुभेच्छा!