अलिप्त

का अलिप्त जगणे माझे? मी प्रवाहात का नाही?
परिचित वा आप्त कुणीही या जमावात का नाही ?

दु:खाचे फक्त मुखवटे, अन् मोल दिलेले रडणे
आर्तता, शोक, व्याकुळता या विलापात का नाही ?

पातकी, पतित, पथभ्रष्ट, मूर्तिमंत पाप जरी मी,
कोसळताना पहिल्यांदा तू दिला हात का नाही ?

रुतणा-या कंटकवाटा, जखमी पायांनी फिरणे
एकही सुगंधित थांबा या प्रवासात का नाही ?

का उलटे पडती फासे ? का जिंकुनही मी हरते ?
हा डाव रडीचा इथला संपून जात का नाही ?

गझल: 

प्रतिसाद

दु:खाचे फक्त मुखवटे, अन् मोल दिलेले रडणे
आर्तता, शोक, व्याकुळता या विलापात का नाही ?
वावाव्वा!!!

का उलटे पडती फासे ? का जिंकुनही मी हरते ?
हा डाव रडीचा इथला संपून जात का नाही ?
वावाव्वा!!!

गझल अतिशय चांगली झाली आहे. अ़ख्खी गझल फार फार आवडली. अभिनंदन! फक्त पातकी, पतित, पथभ्रष्ट, मूर्तिमंत पाप जरी मी, ही ओळ अधिक ओघवती झाल्यास मजा येईल.

चित्तरंजन  यांच्याशी  सहमत  आहे.
उत्कृष्ट  गझल. 

गझल आवडली.

मतल्याची पहिली ओळ अन 'मोल दिलेले रडणे' या ओळी फार आवडल्या.

'तू दिला हात का नाही' हा शेर छान आहे.

अभिनंदन!

वा वा! छान गझल आहे. मोल दिलेले रडणे आणि सुगंधी थांबा विशेष आवडले.

सुगंधित थांबा व रडीचा डाव जास्त आवडले

क्रान्ति,
तुझी गझल आवडली. तुझा ब्लॉगही पाहिला. त्यावरच्या गझला आणि कविताही फार आवडल्या हे मुद्दाम सांगावेसे वाटते.
लेखनासाठी शुभेच्छा
सोनाली

दु:खाचे फक्त मुखवटे, अन् मोल दिलेले रडणे
आर्तता, शोक, व्याकुळता या विलापात का नाही ?
फारच छान.
एकंदर गझलच आवडली.
कलोअ चूभूद्याघ्या

धन्यवाद मंडळी.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

का अलिप्त जगणे माझे? मी प्रवाहात का नाही?
परिचित वा आप्त कुणीही या जमावात का नाही ?

वरील शेर खुपच आवडला