किती स्तब्धता ही प्रवाही अताशा

जुनी ओढ नाही कुणाही अताशा
किती स्तब्धता ही प्रवाही अताशा

सजावे असे वाटते एकदा.... पण
तुझा वेळ जातो कसाही अताशा

जुनी स्वप्न सारी खरी होत गेली
छळे का तरी पूर्तताही अताशा?

कुठे तू पहाटेस होतोस जागा?
कुठे जागते होत लाही अताशा?

उगी खेचुनी न्यायचे एक नाते
टिको ही अपेक्षाच नाही अताशा

उशीला अता काम निम्मेच आहे
फुलांना नसे काम काही अताशा

प्रवासात एकाच गाडीत जावे
तसे होत आहोत राही अताशा

निरोपास बोलायचे काय .... चिंता!
तुलाही अताशा, मलाही अताशा

गझल: 

प्रतिसाद

उगी खेचुनी न्यायचे एक नाते
टिको ही अपेक्षाच नाही अताशा
सही!
निरोपास बोलायचे काय .... चिंता!
तुलाही अताशा, मलाही अताशा
क्या बात है!

सहज जाता जाता, या दोन्ही शेरांच्या जवळपास असणारा माझ्या एका उर्दू गझलचा मक्ता आठवला.
'रूह' ये रिश्ता कैसे निभेगा?
वो हैं खफा कुछ, हम हैं खफा कुछ!

जुनी स्वप्न सारी खरी होत गेली
छळे का तरी पूर्तताही अताशा?

उशीला अता काम निम्मेच आहे
फुलांना नसे काम काही अताशा

निरोपास बोलायचे काय .... चिंता
तुलाही अताशा, मलाही अताशा

उत्तम!

कलोअ
चूभूद्याघ्या

मतला, पूर्तता हा शेर (त्यातला 'स्वप्न' शब्द खटकला), खेचुनी न्यायचे नाते, उशी आणि मक्ता.. सॉरी शेवटचा शेर - हे सर्व आवडले.

गझल प्रवाही आहे या वरील मताशी सहमत.

आमचाही एक (सामाजिक, भरतीचा वगैरे) शेर-

"अता वंचितांचा न आवाज येतो
रुजू लागली लोकशाही अताशा.."

अजय, क्रान्ति, ज्ञानेश - आभार!

ज्ञानेश,

स्वप्न हा शब्द खटकणे - योग्य आहे. मी बोली भाषा घाइघाईत वापरुन गेलो. तरीही संपादीत करत नाहीये. कारण जे झाले ते झाले:-)

आपला 'सामाजिक, भरतीचा वगैरे' शेर आवडला.

ही एका अशा स्त्रीच्या भूमिकेतील गझल आहे की जिला वैवाहिक आयुष्याच्या उत्तरार्धात नात्यातील फोलपणा जाणवत आहे. ( फोलपणाच असतो असे म्हणायचे नाही.)

सजावे असे वाटते एकदा.... पण
तुझा वेळ जातो कसाही अताशा

मान गये!

छान गझल!
नाते आणि निरोप हे शेर मला विशेष आवडले!!