शोधतो आहे...

शोधतो आहे नवा मी थार आता!


बंद तुझिया घराचे दार आता!


 


वाढतो बाहेर थंडीचा कडाका...


एक ही चादर कशी पुरणार आता?


 


सांग आता मी कसा गे थंड राहू?


पेटतो बघ भोवती अंधार आता!


 


मार्ग सार्‍यांनीच अपुले शोधलेले...


कोण माझ्या मागुती येणार आता?


 


काय मध्ये अडथळा आला असावा?


साठले आयुष्य हे बेकार आता!


 


शेवटी आलेच ते वठणीवरी...


शोधते आहे मला घरदार आता!


 


तू 'अरे' म्हणलास...मी म्हणणार 'का रे?'


हाच आहे ह्या जगी व्यवहार आता!


 


काय आहे ह्यापुढे माझीच पाळी?


घिरटते वर काळरूपी घार आता!


 


चालताना मखमली वाटेवरूनी...


आठवे मज मास्तरांचा मार आता!


 


आठवीतो फड जुने होऊन कातर


सांजवेळी एकट्याने पार आता!


 


शुष्क झाले ओठ म्हणती, "हे नभा, दे..


थेंब गंगेला जलाचे चार आता!"


 


पाणचट, नि:सत्त्व, आंबट आणि अळणी


राहिले ह्या जीवनाचे सार आता!


 


आज व्रुन्दावनसुद्धा हे सुकुन गेले..


मी कधी कोठे कसा फुलणार आता?

गझल: