भाषा - एक कपाट

या लेखाचा हेतू : वस्त्रांमुळे सौंदर्य विविध प्रकारे प्रभावित होते पण मूळपणाने ते निर्माण होते हे मत मांडून आपल्याकडे असलेल्या वस्त्रांचा सुयोग्य पण मूळपणाने वापर कसा करता येईल याचा कुतुहलपुर्वक अभ्यास करणे! अर्थातच, अभ्यास करणे हा फक्त माझा हेतू आहे. इतरांनी मतप्रदर्शन करावे असे आवाहन आहे.

पार्श्वभूमी -

१. कविता ही एक कलाक्रुती आहे. कवीमधील प्रतिभाशक्तीच्या प्रमाणावर कोणती कलाकृती अधिक सुंदर होणार किंवा आहे हे ठरते. प्रतिभाशक्ती ही नैसर्गीक देणगी आहे. गायक, चित्रकार, खेळाडू, रसिक सगळेच प्रतिभावान असतात, पण कमी जास्त व विविध क्षेत्रात! कवीची प्रतिभाशक्ती त्याला आलेल्या अनुभुतींना भाषेच्या माध्यमातून छंदात प्रकट करण्याचा प्रयत्न करते व त्या व्यक्तीकरणातून रसिकांना / श्रोत्यांना / वाचकांना तीच अनुभुती ( त्यांना आली असो वा नसो ) एका भिन्न दृष्टिकोनातून दाखवून एक दिलासा किंवा स्फुर्ती देते. प्रतिभा किती आहे हे निसर्ग ठरवत असल्यामुळे आपोआपच एखादी कविता खूप श्रेष्ठ होते किंवा तितकीशी श्रेष्ठ होत नाही. मात्र, कविता स्फुरणे ही बाब विज्ञान, गणित याप्रमाणे शिकण्याची नसते इतके स्पष्ट व्हावे. तसेच कविता स्फुरणे हे नियंत्रणातही नसते, त्यामुळे ती कवीला कुठेही व कधीही सुचू शकते.

२. कविता एक जिवंत कवी करत असल्यामुळे त्याच्या हयातीतील व प्रदेशातील परिस्थितीचे चित्रण कवितेत होते / होऊ शकते हे उघड आहे.

३. एखादी परकीय गोष्ट स्वीकारणे यात त्या गोष्टीचे मूळ सौंदर्य कारणीभूत ठरते. जसे गझल हा काव्यप्रकार मराठीने स्वीकारणे यात गझलेची तांत्रिक व आशयाबाबतची सौंदर्यस्थाने कारणीभूत आहेत.

मूळ मुद्दा -

इराण मधून भारतात येऊन स्थिरावलेली, उर्दूमधे बेसुमार लोकप्रिय झालेली व आता मराठी व इतर स्थानिक भारतीय भाषांमधे रुजलेली गझल ही मुलतः दु:ख, प्रेमाची अभिलाषा ( दोन्ही - समलिंगी व भिन्नलिंगी ) , पराकोटीचे असुरक्षित सामाजिक / राजकीय वातावरण, कट्टरता, समाजाच्या समजुती ( हे अर्थात सर्वत्रच होणार ) यातून निर्माण झालेला काव्यप्रकार आहे. पर्शियन मला अजूनतरी मुळीच समजत नाही. मात्र उर्दू गझल लोकप्रिय होण्यामागे उर्दू भाषेची नैसर्गीक सौंदर्यस्थाने ( जसे आदब, हळुवारपणा, लकबी) व त्या काळचे दिल्लीतील व एकंदर वातावरण हे बर्‍याच प्रमाणात कारणीभूत आहे.

गझल जेव्हा इतर अनेक कवींमार्फत थोड्या प्रमाणात व स्व. भटांमार्फत बहुतेक प्रमाणात मराठीत अवतरली तेव्हा त्यात मराठीपण, म्हणजे मराठी भाषेची जी काही मूलभूत सौंदर्यस्थाने आहेत ती घेऊन आली. मराठीची सौंदर्यस्थाने जी आहेत तीही इतिहासामुळे, मातीमुळे व येथील पिढ्यानपिढ्यांच्या  ढोबळ प्रायॉरिटिज ( मराठी शब्द सांगावात ) मुळे! शिवाजी महाराज, ज्ञानेश्वर, तुकाराम, पांडुरंग, पेशवे, प्रांतीय प्रश्न, स्वातंत्र्योत्तर काळातील नेत्यांचे भ्रष्टाचार उघड होणे, काही नैसर्गीक आपत्ती, दुष्काळ, शेती हा व्यवसाय असणे, आजवरच्या कवितेत अभंग, ओवी, श्लोक, निसर्गवर्णनावर भर असणे, मुस्लिमांहून व तसेही उत्तर किंवा मध्य भारतीयांहून आपली स्त्री तौलनिकदृष्ट्या बरीच जास्त स्वतंत्र असणे व त्यामुळे प्रेमभावना 'काही' प्रमाणात उघड होण्यास थोडा तरी वाव असणे, लोकशाही शासनप्रणाली असणे, चित्रपटातून / नाटकातून प्रेम हा विषय जाहीरपणे प्रदर्शिला जाणे, माध्यमांची उपलब्धता असणे, अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. आज मी उघडपणे राजकीय पक्षांवर टीका करणारी रचना जाहीर करू शकतो. तसे उर्दू गझलच्या भरभराटीच्या काळात भयामुळे बर्‍याच अंशी शक्य झाले नसते. यामुळेच, मराठीत गझल येताना खूपच धीट होऊन आली असे माझे मत आहे.. तिने मराठी कवीच्या प्रतिभेला वापरताना भाषेची हळुवार वाट न धरता जास्त सच्चा, जास्त उघड वाटणारा, जास्त धीट असा मार्ग स्वीकारला. पाडगावकरांच्या गझलसद्रुश रचनांमधे किंवा गझलांमधे हळुवारपणा दिसतो. मात्र भट, खावर किंवा भटांच्या पुढील पिढ्यांच्या रचनांमधे तो दिसेलच असे नाही, उलट कमीच दिसतो.

मात्र, स्व. भटांच्या भरभराटीच्या काळानंतर इतक्या वर्षात आजही एकही नाव असे नसणे जे मराठी गझलेमधे स्व. भटांच्याच दर्जाचे किंवा बरोबरीने घेतले जाण्यासारखे समजले जावे, हे आश्चर्यकारक आहे. याचे माझ्यामते महत्वाचे कारण हे असावे की मराठी भाषेची तीच ती सौंदर्यस्थाने आजही जोरदारपणे वापरली जात आहेत. ( हे विधान या संकेतस्थळावरील गझलांबाबत अजिबात नाही. आजही मी खेड, सातारा अशा ठिकाणी पाहतो की आनंदकंदमधे जोरदार सामाजिक विचार लोक गझलतंत्रात प्रकट करत बसतात व टाळ्या मिळवतात. ) त्यामुळे, होणार्‍या गझला या शेवटी भटांच्या तुलनेत आपोआपच सुमार ठरतात व प्रभावित वाटतात. मराठी गझलकारांनी मराठी भाषेतील लाघवीपणा, नाजूकपणा, कडवटपणा, मधाळपणा, वाकडेपणा 'असे अनेक पणे' प्रामुख्याने वापरले पाहिजेत असे वाटते. डॉ. इक्बाल यांना दुसरा गालिब ( त्याच्याइतकीच प्रतिभा असलेला कवी )  का म्हणतात हे मला व्यक्तिशः समजलेले नाही. पण गालिबकडे जो दृष्टिकोन होता व त्याने भाषेची जी पोत वापरली ती इक्बाल यांनी वापरली असे मला तरी वाटत नाही. स्व. भटांनी अत्यंत नाजूक काव्यही कितीतरी केलेले दिसते. पण त्यांच्याच प्रतिमा, रुपके, विचार आजही प्रकट होतात असे मला वाटते. आजही चांदणे गझलेत येतेच. खरे तर आजच्या जमान्यात शुद्ध चांदणे ( निदान शहरात ) कुठे अनुभवायला मिळते? स्व. भटांनी काव्यात 'हाय' हा शब्द वापरला. अजूनही 'हाय' हा शब्द मराठी गझलेत येतो. आपण दैनंदिन जीवनात 'मराठी पद्धतीने हाय' कितीवेळा म्हणतो? हल्ली वसंत हा शब्द दैनंदिन जीवनात ऐकायला मिळत नाही, पण काव्यात येत राहतो. मी एकदा एका समीक्षकांना विचारले होते की कुसुमाग्रजांनी 'चांदण्याचे हात' म्हंटले, एखाद्याने 'गुलाबजामाचे हात' असे का म्हणू नये? त्यावर ते म्हणाले की "जरूर म्हणावे, पण कुसुमाग्रजांना स्थान आहे ते त्याला असायला पाहिजे. नवीन उपमा, प्रतिमा हव्याच आहेत." ( अर्थात गुलाबजामाचे हात हा पोरकट प्रश्न विचारण्याचे कारण वेगळे होते. ) म्हणजेच, मराठी गझलला वेगळी वळणे लावली तर स्व. भटांच्या थोड्याफार आसपासच्या पातळीचे तरी कवी होऊ शकतील. तसे तर वर पार्श्वभूमीमधे ( मुद्दामच ) म्हंटलेच आहे की ते नैसर्गीक आहे. मग जर भटांचेच अनुभव, तसेच जीवन कुणी अनुभवले तर 
तेच मुद्दे, तेच शब्द येतील हे खरे आहे. पण आजचा जमाना खूप वेगळा आहे. कदाचित आज स्व. भटांनीही खूप वेगळी गझल लिहिली असती. या स्थळावर डॉ. अनंत यांनी स्वरकाफिये वापरून कवीला बरेच मुक्त केले आहे, श्री. प्रदीप कुलकर्णींनी भाषेची गोड वाट स्वीकारून रूढही केली आहे. आपल्या प्रत्येक रचनेत काही ना काही नावीन्य व मूळपणा असण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे असे मला वाटते. भाषा हे एक कपाट असून त्यात अनेक वस्त्रांच्या घड्या आहेत. विविध वस्त्रे मूळपणाने वापरता यावीत. ती आपलीच आहेत असे पाहणार्‍याला वाटावे. त्याने आणखीन काही मोठी नावे निर्माण होऊ शकतील असा अंदाज आहे.

काही उदाहरणे :

१. सध्याचे एकंदर त्रस्त व्यावसायिक / नोकरीतील आयुष्य
२. सध्या घरा - घरांमधील वाढता तणाव व त्याचा आपल्याशी संबंध! हा तणाव वाढण्यामागे उच्च राहणीमानासाठी दोघांनी नोकर्‍या करून मुलांना वा आपल्यालाच वेळ न देऊ शकणे वगैरे!
३. धार्मिकता / विधींमधील मूळता लयाला चालली असणे ( वगैरे )
४.  क्षणभंगूर नाती निर्माण होणे / तुटणे
५. निसर्गाची ओढ वाटणे, निसर्गाला 'मिस' करणे
६. साधे निवांत जेवण नशिबात नसणे
७. ट्रॅफिक
८. वाढलेली अंतरे
९. वाढलेली स्पर्धा
१०. कम्युनिकेशनसाठी असलेली माध्यमे, त्यांचा प्रभाव, त्यांचा त्रास, त्यामुळे प्रत्यक्ष भेट हा प्रकार लोप पावणे वगैरे!
११. मैदाने न उरणे!
 
हे कितीतरी अनुभव आता मराठी गझलेत येऊ शकतात.

भाषेच्या प्रकाराची उदाहरणे:

स्व. भटांच्या काव्यात प्रेमाबाबत हळुवारपणा व जगाबाबात आक्रमकता दिसते असे माझे मत आहे. हळुवारपणा व आक्रमकता याशिवाय वक्रोक्ती, कडवटपणा, विनोद, चहाटळपणा, चावटपणा, रंगीनपणा,  ( हे प्रकार उर्दूने व चावटपणासारखे प्रकार मुख्यत्वे जिगरने वापरले आहेत. ) वापरता येतील असे वाटते.

धन्यवाद!


प्रतिसाद

बरेचसे मुद्दे पटळ्यासारखे आहेत. सध्य काही लिहिण्याअगोदर मला स्वतःचा अनुभव आणि वाचन कमी पडते असे वाटते. त्यामुळे प्रतिक्रिया काय द्यावी ह्याबाबत शाश्वती नाही. गझल स्वभावाभिमुख असावी की समाजाभिमुख याबद्दल वाद होऊ शकेल. तरीही दोन्हीचे संदर्भ एकाच काळात असल्याने तुमचे म्हणणे रास्त वाटते.
इतरांची मते वाचायला आवडेल.

(अवांतरः शब्द त्याच्या अर्थानुसार वापरला आहे की प्रतीक म्हणून यावर मतांतरे होतील. त्यामुळे चंद्र, चांदण्या, वसंत वगैरे बाद ठरतील असे होईलसे दिसत नाही. नविन प्रतीके येतानात्यांचा साज घेऊन आली तर नक्कीच प्रशंसनीय ठरतील. )