कसे झाले?

मी तुला फुले दिलेली, त्यांचे काटे कसे झाले?
माझ्या भाबड्या शब्दांचे शस्त्रसाठे कसे झाले?

थोडी तुझी, थोडी तुझ्या घराची, थोडी पिलांची,
माझ्या एका अस्तित्वाचे लाख वाटे कसे झाले?

माझ्या-तुझ्या मुक्कामाचा काल एक मार्ग होता,
चालता चालता त्याचे दोन फाटे कसे झाले?

केव्हा लुटली वा-याने वेड्या मनाची तिजोरी?
चोहीकडे गुपितांचे हे बोभाटे कसे झाले?

जीव ओतून केली मी विदुषकाची भूमिका,
आयुष्याचे हसे झाले, कुणा वाटे, कसे झाले?

गझल: