असे पाण्यामुळे गंगा
अशी मी धबधब्याखाली कधीची नाहते आहे...
जिथे माझ्याच अश्रूंची नदीही वाहते आहे ..!
असे पाण्यामुळे गंगा, नसे गंगेमुळे पाणी;
तसे मरणामुळे जगणे भरूनी वाहते आहे ..!
हव्या शीतल खुणा सार्या जगाला तप्त सूर्याच्या..
तशा देऊन मीही चन्द्र बनुनी दाहते आहे ..!
अमावास्या असो वा पौर्णिमा, नसतो फरक काही;
रवीचे येत जाणे रोज पृथ्वी साहते आहे ..!
नसे माझे-तुझे नाते जगाला माहिती म्हणुनी..
तुझेही नाव अभिमानात जगभर राहते आहे ..!
दगड म्हणुनी कधी हिणवून लाथाडू नको देवा !
तुला माझ्याच जागी विश्व सारे पाहते आहे ..!
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
रवि, 26/07/2009 - 12:45
Permalink
असे पाण्यामुळे गंगा... नसे गंगेमुळे पाणी
चांगली गझल अजय! आपले हे दोन शेर वाचून...
नसे माझे-तुझे नाते जगाला माहिती म्हणुनी..
तुझेही नाव अभिमानात जगभर राहते आहे ..!
दगड म्हणुनी कधी हिणवून लाथाडू नको देवा !
तुला माझ्याच जागी विश्व सारे पाहते आहे ..!
मला माझ्या दोन द्विपदी आठवल्या...
मी स्तुती करता जगाला वाटते मोठा किती तू
अन्यथा तू काय ते मी जाणतो गद्दार मित्रा
जो अणूरेणूत आहे तोच या विश्वात आहे
काळजी नाही, कसाही लाभुदे आकार मित्रा
तुला माझ्याच जागी विश्व सारे पाहते आहे ही ओळ आवडली.
अजय अनंत जोशी
रवि, 26/07/2009 - 20:26
Permalink
धन्यवाद भूषण! पण...
नसे माझे-तुझे नाते जगाला माहिती म्हणुनी..
तुझेही नाव अभिमानात जगभर राहते आहे ..!
दगड म्हणुनी कधी हिणवून लाथाडू नको देवा !
तुला माझ्याच जागी विश्व सारे पाहते आहे ..!
या ओळी आणि तुम्ही दिलेल्या ओळींच्या अर्थात फरक आहे.
शेवटचा शेर देवावर नाही आहे. तिथे देव आणि दगड ही प्रतिमा म्हणून वापरली आहे. त्याचप्रमाणे 'नसे माझे-तुझे..' हा शेर तुम्ही दिलेल्या तुमच्या द्विपदीप्रमाणे नाही आहे. तुम्हाला समजले असेलच म्हणा. या गझलेत चन्द्र, सूर्य, गंगा, पाणी, अमावास्या वगैरे प्रतिमा म्हणूनच वापरल्या आहेत. मला खगोलशास्त्र शिकवायचे नाही यातून.
कलोअ
चूभूद्याघ्या
भूषण कटककर
रवि, 26/07/2009 - 20:35
Permalink
अर्थातील भिन्नता
आता कशावरून काय आठवावे इतके तरी स्वातंत्र्य राहूदेत की मला... :-)
बाकी , समजा खगोलशास्त्र शिकवलेत तरी माझी हरकत नाही. :-)
आत्ताच एका ठिकाणी वाचले की एका मुशायर्यात ( मराठी गझलच्या ) भीमराव पांचाळे यांच्या काही 'सहकार्यांनी' एक मिसरा मराठीत व दुसरा हिंदीत अशा गझला सादर केल्या. ( लिंक इथे देत नाही.)
त्यापेक्षा 'खगोलशास्त्र' शिकलेले बरे:-))
अजय अनंत जोशी
रवि, 26/07/2009 - 20:42
Permalink
हा हा हा
स्वातंत्र्य आहेच हो. मी इतरांना कळावे म्हणून सांगितले. नाहीतर गद्दार आणि आकार शब्दांवरून गोंधळ उडायचा.... काय..:-)
कलोअ
चूभूद्याघ्या
भूषण कटककर
रवि, 26/07/2009 - 20:48
Permalink
चालुद्या...:-)
बाय द वे, आत्ताच 'आयुष्यावर बोलू काही' हा एक ( महान काव्याचा ) कार्यक्रम लागला आहे टीव्ही वर! त्यातील बाबांच्या सेलफोनवरून राँग नंबर लावणारे बाळ बाप्पाशी बोलून आजोबांना परत 'खाली' पाठवायला सांगते त्यावरूनही मला एक कविता आठवली. :-))
इतर वाचकांना - ( कृपया माफ करा, हा व आधीचा प्रतिसाद गझलेवर नाही म्हणून)