तुझ्याविना हे शहर तुझे

जिथे तिथे लूटमार अन जाळपोळ येऊन गाठते
तुझ्याविना हे शहर तुझे एकट्या जिवाला लुबाडते

मनात इच्छा नसूनसुध्दा समेट होतो पुन्हा पुन्हा...
अबोल आयुष्य आसवांचे हत्यार जेव्हा उगारते

दंवात न्हाल्या तुझ्या फुलांना किमान जाणीव पाहिजे
कुणीतरी रात्र जाळल्यावर कुठेतरी बाष्प साठते

क्षणेक झाल्या गळामिठीचा मला नसे खेद एवढा
क्षणात निर्माल्य जाहल्याची अजूनही खंत वाटते

सदैव कंटाळल्या लयींचे प्रवाह पाहून गांजलो
तुझे हसू ऐकुनी समजले नदी अशीही खळाळते

असाच तू जोर लावुनी हे फिरव तुझे चक्र जीवना
बघूच आता नशीब हे कोणत्या घरावर स्थिरावते

अता कसे पेटणे जमावे , अता कुठे आग तेवढी?
दिव्यातले तेल आजही कालची जुनी वात मागते

कधी तुला जाणवेल धोका? कधीतरी जाणवेल का??
अथांग डोहामधे तुझे चांदणे किती खोल वाकते

गझल: 

प्रतिसाद

क्षणेक झाल्या गळामिठीचा मला नसे खेद एवढा
क्षणात निर्माल्य जाहल्याची अजूनही खंत वाटते
वा! क्या बात है. फारच आवडला हा शेर. शेवटचा शेरही वाचताना फारच बरे वाटते आहे. सहावी आणि सातवी द्विपदी (मला) थोडी संदिग्ध वाटली. एकंदर सुरेख गझल.

वैभव,

फारच सुंदर गझल!

सगळेच शेर आवडले.

हे तर फारच!

दंवात न्हाल्या तुझ्या फुलांना किमान जाणीव पाहिजे
कुणीतरी रात्र जाळल्यावर कुठेतरी बाष्प साठते

क्षणेक झाल्या गळामिठीचा मला नसे खेद एवढा
क्षणात निर्माल्य जाहल्याची अजूनही खंत वाटते

सदैव कंटाळल्या लयींचे प्रवाह पाहून गांजलो
तुझे हसू ऐकुनी समजले नदी अशीही खळाळते

असाच तू जोर लावुनी हे फिरव तुझे चक्र जीवना
बघूच आता नशीब हे कोणत्या घरावर स्थिरावते

( हत्यार..मी गागाल असा उच्चार ऐकला आहे. असो. इतरत्र ती चर्चा झालीच आहे.)

गझल आवडली वैभव!
निर्माल्य आणि बाष्प हे शेर विशेष आवडले.

दिव्यातले तेल आजही कालची जुनी वात मागते

ही श्रेष्ठ ओळ आहे.

ही ओळ रचणार्‍या तुला आपला सलाम! ( तसेच, दव या ओळीस सुद्धा!)

शेकडो गझलांमधे गझलकारांनी ज्यांना स्पर्शही केला नाही अशा भावनांना अत्यंत हृदयस्पर्शी स्पर्श तू केला आहेस असे माझे मत असून तुला खरच सलाम!

संध्याकाळी घाईघाईत वाचली होती, आता मन लावून वाचल्यानंतरचा प्रतिसाद दिला.

खरीखुरी 'गझल'!

( मतला, जीवनाचे चक्र व निर्माल्य हे शेर जरा वेगळे होऊ शकतील का?)

मनात इच्छा नसूनसुध्दा समेट होतो पुन्हा पुन्हा... - हा मिसरा 'बुल्स आय'!

चित्तरंजन,

अता कसे पेटणे जमावे , अता कुठे आग तेवढी?
दिव्यातले तेल आजही कालची जुनी वात मागते

या शेराबाबत प्रतिसाद देताना मी आपला प्रतिसाद वाचलेला नव्हता. मला जाणवलेला 'विशिष्ट' अर्थ लिहीत आहे. आपल्याला किंवा वैभवला कसा वाटला ते समजल्यास बरे वाटेल.

'फायर इन द बेली' स्वरुपाचे विधान आहे असे माझे मत आहे. ही द्विपदी 'नोकरीतील' जाचाशी / 'प्रणयाशी', / 'बेभान जगण्याच्या इच्छेशी' / लहानसे होण्याच्या नैसर्गीक उबळेशी, / तब्येतीशी ( यातील कशाशीतरी ) संबंधित असावी असे मला वाटले.

माझ्यामते, यातील सानी मिसरा अत्यंत श्रेष्ठ आहे. अर्थात, हे वैयक्तिक मत आहे. सर्वांच्याच मतांचा आदर!

दंवात न्हाल्या तुझ्या फुलांना किमान जाणीव पाहिजे
कुणीतरी रात्र जाळल्यावर कुठेतरी बाष्प साठते

अता कसे पेटणे जमावे , अता कुठे आग तेवढी?
दिव्यातले तेल आजही कालची जुनी वात मागते

वावा! मस्त शेर!

मतल्याच शेर मात्र तसा वेगळा पडतो आहे...

छान्..शेर
असाच तू जोर लावुनी हे फिरव तुझे चक्र जीवना
बघूच आता नशीब हे कोणत्या घरावर स्थिरावते

अता कसे पेटणे जमावे , अता कुठे आग तेवढी?
दिव्यातले तेल आजही कालची जुनी वात मागते

हत्यार
माझ्या माहितीप्रमाणे हा शब्द दोन प्रकारे उच्चारता येईल...
हत् त्यार (गा गा ल) आणि हत्यार (ल गा ल)
या शब्दाच्या मागील अक्षररचनेवर(असल्यास) याचा उच्चार अवलंबून आहे.
माझ्याच ओळी घ्या...
हत्यार काळजाचे अजुनी तिथेच आहे - येथे हत् त्यार (गा गा ल) असे आहे.
माझ्याच भावनांना माझे हत्यार आहे - येथे हत्यार (ल गा ल) असे आहे.
असो.

अप्रतिम! चांदणे आणि पेटणे.

छान गझल !

सुंदर गझल.आवडली.

सुंदर झालेय गझल.
अजयजींशी सहमत!
येथे हत् त्यार वाचावे लागत असल्याने मीटर गडबडतोय!

अप्रतीम गझल !!!