अढी कपाळावरील जेव्हा मनात गेली..

======================

अढी  कपाळावरील  जेव्हा  मनात  गेली..
कडू  विषाची  कुपी  जणू  जीवनात  गेली

अता  समजली  मला  सुखाची  प्रमाणव्याख्या,
अता  समजले- कितीक  वर्षे  भ्रमात  गेली..

तुझा  दुरावा  भरून  आहे  क्षणात  सार्‍या..
निदान  आता  विवंचनांची  ददात  गेली !

"यदा-यदा.."चा  कधीच  नाही  दिलास  प्रत्यय,
किती  युगे  आमची  तुला  पाहण्यात  गेली !

कडे- कपारी मधून  सांगे  मुकी  रियासत
"रणात  आम्ही  कमावली, ती  तहात  गेली"

लपून  तू  राहिलास  माझ्यामधेच  वेड्या...
सुखा ! तुला  शोधण्यात  माझी  हयात  गेली  !

 

-ज्ञानेश.
=======================

गझल: 

प्रतिसाद

ज्ञानेश, एकंदर गझल छानच आहे. पण माझ्यामते काही सुट्या ओळी सुखा ! तुला  शोधण्यात  माझी  हयात  गेली !,  रणात  आम्ही  कमावली, ती  तहात  गेली अशा सुट्या ओळी अधिक छान आहेत. अजून बरेच काही करता येईल असे वाटते. एकंदर गझल आवडली.

ज्ञानेश,

निदान आपण हे करू नयेत.

New people would be looking forward to you & your gazals.


तुझा  दुरावा  भरून  आहे  क्षणात  सार्‍या..
निदान  आता  विवंचनांची  ददात  गेली !
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

चित्त, भूषणजी, क्रांति- अभिप्रायाबद्दल  आभारी  आहे.
(गझल पोस्ट  करण्यात  अंमळ  घाई  झाली, असे  मलाही  वाटते आहे. योग्य ते  बदल  सुचल्यावर सुधारणा  करेन.)

लपून  तू  राहिलास  माझ्यामधेच  वेड्या...
सुखा ! तुला  शोधण्यात  माझी  हयात  गेली  !
वा॓!

ज्ञानेश,
गझल आवडली... भ्रमात, हयात मस्तच
 

कडे- कपारी मधून  सांगे  मुकी  रियासत
"रणात  आम्ही  कमावली, ती  तहात  गेली"

हा शेर आवडला :)

कडे- कपारी मधून  सांगे  मुकी  रियासत
"रणात  आम्ही  कमावली, ती  तहात  गेली"

छान.
ज्ञानेश,
कपाळावर आठी असते. अढी नाही.
मनात अढी असते. तुझ्या शेरात मनात गेल्यावर अढी झाली आहे, हे खरे. मूळची ती आठी असावी.

तो शेर उत्तमच आहे. पण बदल करता आल्यास पहावे.

लपून  तू  राहिलास  माझ्यामधेच  वेड्या...
सुखा ! तुला  शोधण्यात  माझी  हयात  गेली  !
नभमूलक उत्तम वैचारीक गझल. (जमीन??  चालते थोडे-बहुत..)
कलोअ चूभूद्याघ्या

प्रतिसादाबद्दल  पुनश्च  सगळ्यांचे  आभार.
@केदार- चांगला मुद्दा. फरक  लक्षात आणून दिलास, त्याबद्दल  आभारी  आहे. काही  बदल  सुचवल्यास  आवडेल.
@अजय  जोशी- जमीन पाळली  गेली  नाही, ही  चूक  लक्षात  आली  आहे. दुसर्‍या  ओळीत  'किती  सुखांची  रया  तुझ्या  संशयात  गेली' असा  बदल सुचला आहे. आणखी  काही  बदल  सुचले  आहेत, पण  संपादन  कसे  करावे  ते  न कळल्यामुळे  बदल  करता येत  नाहीत:(

गझल चांगली आहे...आवश्यक वाटतील आणि मूळ विचाराशी समरेष होतील तिथेच कवीने बदल करावेत ( असे मला वाटते :) )..प्रत्येक प्रतिक्रियेनुसार कविता बद्लू गेल्यास कविता लिहीणे दुष्कर होईल...

मीर आणि गालिबच्या काळात ही आपली प्रतिक्रियापटूंची फौज नव्हती, हे गनीमत !!!

अढी कपाळावरील जेव्हा मनात गेली..
कडू विषाची कुपी जणू जीवनात गेली

थोडी शब्दांची ओढातण झाल्याचे लक्शात येते........

जीवनात आली?की गेली?
आपण आली असे म्हणतो.....जर गेली असे असेल तर जीवनातून गेली असे होईल.....

ज्ञानेश....मी आपल्या गझलांचा चाहता आहे......पण ह्या वेळी खरच कहीतरी मिसिंग वाट्ले.

डॉ.कैलास गायकवाड.

अढी कपाळावरील जेव्हा मनात गेली..
कडू विषाची कुपी जणू जीवनात गेली

जाम आवडली गझल.