मद्यालय
मद्यालय हे, कोण कुठे पाजत बसते पण?
'जणू पाजली आहे' का वाटत बसते पण?
ओठ पिळावे, दूध निघावे, वय विश्वाचे
डाह्याभाईची गणिते घालत बसते पण
भोगुन गेला काल उधारीवर गणिकेला
आशेपोटी आज फुले माळत बसते पण
मी माझ्या चवदार तळ्याला मुक्त करवले
आधीची घटनाच पुन्हा चाळत बसते पण
धरणे भरली काल म्हणे एकवीस टक्के
भरलेली नसतील असे वाटत बसते पण
थांब्यावरच्या सहवासाला हृदय मिळाले?
हरकत नाही म्हणा तशी... त्रासत बसते पण
रामोजी नगरीमधली अस्मिता असावी
आतच असते, वेळेला लाजत बसते पण
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
सोम, 20/07/2009 - 19:54
Permalink
अर्थ
या शब्दरचनेचा अर्थ:
मद्यालय हे, कोण कुठे पाजत बसते पण?
'जणू पाजली आहे' का वाटत बसते पण?
जग एक मद्यशाळा आहे, पण प्रत्येक जण स्वत:ला मिळावी म्हणून असे दाखवतो की दुसयाला पाजत आहे. मुलाला आई वडील जन्म देतात, एम्प्लॊयर नोकराला पगार देतो, प्रत्येक देण्यामधे एक घेण्याचू सुप्त अपे़क्षा असते. माणसाला वाटते आपल्याला हे मिळाले, ते मिळाले, वास्तवात त्याच्याकडून काहीतरी काढून घेऊनच नशीब / माणसे त्याला काहीतरी देत असतात.
ओठ पिळावे, दूध निघावे, वय विश्वाचे
डाह्याभाईची गणिते घालत बसते पण
इयत्ता सहावीमधे डाह्याभाई या वाण्याचा उल्लेख असलेले एक अवघड गणित होते. विश्व खरे तर निर्माण होऊन जितकी वर्षे झाली आहेत त्याहून कितीतरी पटीने अधिक वर्षे विश्व अस्तित्वात असणार आहे. म्हणजेच, विश्व अजून एक लहान बालक आहे. पण आयुष्यात अशी परिस्थिती निर्माण करते की जणू डाह्याभाईचे गणित सोडवत आहोत असे वाटावे.
भोगुन गेला काल उधारीवर गणिकेला
आशेपोटी आज फुले माळत बसते पण
आपल्याला कितीही टक्केटोणपे खावे लागले तरीही शेवटी ’उद्या काहीतरी वेगळे होईल, चमत्कार घडेल’ या आशेवर माणूस जगतो.
मी माझ्या चवदार तळ्याला मुक्त करवले
आधीची घटनाच पुन्हा चाळत बसते पण
माझ्यातील जो काही थोडाफ़ार चांगुलपणा आहे तो माझ्यातील अनेक दोषांपासून मी मुक्त करण्यात व नवीन संहिता तयार करण्यात यशस्वी झालो खरा, पण ... बदललो तर तो मी कसला! पुन्हा पुन्हा तेच दोष बळावतात.
धरणे भरली काल म्हणे एकवीस टक्के
भरलेली नसतील असे वाटत बसते पण
त्रास, चिंता, कटकटी यांची इतकी सवय झाली आहे की चांगली बातमी आली तरीही ती खोटीच असेल असे मन सांगते.
थांब्यावरच्या सहवासाला हृदय मिळाले?
हरकत नाही म्हणा तशी... त्रासत बसते पण
बसस्टॊपवर दहा एक मिनिटे अपरिचित लोक एकमेकांच्या सहवासात असतात. एखाद दोन वाक्ये बोलतात. ( हल्ली बसच्या टायमिंगला काही अर्थच नाही आहे वगैरे स्वरुपाची ). आयुष्य एक असाच लहानसा सहवास असूनही त्याच्यात माणसाला एक मन मिळाले आहे. मन हवेच कशाला होते? बर मिळाले तर मिळाले, पण त्याला सारखा त्रास होत बसतो अन त्याची काळजी घ्यावी लागते.
रामोजी नगरीमधली अस्मिता असावी
आतच असते, वेळेला लाजत बसते पण
रामोजी फ़िल्मसिटीमधे खयासारख्या खोट्या गोष्टी जशा आहेत तशी माणसाची अस्मिता आहे. दिसायला दिसत राहते, पण वेळ पडली की माणूस लाचार होतो. त्यावेळी ती अस्मिता दिखाऊ होती हे समजते.
( वाचकांचे आभार! )
अजय अनंत जोशी
रवि, 26/07/2009 - 20:50
Permalink
मी माझ्या चवदार तळ्याला मुक्त करवले
थांब्यावरच्या सहवासाला हृदय मिळाले !
नव्हती इच्छा... तरी कशी टाळत बसते पण..
असे म्हटले तर चालेल का?
कलोअ
चूभूद्याघ्या