आता माझी एक ओळही मलाच भावत नाही

विकास आहे की अधोगती काही समजत नाही
आता माझी एक ओळही मलाच भावत नाही

तेजाच्या दिसताच खुणा धावून गाठणे उरले
आज उगवता सूर्य स्वतःची दिशाच कळवत नाही

गेलेला क्षण पाहुन वाटे उगाच घाबरलो की
येणारा क्षण पाहुन वाटे काही धडगत नाही

दिली आत्मविश्वासाला मी तिलांजली त्राग्याने
मग जे जमले ते जमले हे खरेच वाटत नाही

असो कुणीही, प्रत्येकाला हेच वाटते येथे
'मला समजते दुनिया, दुनियेला मी समजत नाही'

थकबाकी दु:खांची आता इतकी झाली आहे
काय व्हायचे याची तर कल्पनाच करवत नाही

कोणाच्या दु:खावर हा आनंद विसंबुन माझा?
सार्‍यांसाठी बरे असे काहीच का जमत नाही?

उत्कर्षाच्या शिखरावरती रामराम द्यावा..पण
आपणही घसरू शकतो हे सत्य मानवत नाही

गझल: 

प्रतिसाद

ही गझल मी काल 'नभाचे शब्द स्वच्छंदी'मधे सादर केली. बहुधा सर्वांना आवडली असावी असे आविर्भावांवरून वाटत होते. :-)) मला स्वतःलाही ही गझल बर्‍यापैकी आवडते.

कदाचित कुणी वाचलेली नसेल असे वाटल्याने वाचकांच्या अभिप्रायार्थ ही गझल यादीत पुन्हा वर आणत आहे याबद्दल क्षमस्व!

धन्यवाद!

मि वाचली होतिच....पण काल ऐकताना अजून मजा आली....छनच आहे गझल.

डॉ.कैलास

उत्कर्षाच्या शिखरावरती रामराम द्यावा..पण
आपणही घसरू शकतो हे सत्य मानवत नाही

मस्तच आहे गझल.

मस्त आहे गझल! शेवटचा शेर खूप आवडला. पटला.

मला खालील शेर आवडले.

असो कुणीही, प्रत्येकाला हेच वाटते येथे
'मला समजते दुनिया, दुनियेला मी समजत नाही'

उत्कर्षाच्या शिखरावरती रामराम द्यावा..पण
आपणही घसरू शकतो हे सत्य मानवत नाही

काही कारणास्तव कार्यक्रमाला उपस्थित रहाता नाही आले.
क्षमस्व!
----------------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

काव्यरसिकशी सहमत. हेच आवडले.

खुप आवडली. सूर्य आवडले.

मतला चांगला.
गेलेला क्षण, दुनियेला मी समजत नाही, काही धडगत नाही..हे खूप आवडले.

भरपूर शेर करण्याऐवजी मोजकेच काफिये घेऊन अर्थगर्भ शेर करण्याबाबत विचार करावा.

भन्नाट....
आवडली

असो कुणीही, प्रत्येकाला हेच वाटते येथे
'मला समजते दुनिया, दुनियेला मी समजत नाही'

उत्कर्षाच्या शिखरावरती रामराम द्यावा..पण
आपणही घसरू शकतो हे सत्य मानवत नाही

सर्वांचे आभार!

सर्वच शेर अप्रतिम.

वा वा! मतला मनाला भिडला..
विकास आहे की अधोगती काही समजत नाही
आता माझी एक ओळही मलाच भावत नाही