छेद
निद्रिस्त बासरीला तो फुंकरून गेला
अन श्रीहरीच झाला रासात रंगलेला
कबिरासही सुचेना का कोणताच दोहा?
त्याने कसा विणावा, आता नवीन शेला?
वाळूत चातकाला का चांदणे दिसावे?
की धूर्त मृगजळाने चोरून चांद नेला?
ऐन्यास वेड लागे पाहून त्या परीला
पार्यास पंख आले, काचेस छेद गेला
पाहून वेष माझा थुंके जरी भिकारी
मी दावताच नोटा त्याने सलाम केला
ऐकून बातम्या 'त्या' खात्री कशी पटेना?
आताच ते म्हणाले,"मेला, समाज मेला!"
"लाटांत माणसांच्या माणूसकी बुडाली!",
"जलधीत एक मासा फिरतो तहानलेला!"
गझल:
प्रतिसाद
सोनाली जोशी
शुक्र, 27/04/2007 - 23:39
Permalink
छान
विसुनाना, गझल छान आहे, इतर शेरांपुढे मतला कमजोर वाटू लागला आहे:)
विसुनाना
शनि, 28/04/2007 - 00:09
Permalink
मतला
मतला वैयक्तिक आहे. त्यामुळे पोचत नाही, पोचट वाटतो.:)
तरीही अर्थ सांगण्याचे धाडस करतो-
माझ्या स्वतःच्या अनुभवावर शेर आहे. खूप वर्षे कविता केली नाही - निद्रिस्त बासरी! पुन्हा करू लागलो - फुंकरली. बाकी दिसतेच आहे...बस इतकेच!