मी व्यथांना अंतरीचे गाव देतो

मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो

सागराने ऐनवेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो

नेमकी येते भराया जखम जेव्हा
सांत्वनाचा स्पर्श तेव्हा घाव देतो

मागतो जो तो फुले ताजीतवानी
कोण निर्माल्यास येथे भाव देतो

खेळूनी झाले पुरे आयुष्य माझे
ये अरे मृत्यो! तुलाही डाव देतो

हासलो आजन्म खोट्या चेहर्यांनी
आज दु:खाला जरासा वाव देतो

( अल्बम : स्पर्श चांदण्यांचे , संगीत : श्री विवेक काजरेकर , गायक : श्री सुरेश वाडकर )

गझल: 

प्रतिसाद

छान गझल आहे.
हे शेर जास्त  आवडले-
सागराने ऐनवेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो

नेमकी येते भराया जखम जेव्हा
सांत्वनाचा स्पर्श तेव्हा घाव देतो

हासलो आजन्म खोट्या चेहर्यांनी
आज दु:खाला जरासा वाव देतो

(स्वरबद्ध  गझलेची  लिंक  मिळेल  काय?)

धन्यवाद ज्ञानेश. इथे टिचकी मारा व ऐका!
http://www.esnips.com/doc/e13a010a-296e-4aeb-b49e-c015893f203e/04_Mi-Vya...

प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

खास गझल! हे शेर अधिक भावले
मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो

सागराने ऐनवेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो

नेमकी येते भराया जखम जेव्हा
सांत्वनाचा स्पर्श तेव्हा घाव देतो
क्रान्ति
{रोज सकाळी असे काहि वाचावे सुंदर
अवघे जीवन भरून जावे आनंदाने!}

मागतो जो तो फुले ताजीतवानी
कोण निर्माल्यास येथे भाव देतो      ... खरे आहे
नेमकी येते भराया जखम जेव्हा
सांत्वनाचा स्पर्श तेव्हा घाव देतो     .. व्वा!

कलोअ चूभूद्याघ्या

धन्यवाद क्रान्ती व अजय . . .
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"

जखम आणि वाव हे शेर विशेष आवडले!

धन्यवाद पुलस्ति!!
प्रसन्न शेंबेकर
"तुझी जागण्याची अदा पाहिली
फुले आरतीला उभी राहिली"