हे सुगंधाचे निघाले काफिले!

                 हे सुगंधाचे निघाले काफिले!
                मी असे हृदयात कोणा स्थापिले?

                रुक्ष रस्ता एवढा नव्हता कधी!
                ओळखीचे झाड कोठे राहिले?

                रोज तो सुंदर गुन्हा मज खुणवितो,
                पण व्रताने, हाय! मजला शापिले!

                पाहुनी माझी भरारी आजची,
                का नभाने पंख माझे कापिले?

                होऊनी मी माळ फेसाची सदा,
                ह्या किनाऱ्यासी स्वत:ला वाहिले!

                                  -मानस६

गझल: 

प्रतिसाद

हे सुगंधाचे निघाले काफिले!
                मी असे हृदयात कोणा स्थापिले?
मस्तच! गझल आवडली.
क्रान्ति {रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर | अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

हे दोन्ही शेर आवडले.

छान, हळुवार!
- चक्रपाणि जीवन चिटणीस

रुक्ष रस्ता एवढा नव्हता कधी!
                ओळखीचे झाड कोठे राहिले?

वाव्वा. फारच छान. फार  फार आवडली ही द्विपदी. खालच्या ओळीने मजा आला आहे.

सुंदर गझल!

रुक्ष रस्ता एवढा नव्हता कधी!
ओळखीचे झाड कोठे राहिले? - वा!

रोज तो सुंदर गुन्हा मज खुणवितो,
पण व्रताने, हाय! मजला शापिले!

(आम्हाला आमची एक जुनी द्विपदी आठवली. मोह आवरत नाही.)
खिशात नाणी, उरात आगी, दुकान चालू
मनास होता उपास, मी घेतलीच नाही

पाहुनी माझी भरारी आजची,
का नभाने पंख माझे कापिले? - व्वा!

होऊनी मी माळ फेसाची सदा,
ह्या किनाऱ्यासी स्वत:ला वाहिले! - फार सुंदर!

मला शेवटचे दोन शेर फारच आवडले.

चाळले मी पान थोडेसे जुने
गोड त्याने काव्य त्याचे दाविले

-सविनय
बेफिकीर!