हुंदका साधा तुझा सांगून गेला

हुंदका साधा तुझा सांगून गेला
आसवांचा ओघही संपून गेला

द्वाड होता शब्द माझा बांधलेला
मोकळा केला तसा बोलून गेला!

कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला!

का पहावी वाट फुलण्याची कळीने?
भृंग इच्छेने कुठे येऊन गेला?

" आज नाही", एवढेसे ती म्हणाली
तो नकाराने किती पोळून गेला !

भेटले मज लोक सारे टाळणारे ...
खेद हा की काळही सोडून गेला

-सोनाली जोशी

(पूर्वप्रकाशन- मराठी गझल. कॉम)

गझल: 

प्रतिसाद

द्वाड होता शब्द माझा बांधलेला
मोकळा केला तसा बोलून गेला! - फारच सुंदर शेर!

कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला! - वा वा! भेटण्याची वेळ तो पाळून गेला.

का पहावी वाट फुलण्याची कळीने?
भृंग इच्छेने कुठे येऊन गेला? - सुंदर!

" आज नाही", एवढेसे ती म्हणाली
तो नकाराने किती पोळून गेला ! - छान!

भेटले मज लोक सारे टाळणारे ...
खेद हा की काळही सोडून गेला - सुंदर शेर!

ओव्हरऑल फारच सुरेख गझल!

सगळीच गझल आवडली.
द्वाड होता शब्द माझा बांधलेला
मोकळा केला तसा बोलून गेला!

कोणती ही रीत झाली वागण्याची?
भेटण्याची वेळ तो पाळून गेला!
हे खूपच खास!

क्रान्ति
{रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर |
अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

एकाच धाग्याने बांधलेली उत्तम गझल.
कलोअ
चूभूद्याघ्या

प्रतिसादांकरता आभारी आहे.
इथे करण्यात आलेल्या सूचना, कौतुक, टीका सगळ्यामुळे लेखनाचा उत्साह कायम राहतो.
सोनाली

वाह वा......... सारे च शेर छान आहेत.

भेटले मज लोक सारे टाळणारे ...
खेद हा की काळही सोडून गेला

` ख़लिश '/२६-०७-२००९.

खासच आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस